- बांधकाम विभागाच्या दक्षता पथकातर्फे चौकशी : पालकमंत्री
नागपूर- पाच हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना गेल्या 3 वर्षात डीपीसीतून देण्यात आलेल्या 50 लाख रुपये निधीच्या कामांची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ग्रामपंचातीच्या सरपंच सचिवांच्या आढावा बैठकीत दिली.
या आढावा बैठकीला जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कादंबरी बलकवडे, सभापती पुष्पा वाघाडे, श्रीमती गायकवाड व अन्य अधिकारी उपस्थित होते.
या निधीतून पाणी टंचाईची आणि स्वच्छ भारत अभियानाची कामे करण्याच्या सूचना या ग्रामपंचायतींना देण्यात आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या कामांमध्ये पाईपलाईन, नळ कनेक्शन व त्यासारखी अन्य कामे घेण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना करण्यात आल्या होत्या. तसेच स्वच्छ भारत अभियानांतर्गत सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत भूमिगत बंद गटारे, मच्छरमुक्त गाव अशी कामे घेण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. अपारंपरिक ऊर्जेअंतर्गत पथदिवे, नळ योजना सौर ऊर्जेवर आणणे अशी कामे न घेता अनेक ग्रामपंचायतींनी सिमेंट रस्त्यांची कामे घेतली.
गेल्या तीनही वर्षातील कामांची दक्षता पथकामार्फत चौकशी करण्यात येईल. कामांची तपासणी केली जाईल. तसेच तीन वर्षात झालेल्या सर्व कामांचे काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र गटविकास अधिकार्याला द्यावे लागेल. सर्व कामे एकाच टेंडरवर करण्यात आली असून प्रत्येक कामासाठी वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या नाही. हे पथक निविदा प्रक्रियांचीही चौकशी करणार आहे. ज्यांनी चुका केल्या असतील त्यांनी त्या आता सुधाराव्या, अन्यथा कारवाई होऊ शकते.
पाच हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 7 ग्रामपंचायतींना सन 2014 मध्ये, 2015 मध्ये 13 ग्रामपंचायतींना, 2016 मध्ये 31 ग्रामपंचायतींना प्रत्येकी 50 लाख रुपये विशेष अनुदान देण्यात आले होते. यापुढे आता पाणी टंचाई नसल्याचे बीडीओचे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय पुढचा निधी दिला जाणार नाही.