Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, सप्टेंबर २५, २०१७

– २०१९ पर्यंत घरोघरी २४ तास वीज देणार

 
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सोमवारी ‘सौभाग्य’ योजना राष्ट्राला अर्पण केली. अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश असलेली ही योजनाही देशभरातील महिलांना केंद्रस्थानी ठेवूनच सादर करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिले जाणार असून, यात पाच एलईडी बल्ब, पंखा आणि सौर ऊर्जेचा संच दिला जाणार आहे.
जनगणनेच्या आधारावर ही सुविधा दिली जाणार आहे. १६,३२० कोटी रुपयांची ही योजना असून, उत्तरप्रदेश, बिहार, मध्यप्रदेश आणि ओडिशा या राज्यातील सर्वसामान्य जनतेला सौभाग्य योजनेचा मोठा फायदा होणार आहे.ओएनजीसीच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी ही योजना घोषित केली. पंतप्रधान मोदी गरीब जनतेसाठी एका मोठ्या योजनेची घोषणा करणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सकाळीच दिली होती.
विशेष म्हणजे, या योजनेला पं. दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक घरात वीज देणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. देशातील सुमारे ४ कोटी जनतेला या योजनेचा फायदा होणार आहे.स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षांनंतरही कोट्यवधी लोकांच्या घरात अद्यापही वीज उपलब्ध झालेली नाही. थॉमस अल्वा एडिसनने बल्बचा शोध लावून १२५ वर्षे लोटली, मात्र भारतात आजही अनेकांच्या घरात बल्बचा प्रकाश दिसत नाही. त्यांच्या घरात मेणबत्ती आणि कंदिलाचाच उजेड दिसतो. याचा परिणाम घरातील महिलांवर होत आहे. या योजनेद्वारे सरकार लोकांच्या घरी येऊन वीज कनेक्शन देणार आहे. वीज कनेक्शनसाठी गरिबांना आता सरकारी कार्यालयात चकरा माराव्या लागणार नाही. या योजनेचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. गरिबांच्या सौभाग्याचा संकल्प आम्ही केलेला आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आर्थिक जनगणना आधार
२०११ च्या आर्थिक जनगणनेत ज्यांचे नाव आहे, त्यांना या योजनेचा फायदा मिळणार आहे. ज्यांचे नाव या योजनेत नाही, त्यांना ५०० रुपये भरुन योजनेचा फायदा घेता येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. नव्या भारताच्या निर्मितीचा आमचा संकल्प आहे आणि या नवभारतात प्रत्येक घरात केवळ वीजच पोहोचणार नाही, तर वीज कनेक्शनही उपलब्ध करण्यात येणार आहे. कारण, आता आपण वीज संकटापासून वीज निर्मितीकडे निघालो आहोत, असे पंतप्रधान म्हणाले.
सूचना विचार होईल
वेबसाईट आणि ऍपच्या माध्यमांतून यासंदर्भात येणार्‍या सूचनांचा आपले सरकार विचार करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. देशातील वीज व्यवस्था सुधारण्यासाठी चार टप्प्यांवर काम केले जाणार आहे. विजेवर चालणार्‍या शेगड्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी ओएनजीसीने पुढाकार घ्यावा, तसेच अशा प्रकारच्या शेगड्यांसाठी ओएनजीसीने तरुणांना संशोधनासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहनही त्यांनी केले.३१ मार्च २०१९ पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागातील प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. याशिवाय नागरिकांच्या आरोग्याबाबतही योजनेत तरतूद करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.