Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, नोव्हेंबर ११, २०१७

शिक्षण लोकाभिमूख करण्याचे विवेकानंद शिक्षणसंस्थेचे काम मोलाचे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 वंचितांना सुविधा उपलब्ध करून शिक्षण लोकाभिमुख करण्याचे काम विवेकानंद शिक्षण संस्थेने केले हे अत्यंत मोलाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे संस्थेच्या रौप्यमहोत्सव समारंभात केले. त्याच सोबत कमी पावसाने या भागात शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे. याचीही भरपाई शासन करेल असे मुख्यमंत्री म्हणाले.

              मूल येथील कै. रावसाहेब फडणवीस स्मृती स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त आज संस्थेच्या विस्तारित इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर  दुग्धव्यवसाय, पशुसंवर्धन, मत्ससंवर्धन मंत्री महादेवराव जानकर, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, आमदार कीर्तीकुमार भांगडीया, मूलच्या नगराध्यक्षा रत्नमाला भोयर, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शोभाताई फडणवीस, मूलचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे आदि उपस्थित होते.

                 शाळेच्या रौप्यमहोत्सवी समरणिकेचे प्रकाशन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी विविध स्पर्धांमधील व गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सत्कार केला. यावेळी यश टिंगुजले,चेतना निकोडे, पायल वाळके या गुणवान विद्यार्थांना मुख्यमंत्र्यांचे आजोबा  रावसाहेब फडणवीस स्मृती पुरस्कार देण्यात आला. 40 विद्यार्थांसह 1992 मध्ये स्वामी विविकानंद शाळेची सुरुवात झाली. आता 600 विद्यार्थी आहेत. पूर्वी मुख्यमंत्र्यांचे बालपण गेलेल्या फडणवीस वाडयात ही शाळा सुरू करण्यात आली होती. शैक्षणिक शिस्तीसह सांस्कृतिक संस्कार करणारी शाळा म्हणून या शाळेची जिल्हयात ओळख आहे.

             यावेळी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, शिक्षण सर्वांना उपलब्ध व्हावे, अशीच शासनाची भूमिका आहे. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीत 62 हजार शाळा प्रगत आणि 60 हजार शाळा डिजिटल करण्याचे काम शासनाने केले आहे. देशात 3 वर्षांपूर्वी शालेय शिक्षणात 18 व्या स्थानी असलेल्या महाराष्ट्राला आता 3 क्रमांकावर स्थान मिळाले आहे आणि लवकरच प्रथमस्थानी पोहोचण्याचे उद्दीष्ट आम्ही ठेवले आहे.

              या शिक्षण संस्थेच्या आगामी काळातील ‍विस्तार व विकासासाठी राज्य शासनातर्फे 50 लाख रूपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केली. शोभाताई फडणवीस यांनी यावेळी काही मागण्या मांडल्या होत्या. त्यांचा उल्लेख करित त्यांनी धान उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यासंदर्भात सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आवश्यक मदत केली जाईल, असे स्पष्ट केले. जिल्ह्यातील 7 तालुक्यात गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी पोहचले आहे. मात्र आता हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने काम करायला सुरूवात करणार असून जिल्ह्यातील उर्वरित भागात जिथे शक्य असेल त्या ठिकाणी हे पाणी पोहचवण्यासाठी संबंधीत विभागाची बैठक घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
                   राज्यात धरणातील गाळ काढून शिवार सुपीक करण्याची योजना सुरू आहे. चंद्रपूर जिल्हयातील शाश्वत जलसाठयात वाढ करण्यासाठी येथील तलावाचे खोलीकरण केले जाईल. जिल्हयातील अर्धवट राहिलेले सिंचन प्रश्नाबाबत सकारात्मक विचार केला जाईल. यावेळी जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार स्वास्थ चांगले नसल्याने येऊ शकले नाही. त्यांचा शुभेच्छाही मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिल्या. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडूनही विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

                  तत्पूर्वी संस्थेचे अध्यक्ष शोभाताई फडणवीस यांनी आपल्या भाषणात पशुसंवर्धन मंत्री महादेवराव जानकार यांनी या विद्यालयासाठी मदत केली याबद्दल आभार मानले. गावातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळावी, यासाठी रावसाहेब फडणवीस यांच्या प्रेरणेतून ही शाळा निर्माण झाल्याचे सांगितले. शैक्षणिक दर्जा हीच या शाळेची उपलब्धी आहे. मजुरी करणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थ्यानी 100 पैकी 100 गणितात गुण मिळवले आहे. गरीब, गरजू, तळागळातील विद्यार्थ्यांना या शाळेत आत्मबळ दिले जाते. वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कायम केल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या मुख्यमंत्र्यांकडे मांडल्या. धान पिक उत्पादकाचा कमी पावसामुळे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.


पशुसंवर्ध, दुग्धव्यवसाय व मत्सव्यवसाय मंत्री महादेवराव जानकार यांनी वंचितांसाठी या शाळेच्या माध्यमातून  सुरू असलेल्या ज्ञानदानाबद्दल शोभाताईचे आभार मानले. मदर डेअरीच्या माध्यमातून या भागात विकास केला जाईल, असे स्पष्ट केले. गरीब, वंचिताच्या मुलांना ही शाळा प्रोत्साहन देत असल्याबद्दल कौतुक करताना 25 लाख रूपये अधिक देण्याची घोषणा केली. कार्यक्रमाचे संचालन शाशीकांत धर्माधिकारी यांनी केले. यावेळी मोतीलाल टेहलानी, नंदू रणदिवे, अविनाश जगताप, गजानन वल्केवार, दिलीप सूचक, अशोक गंधेवार, मुख्याद्यापक संतोष खोब्रागडे, देवराव पटेल यांनी मान्यवरांचे स्वागत केले.





                                                           
             

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.