Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, ऑगस्ट १५, २०१५

नागपूरात पुरामुळे २५ हजार घरे प्रभावित

-जिल्ह्यात ७, शहरात ४ लोकांचा मृत्यू

-नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम

-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

नागपूर, १४ -बुधवार आणि गुरुवारी धो धो पाऊस बरसल्याने शहरातील ४ तर जिल्ह्यातील ७ लोकांचा मृत्यू झाला असून पुरामुळे २० ते २५ हजार घरे प्रभावित झाली आहेत. यासंदर्भात नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा, नासुप्र व महसूल प्रशासनाला दिले असून नुकसानभरपाईचा अंतिम अहवाल सोमवारी प्राप्त होईल, अशी माहिती ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली.

रविभवनात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, नागपूर शहरातील अंबाझरी तलाव, गोरेवाडा तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे पिवळी नदी, नागनदी, नाले तुडुंब भरली. नदीकाठाजवळील नारी, नारा, टेकानाका, गड्डीगोदाम, सुंदरबन, गोरेवाडा तलावाजवळील भाग, हुडकेश्‍वर, नरसाळा, महेशनगर, समतानगर, कामगारनगर, गुलशननगर, वनदेवी नगर, भरतवाडा, कळमना, बर्डी, झांशी राणी चौक, मोरभवन, नंदनवन झोपडपट्टी आदी भागात पाणी शिरले. २०११-१२ च्या मनपा, नासुप्रच्या नकाशावर असलेल्या शहरातील ९० टक्के नाल्यावर अतिक्रमण झाल्याने शहरात ही पूर परिस्थिती निर्माण झाली. भविष्यात आणखी गंभीर परिस्थिती उद्‌भवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात येईल. शहर व जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश मनपा, नासुप्र व महसूल प्रशासनाला दिले आहेत. १५ ऑगस्ट रोजी शासकीय सुटी असून शासकीय यंत्रणा या कामात राहील. सोमवारपर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होईल. त्यानंतर सायंकाळी उच्चस्तरीय बैठक घेऊन नुकसानभरपाई मिळण्याबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल, असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

४ तासाच्या पावसात नागपूरची दैनावस्था झाली. २४ तास पाऊस पडल्यास शहरातील एकही घर वाचणार नाही. हा भविष्यातील धोका लक्षात घेऊन गुगल मॅपनुसार शहरातील नाल्याचा शोध घेतला जाईल. नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाईल. याशिवाय रस्ते रुंदीकरण, नाले साफसफाई मोहीमही राबविली जाईल. मानकापूर येथे रेल्वे उड्डाण बांधताना ओरिएंटेट कंपनीच्या चुकीमुळे नाल्याचा प्रवाहही बंद करण्यात आला. त्याचा फटका या भागातील घरांना बसला आहे. अनेक लोक रस्त्यांवर आले आहेत. त्यांच्या भोजनासाठी छावण्या लावण्यात आलेल्या आहे. नुकसानग्रस्तांना तातडीने खावटी स्वरूपात मदत केली जाईल. पुरामुळे मृत्यू पावलेल्या कुटुंबीयांना ४ लाखांची तातडीने मदत केली जाईल. तसेच घरांची पडझड झालेल्या लोकांना अधिकाधिक मदत मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव पाठविणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत मदतीची रक्कम निश्‍चित अधिक असेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

२००० पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे २००० पूर्वीचे नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात येईल. पण त्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात येईल. केंद्रीय परिवहन व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी कालच दिल्ली येथे बैठक घेऊन २००० पूर्वीच्या अतिक्रमणासाठी घरकुल योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे, याकडे ना. बावनकुळे यांनी लक्ष वेधले.

पत्रपरिषदेला आ. सुधाकरराव देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, विकास कुंभारे, महापौर प्रवीण दटके, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, नासुप्र अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार आदी उपस्थित होते.

कळमेश्‍वर, सावनेर तालुक्यात पिकांना फटका

जिल्ह्यातील अतिवृष्टीचा धान पिकांना फायदा झालेला आहे. रोवणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झाल्याने रोवणीच्या कामाला गती येईल. पण कळमेश्‍वर आणि सावनेर तालुक्यातील इतर पिकांना फटका बसलेला आहे. सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. कळमेश्‍वर तालुक्यातील धापेवाडा बु. येथील घर पडल्यामुळे संदीप दंदरे (वय ३२) यांचा मृत्यू झाला.. उमरेड तालुक्यातील वायगाव येथे १५० ते २०० लोकांना समाज मंदिर व पंचायत भवनात हलविण्यात आले असून त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. सावनेर तालुक्यातील २०० व्यक्तींना नगर परिषद शाळेत हलविण्यात आले असून भोजनासाठी मसाले भाताची व्यवस्था केली आहे. कामठी तालुक्यातील ४ हजार घरांमध्ये पाणी शिरले. मोहप्याचे कृष्णा चापके हे गुमथी नाल्यात वाहून गेले. मौदा तालुक्यातील १५ ते २० गावांत पूरपरिस्थिती निर्माण झाली असून तेथील विस्थापितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.