Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर २९, २०१७

तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा

कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण-
अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या कोपर्डी बलात्कार व खून खटल्यातील मुख्य दोषी पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (वय २५) याला अत्याचार व खूनाच्या आरोपाखाली दोषी धरत येथील सत्र न्यायालयाने बुधवारी (दि. २९) फाशीची शिक्षा सुनावली. तर संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) यांचा या कटात सहभाग असल्याचे सिद्ध झाल्याने त्यांनाही न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी हा निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी नागरिकांची जिल्हा न्यायालयाच्या आवारात तुडूंब गर्दी जमली आहे.
कोपर्डी येथील नवनीत शिकणारी निर्भया (नाव बदललेले आहे) गतवर्षी १३ जुलै रोजी  सायंकाळी साडेसहा वाजता भाजीचा मसाला आणण्यासाठी घराबाहेर पडली होती. आपल्या आजोबांच्या घरुन मसाला घेऊन परतत असताना वाटेत तिची सायकल अडवून रस्त्याच्या कडेला तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर तिचा निघृणपणे खून करण्यात आला होता. याप्रकरणी मुलीच्या मावसभावाने पोलिसात फिर्याद दिली होती. मुख्य आरोपी पप्पू शिंदे याला घटनेनंतर पळताना फिर्यादीने पाहिले होते. त्याची दुचाकीही घटनास्थळी आढळली. तो पुरावा घटनेत महत्त्वपूर्ण ठरला. विशेष सरकारी वकील उज्जल निकम यांनी तिनही दोषींना फाशी देण्याची मागणी केली होती.
या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले. न्यायालयाने आज पप्पू शिंदे याला अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार अधिनियमानुसार (पोक्सो) दोषी धरले. दोष सिद्ध झाल्याने त्याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आरोपी संतोष भवाळ व नितीन भैलुमे या दोघांना कट रचणे, गुन्ह्यासाठी प्रोत्साहित करणे या कलमांखाली दोषी धरण्यात आले. त्यांनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. 
घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यात निकाल 
नगर येथील  स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शशिराज पाटोळे यांनी या घटनेचा तपास करुन घटनेनंतर ८५ दिवसांनी ७ आॅक्टोबर २०१६ रोजी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. घटनेनंतर १ वर्षे चार महिन्यांनी निकाल लागला. हा खटला सरकारी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी लढविला़ जितेंद्र शिंदे याच्यासाठी न्यायप्राधिकरणाने अ‍ॅड. योहान मकासरे यांची नियुक्ती केली होती. संतोष भवाळ याच्यावतीने अ‍ॅड. बाळासाहेब खोपडे व अ‍ॅड. विजयालक्ष्मी खोपडे यांनी तर नितीन भैलुमे याच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश आहेर यांनी हा खटला लढविला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.