Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर १३, २०१७

आयुर्वेद रुग्णालयाचे अधिष्ठाता निलंबित

नागपूर,/प्रतिनिधी - 
‘बीएएमएस’ प्रथम वर्षात एका विद्यार्थिनीला नियमाबाह्य प्रवेश दिल्याचा ठपका ठेवून शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांना शासनाने निलंबित केले. अचानक झालेल्या या कारवाईने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय गेल्या काही महिन्यांपासून या-ना त्या कारणाने चर्चेत आले आहे. आता थेट अधिष्ठात्यांवरच कारवाई झाल्याने या महाविद्यालयाकडे सर्वांच्या नजरा वळल्या आहेत. झाले असे की, गेल्या वर्षी महाविद्यालयात ‘बीएएमएस’च्या ९९ जागा भरण्यात आल्या. मात्र, त्यातील ‘बीएएमएस’ प्रथम वर्षाची एक जागा रिक्त होती व ती जागा केंद्र शासनाच्या कोट्यातून भरायची होती. सूत्रांच्या माहितीनुसार, ३० नोव्हेंबर २०१६ ही ‘कट आॅफ डेट’ होती. २८ तारखेपर्यंत अधिष्ठात्यांनी केंद्राकडून येणाºया विद्यार्थ्याची प्रतीक्षा केली. मात्र, तो आला नाही. परंतु, जी जागा रिक्त असेल ती जागा भरण्याचे निर्देश राज्य शासनाने एका पत्राद्वारे अधिष्ठाता डॉ. मुक्कावार यांना दिले होते.

राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन करीत डॉ. मुक्कावार यांनी ३० नोव्हेंबर २०१६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संबंधित विद्यार्थिनीला प्रवेश दिला. मात्र, त्यानंतर शासनानेच घूमजाव करीत परवानगी नसताना जागा भरली कशी, असा प्रश्न उपस्थित करून प्रवेश नियमबाह्य केल्याचा ठपका डॉ. मुक्कावार यांच्यावर ठेवला. विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द करण्याचे आदेशही दिले. डॉ. मुक्कावार यांनी १३ डिसेंबर २०१६ रोजी विद्यार्थिनीचा प्रवेश रद्द केला. नियमानुसार प्रवेश झाल्यानंतरही रद्द का केला, असा सवाल विद्यार्थिनीने एका नोटीसद्वारे अधिष्ठात्यांना १९ डिसेंबरला केला. प्रवेश रद्द झाल्यामुळे विद्यार्थिनी २१ डिसेंबरला न्यायालयात गेली. तिने अधिष्ठाता, आयुष संचालक व वैद्यकीय सचिव अशा तिघांना गैरअर्जदार केले. न्यायालयात अधिष्ठाता डॉ. मुक्कावार यांनी प्रवेश नियमानुसारच आणि प्रवेश समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर ओक यांच्या निर्देशानुसार झाल्याचे सांगून न्यायालयात संपूर्ण संबंधित कागदपत्रे सादर केली. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर न्यायालयाने प्रवेश नियमानुसारच झाल्याचा निकाल दिला. डॉ. मुक्कावार यांनी जुलै २०१७ मध्ये विद्यार्थिनीला पुनर्प्रवेश दिला. या प्रकरणी शासनाची चांगलीच नाचक्की झाली. न्यायालयाने निकाल दिल्यानंतरही शासनाने मात्र आता नियमबाह्य प्रवेश दिल्याचा ठपका ठेवत शुक्रवार १० नोव्हेंबर २०१७ रोजी डॉ. मुक्कावार यांना निलंबित केले. याबद्दल सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.