नागपूर , दि. 0५ फेब्रुवारी-
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी (महावितरण) च्या संचालक (वित्त) पदी मुळचे नागपूरकर असलेले श्री. जयकुमार श्रीनिवासन यांची थेट निवडभरतीत गुणवत्तेवर निवड करण्यात आली असून त्यांनी नुकतीच या पदाची सूत्रे सांभाळली आहेत.
श्री. जयकुमार श्रीनिवासन यांनी नागपूर विद्यापीठातून बी.कॉम. पदवी व त्यानंतर आयसीडब्ल्यूए पुर्ण केले आहे. त्यांनी जून-2014 ते जूलै-2017 या दरम्यान महानिर्मिती कंपनीचे संचालक (वित्त) या पदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली असून ऑगस्ट-2017 पासून एमएसईबी होल्डींग कंपनीचे संचालक (वित्त) म्हणून ते काम सांभाळत होते. याशिवाय महागुज कॉलेरी कंपनी लि., युसीएम कोल कंपनी लि., धोपवे कोस्टल पॉवर लि., महागाम इत्यादी कंपन्यांत त्यांनी अर्धवेळ संचालक म्हणून काम पाहिले आहे.
महानिर्मितीच्या विविध प्रकल्पांच्या यशस्वी कार्यान्वयात श्री. श्रीनिवासन यांची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली असून महानिर्मिती कंपनीत सॅप प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीतही त्यांचे योगदान लक्षणीय ठरले आहे. महानिर्मितीच्या सेवेत असताना त्यांनी ईटलीमधील एसडीए बुकोनी विद्यापीठ व टोरिनो आणि पॅरिस येथील ईएससीपी बिझिनेस स्कूल येथील ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट प्रणालींचा अभ्यास केला.