Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, फेब्रुवारी २२, २०१८

कौशल्य अद्ययावत करणे काळाची गरज : अश्विन मुदगल

युथ एम्पॉवरमेंट समीटच्या चर्चासत्रात मार्गदर्शन

नागपूर : अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे नवनव्या क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या क्षमता वाढत आहे. मात्र, आपली कौशल्ये त्या अनुषंगाने अद्ययावत नाहीत. शिवाय येणार्‍या नवनवीन गोष्टींशी आपण जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधींना मुकतो. त्यामुळे आपली कौशल्ये अद्ययावत करीत त्याला आजच्या काळाशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे मत मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘युथ एम्पावरमेंट समीट’च्या पहिल्या सत्रात‘शासकीय योजनांच्या माध्यमातून महापालिकेचे रोजगार निर्मितीमध्ये योगदान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या सदस्या राणी दिवेदी उपस्थित होत्या.
पुढे बोलताना श्री. मुदगल म्हणाले, सरकारचे कार्य थेट नोकरी देण्याचे आहे, अशी भावना वाढत आहे. कारण ८०-९० च्या दशकामध्ये पब्लिक सेक्टरद्वारे सर्वाधिक रोजगार उपलब्ध व्हायचा. रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात भरती व्हायची. पण अर्थव्यवस्थेतून नवनवीन सेक्टर निर्माण झाले आणि ते आज खुले झाले आहेत. त्यांचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत कौशल्य असेल तर रोजगार उपलब्ध होणारच, असेही ते म्हणाले.
मेट्रो रेल्वेद्वारे निर्माण होणारे रोजगार याविषयावर बोलताना ब्रिजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रोच्या तांत्रिक पदभरतीमध्ये आम्ही स्थानिक भाषेची सक्ती केली आहे. शिवाय मेट्रो रेल्वेला अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टींची आवश्यकता पडेल. अर्थात ते स्थानिक नागरिकांद्वारेच निर्मित केलेले असेल. त्यामुळे नागपूर मेट्रो प्रकल्पातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की मेट्रोच्या परिक्षा दर सहा ते आठ महिन्यात होतीलच. पण नागपूर मेट्रोच्या परिक्षेचा पॅटर्न अभ्यासून मेट्रोला आवश्यक असलेले कौशल्य व त्याच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. सेवा क्षेत्रातही संधी मिळणार असून नॉन टेक्निकल लोकांनाही बरीच संधी मिळेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी युवकांना यशस्वी जीवनाचे सात मूलमंत्र शिकवले. कार्यक्रमाला नगरसेवक व महानगरपालिकेतील अधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.