चंद्रपूर/प्रतिनिधी: कर्जमाफी हा शब्दप्रयोग करत भाजप सरकारने बहुजन शेतकऱ्यांना गुन्हेगारांच्या रांगेत उभे केले, असा आरोप भंडारा- गोंदियाचे माजी खासदार नाना पटोले यांनी रविवारी नागभीड येथे केला. नागभीड येथे कुणबी समाजाने मेळाव्याचे आयोजन केले होते त्यावेळी ते मेळाव्यात बोलत होते.
यावेळी मंचावर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंबर पाटील गुरूपुडे, पं स. सदस्य संतोष रडके, रागिनी गुरूपुडे समाजाचे जिल्हा अध्यक्ष विजय देवतळे, सभापती रवी देशमुख ,यांची उपस्थिती होती. नाना पटोले पुढे म्हणाले की, संत तुकारामांनी पहिली कर्जमुक्ती केली. तशीच कर्जमुक्ती आम्हालाही अपेक्षित होती.मात्र सध्याच्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे, स्वामिनाथन आयोग लागू करण्याचे आश्वासन दिले होते. पण कोणतेच आश्वासन या सरकारने पूर्ण केले नाही.
या उलट बहुजन समाजावर अन्याय करणारे निर्णय घेतले आणि त्यामुळेच माझा बहुजन बांधव हा दुखावला गेला आणि म्हणून मला राजीनामा द्यावा लागला. पण राजीनामा देणारा मी काही पहिलाच व्यक्ती नाही.माझ्या आधीसुद्धा बहुजनांवर जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा डॉ. पंजाबराव देशमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील राजीनामा दिला होता ,यावेळी अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचलन स्वप्नील नवघडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन चक्रधर रोहनकर यांनी मानले.