प्रहार च्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर - प्रहार चे जिल्हाप्रमुख देशमुख यांनी मध्यस्थी करून तोडगा काढल्यानंतर कंत्राटदाराने न्यायप्रविष्ट प्रकरण मागे घेऊन नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी जगन्नाथ बाबा नगर मधिल प्रतिष्ठीत नागरिक ओम साई ग्रुपचे प्रमोद पुण्यपवार यांचे हस्ते मृतक रमेश यांचे वडील पांडुरंग जाधव यांना दाताळा रोडवरील त्यांच्या घरी नुकसान भरपाई चा धनादेश देण्यात आला.
मागील वर्षी दाताळा रोडवरील इरई नदीच्या पुलाखाली विजेच्या खांबातून करंट लागल्यामुळे रमेश जाधव या नदीमध्ये आंघोळ करणाऱ्या 23 वर्षीय तरूणाचा दुर्दैवि मृत्यू झाला होता.नदीच्या काठावर झोपडीमध्ये राहणाऱ्या मृतक तरूणाच्या मागे सत्तर वर्षाचे म्हातारे वडील,एक विधवा बहिण व तिची मुले या सर्वांची जबाबदारी होती.इरई नदीवरील पुलावर पथदिव्यांसाठी महानगरपालिकेने नदीच्या पात्रात हे खांब टाकलेले होते.सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली करून धोकादायक विजेचे खांब टाकल्यामुळे रमेश जाधव यांचा मृत्यू झाल्याचा तसेच यासाठी मनपा प्रशासन दोषी असल्याचा आरोप प्रहार संघटनेने केला होता.सुरूवातीला मनपा प्रशासनाने या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.परंतु नदी पात्रातील पाण्यात प्रहाने पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात सहा तास केलेल्या आंदोलनानंतर मनपाला जाग आली व नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले.अशा प्रकरणामध्ये नियमानुसार द्यावयाची चार लाख रूपये नुकसान भरपाई ची रक्कम कंत्राटदाराच्या देयकातून कापण्याचे आदेश आयुक्त संजय काकडे यांनी दिले होते.या आदेशाविरुद्ध कंत्राटदार न्यायालयात गेल्यामुळे प्रकरण स्थगित झाले होते.
यावेळी प्रहार चे पप्पू देशमुख,फिरोजखान पठाण,घनश्याम येरगुडे,योगेश निकोडे,मिना कोंतमवार,मनिषा बोबडे,सतिश खोब्रागडे,दिनेश कंपू,हरिदास देवगडे,राहुल दडमल व जाधव कुटुंबातील सदस्य उपस्थित होते.