शाळा व महाविद्यालय परिसरातील पान ठेल्यांवर होणार कारवाई
चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्रामध्ये विदर्भात त्यातही चंद्रपूरमध्ये तंबाखू सेवनातून होणा-या दुर्धर आजाराची संख्या मोठया प्रमाणात असून चंद्रपूरला या व्यसनातून मुक्त करण्यासाठी धडक कार्यवाही करा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी आज दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत जिल्हयातील समन्वय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. तंबाखूपासून होणा-या कॅन्सरसारख्या आजाराची संख्या झपाटयाने जिल्हयात वाढत आहे. यामध्ये ख-र्यामध्ये टाकण्यात येणारा सुगंधी तंबाखूपासून मोठे नुकसान होत आहे. जिल्हयामध्ये मौखिक आरोग्य तपासणीमध्ये एकूण लोकसंख्येच्या मोठया संख्येतील जनतेला तंबाखू सेवनातून मौखिक आजार असल्याचे पुढे आल्याने सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. जिल्हयामध्ये खर्रा सेवनामुळे मोठया प्रमाणात कॅन्सर आजारात वाढ होत असल्याचेही पुढे येत असून जवळपास 36 टक्के लोकांना तंबाखूचे व्यसन जडल्याचे पुढे आले अशी माहिती आजच्या बैठकीत राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे समन्वयक डॉ.नगराळे यांनी दिली.
बंदी घालण्यात आलेल्या सुगंधी तंबाखू विक्रेत्यांवर कार्यवाही करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाला आहे. पोलीस प्रशासनाच्या मदतीने या विभागाने धडक कार्यवाही करावी. शहरातील मोक्यांच्या ठिकाणी मोठया प्रमाणात खर्रा तयार करण्याचे काम व प्रतिबंधीत तंबाखू वापरण्याचा गुन्हा होत असल्याच्या तक्रारी असून या संदर्भात कडक कार्यवाही करावी, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस विभागाला देण्यात आले आहे.
शाळांच्या परिसरातील दुकानांमध्ये तंबाखू जन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी असून कोटपा कायदयाअंतर्गत कार्यवाही करण्याचे अधिकार पोलीस व अन्न व औषध विभागाला आहे. संबंधीत शाळा मुख्याध्यापकांनी याबाबतीत तक्रारी अन्न व औषधी विभागाकडे कराव्यात. यासाठी भरारी पथक तयार करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

