Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑक्टोबर १३, २०१४

विकासकार्यातून कर्मभूमीचे ऋण फेडू

अनिल देशमुख यांच्याशी खास बातचीत
देवनाथ गंडाटे : सकाळ वृत्तसेवा
नागपूर : काटोल मतदार संघातील प्रत्येक माणसाचा सर्वांगिण विकास करण्याचा माझा संकल्प आहे. त्याच्या पूर्तीसाठी माझा सतत संघर्ष सुरू आहे. रस्ते, आरोग्य, पाणी, शिक्षण या सर्वच क्षेत्रात कामे करून काटोल मतदार संघाचा नागपूरच्या बरोबरीने विकास करण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. नि:स्वार्थपणे सेवा करणे हा पिढीजात मिळालेला वारसा असून, विकासकार्यातून कर्मभूमीचे ऋण फेडू, असे प्रतिपादन अनिल देशमुख यांनी केले.
काटोल मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याशी खास बातचीत केली. त्यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा करीत राजकीय जीवनाच्या प्रारंभीच्या आठवणींना उजाळा देत मंत्रिपदाच्या कारकिर्दीपर्यंतचा आढावा घेतला. ते म्हणाले, महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात युवक कॉंग्रेसच्या चळवळीत सक्रिय होतो. तेथून राजकीय आवड निर्माण झाली. 1992 मध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक लढली. त्यात विदर्भातून सर्वांत जास्त मतांनी विजयी होण्याचा विक्रम केला. विशेष म्हणजे, अवघ्या सहा महिन्यांनी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याचवर्षी अध्यक्षांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देऊन लालदिव्याचे वाहनदेखील मिळाले. यातून ग्रामीण समस्या आणि कार्यपद्धतीचा अनुभव घेता आला. लोकांच्या आग्रहाखातर 1995 मध्ये विधानसभा निवडणूक अपक्ष लढली आणि ती पहिल्याच प्रयत्नात जिंकली. काटोल मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर त्याचवेळी युतीच्या शासनात राज्यमंत्रिपद मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सलग तीनदा आमदार होता आले.
देशमुख म्हणाले, उत्पादन शुल्कमंत्री असताना दारूबंदीसाठी 50 टक्के गावकऱ्यांनी विरोध केला, तर त्या गावातील दारू दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला. रस्ते विकास महामंडळ खात्याचा मंत्री असताना बांद्रे-वरळी सी लिंग या भारतातील पहिल्या समुद्रीपुलास मंजुरी दिली. आज समुद्रातील सहा किलोमीटर लांबीचा तो पूल पूर्णत्वास आला. हा पूल आता मुंबईसाठी लॅण्डमार्क असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
नागपूर रेल्वेस्थानकाजवळ रामझुला पूल नवीन तंत्रज्ञान वापरून बांधण्यात येत आहे. तो एक-दीड महिन्यात पूर्ण होईल. अन्न व नागरी पुरवठा खात्याने अन्नसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. या अंतर्गत गरिबांना दोन रुपये प्रतिकिलो ग्रॅम दराने गहू आणि तीन रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ दिले जात आहे. शिक्षण, सांस्कृतिक, क्रीडा, अन्न व औषध, उत्पादन शुल्क, राज्य रस्ते विकास, अन्न व नागरीपुरवठा अशा विविध खात्याचा मंत्री म्हणून काम करताना धोरणात्मक निर्णय घेतले. गुटखा बंदीसाठी घेतलेल्या निर्णयाला कडाडून विरोध झाला. मात्र, तो राज्याच्या व्यसनमुक्तीसाठी हिताचा होता, असेही देशमुख म्हणाले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.