Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, सप्टेंबर २०, २०१७

संजीवनीला हवी नवसंजीवनी


ललित सुनिल लांजेवार
चंद्रपूर - नाव संजीवनी उसरेटी. वय जेमतेम १६ वर्षे, दहावीला शिकतेय . घरची परिस्थिती अतिशय बेताची.  वडील एका खाजगी दुकानांत संगणक चालक, आई गृहिणी. जन्मापासून आजवर अतिशय आनंदाने  जगल्यानंतर अचानक एक दिवस तिच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्यात ती आणि तिच्या घरचे चिंतेत गेले.
जुलै महिन्यातील अखेरचे दिवस. संजीवनी नेहमीप्रमाणे शाळेला जायची-यायची. यंदा तिचे दहावीचे वर्ष होते. ती अभ्यासात हुशार होती. एक दिवस अचानक तिची प्रकृती बिघडली. तिच्या पाठीवर व मांड्यावर खाज येत होती. सुरवातीला याकडे गांभीर्याने बघितले गेले नाही.  मात्र त्रासही वाढत गेला. प्राथमिक उपचारासाठी तिला चंद्रपूर येथील प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ विनीत दुबे यांच्याकडे दाखल करण्यात आले. उपचारही सुरु झाला. बरेच दिवस उपचार सुरु असतानादेखील संजीवनीच्या शरीरावर कोणतीच औषध-उपचार काम करत नाही, असे निदर्शनात येत होते.
त्याच दरम्यान दोन्ही पाण्याच्या गूढघ्याला हिरव्या निळ्या रंगांच्या गाठी येऊ लागल्या होत्या. संजीवनीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत जात होती. आईवडील देखील दिवसेंदिवस चिंतेत पडत होते, घरची परिस्थिती देखील बेताची होती , एक हातावर कमविणे आणि दुसऱ्या हातावर खाणे,अशी परिस्थिती होती. यातच संजीवनीच्या वडिलांनी डॉ.  इंगळे नामक खाजगी डॉक्टरकडे या रोगाविषयी माहिती केली. त्यांनी त्यांना लगेच रक्त तपासणी करण्याचा सल्ला दिला. संजीवनीचे रक्ताचे नमुने घेण्यात आले, ते तपासण्यात आले. त्याचा रिपोर्ट आल्यावर संजीवनीच्या वडिलांना बोलवून काहीही न सांगता त्यांना नागपूर येथील हिमोटोलॉजिस्ट डॉ. रिया बल्लीकर यांना भेटावयास सांगितले.
आता इथून सुरु झाली होती संजीवनीला नवसंजीवनी देण्याची तिच्या घरच्यांची धडपड. संजीवनीचे वडील तिला घेऊन व्होकार्ड रुग्णालयात नागपूर येथे आले. तेव्हा तिची प्रकृती बघता तिला २ दिवस रुग्णालयातच भरती ठेवण्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी तिला "ब्लड कॅन्सर" झाल्याचे निष्पन्न केलं. हे सांगताच वडिलांना धक्काच बसला. आईदेखील वर डोळे करून बसली होती. इतक्या मोठ्या शहरात आणि इतक्या मोठ्या उपचारासाठी १५ लाख रुपयांची आवश्यकता भासणार होती. आईवडील दोघेही चिंतेत होते. आजवर जेही थोडं फार कमावलं होते, ते  वडिलांनी तिच्या प्राथमिक महागड्या उपचारासाठी खर्च केले होते. दोन दिवस रुग्णालयात भर्ती केल्यानंतर तिचे बोनम्यॅरो तपासणी करण्यात आली. त्यात तिच्या शरीरातले ब्लडसेल्स निष्क्रिय होत होते, असे सांगण्यात आले. ज्यामुळे तिची प्रकृती ही खालावत होती. त्यानंतर तिची प्रकृती पूर्णपणे सुधारण्यासाठी महागडी उपचार पद्धती कीमोथेरेपी सुरु होणार होती. या उपचार पद्धतीत कीमोथेरेपीचे इंजेक्शन अतिशय महागडे असतात, आता आणखी पैश्याची आवश्यकता भासणार होती. १ इंजेक्शन देऊन झाले होते आणखी तिला बरे होण्यासाठी २ इंजेक्शन घेण्याची आवश्यकता आहे.
तेव्हा इतके पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न संजीवनीच्या वडीलांना पडला. ही बाब चंद्रपूर येथील तिच्या परिसरात माहित झाली. अनेकांना तिच्या घरची परिस्थिती माहित असल्याने तिला आर्थिक मदत करण्याचे ठरविले. त्यात संजीवनी ज्या शाळेत शिकत होती त्या विद्या विहार शाळेतील शिक्षक, परिसरातील  नागरिक, तुकूम येथील तुकूम युवक गणेश व क्रीडा मंडळ यांनी गणपती उत्सवासाठी लागणारी मदत देखील संजीवनीच्या उपचारासाठी केली. संजीवनीचे नातेवाईक, शासकीय स्थरावर पाठपुरवठा करत मुख्यमंत्री सहाय्य्यता निधी, चंद्रपूर येथील साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी देखील हजारो रुपयांची आर्थिक मदत केली.
मात्र ही सर्व मदत आजही संजीवनीच्या उपचारासाठी अपुरी पडत आहे. तिच्या वडिलांची मदतीसाठीची पायपीट ही सुरूच आहे. आज तिला इतरांसारखे सामान्य जीवन जगायचे आहे .


आणखी तिच्या उपचारासाठी जवळपास ७ लाख रुपयांची आवश्यकता आहे. तेव्हा तिच्या मदतीसाठी शहरभर अनेक पोस्टर्स लागले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्र तुकूम शाखेच्या खाता क्रमांक- ६०२५८२६७०९९, IFSC -MAHB0000618 या खात्यात माणुसकीच्या नात्याने मदत करा
तुमची हीच मदत संजीवनीला नवसंजीवनी देण्यास उपयुक्त ठरू शकते .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.