नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर बोचरी टीका करत भाजपला रामराम करणारे नाना पटोले यांनी गुरुवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत नाना पटोले यांनी पक्षात प्रवेश केला असून ते पुन्हा राज्याच्या राजकारणात सक्रीय होतील, अशी चर्चा आहे.
नाना पटोले यांनी डिसेंबरमध्ये खासदारकीचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. भंडारा- गोंदियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्यामुळे विदर्भात भाजपला हादरा बसला होता. पटोले हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा आधीपासूनच होती. गुरुवारी दुपारी दिल्लीत पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. अशोक चव्हाण, संजय निरुपम आदी नेते या प्रसंगी उपस्थित होते.
विदर्भातील ओबीसींचे नेते अशी ओळख असलेले पटोले २००८ पर्यंत काँग्रेसमध्ये होते. मात्र, विलासराव देशमुख यांच्याशी मतभेद झाल्यानंतर पटोले भाजपत गेले. विदर्भात ओबीसी चेहरा हवा असल्याने भाजपनेही पटोलेंना पक्षात स्थान दिले. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत पटोले खासदार म्हणून निवडून आले. मात्र केंद्रात मंत्रिपदही न मिळाल्याने पटोले यांचा अपेक्षाभंग झाला होता. यामुळे पक्षावर नाराज होते. शेतकऱ्यांचे प्रश्न, नरेंद्र मोदींची कार्यशैली यावरुन त्यांनी जाहीरपणे टीका केली होती. ‘मी जनतेच्या आशीर्वादाने विजयी झालो होतो. कुणा नेत्याच्या उपकाराने नव्हे. मी दिल्लीत खुर्ची उबवायला आलो नव्हतो. पण हे सरकार स्वतः काम करत नाही आणि आम्हालाही करु देत नाही’, अशा तिखट शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले होते