Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, सप्टेंबर ०६, २०१४

राष्ट्रीय सणांना मुख्याध्यापकाची दांडी

शिक्षकदिनाच्या कार्यक्रमातही अनुपस्थिती

चंद्रपूर : 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीण सणांच्या कार्यक्रमांना सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना उपस्थिती राहणे अनिर्वाय असतानाही सावली तालुक्‍यातील मेहा बुज येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाने चक्क दांडी मारल्याचा प्रकार उघड झाला आहे. एक-दोन नव्हे तर गेल्या तीन वर्षात एकही उपक्रमात सहभागी होण्याची औचित्य या मुख्याध्यापकाने दाखविले नाही. त्यामुळे गावकऱ्यांत रोष व्यक्त होत आहे.
पंचायत समिती सावली अंतर्गत येणाऱ्या मेहा बुज. येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक म्हणून रामचंद्र निरगुडे गेल्या चार वर्षांपासून कार्यरत आहेत. ते येथे रुजू झाल्यापासून त्यांचा कार्यकाळ वादग्रस्त राहिला. शाळा आणि शिक्षकांवर त्यांचे वचक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेत दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या राष्ट्रीण सणांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र, चक्क मुख्याध्यापकाचीच अनुपस्थिती राहते. प्रारंभी वैयक्तिक कारण, आजारपणामुळे ते अनुपस्थित असतील, असा समज शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांत होता. वारंवार घडणाऱ्या या प्रकारात आता नित्याचीच बाब झाली आहे. यंदा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन या दोन्ही राष्ट्रीय सणांच्या कार्यक्रमात त्यांच्या अनुपस्थितीवरून वाद निर्माण झाला होता. मुख्यालयी राहूनदेखील शाळेच्या कार्यक्रमातील त्यांची अनुपस्थिती नेहमी कशासाठी असते, याचे कारण अनेकदा शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामसभेने मागितले. मात्र, उत्तर मिळाले नाही. त्यामुळे ग्रामसभेने त्यांच्या निलंबनाच्या मागणीचा ठराव पारित केला आहे. पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, नेहमीप्रमाणेच गैरहजर राहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवादाचे थेट प्रक्षेपण करण्याच्या सूचना असतानाही मुख्याध्यापकाने व्यवस्था केली नाही. अखेर विद्यार्थी हितासाठी गावातील तरुणमंडळींनी पुढाकार घेऊन दूरचित्रवाणीची व्यवस्था करून मोंदीचे भाषण ऐकविले.

आठ महिन्यापासून शिक्षक गायब
जानेवारीमध्ये नव्याने रुजू झालेले मेश्राम नामक शिक्षक केवळ आठवडाभर आले आणि त्यानंतर ते शाळेत कधीच दिसले नाही. एकदिवस अतिमद्यप्राशन करून आलेल्या या शिक्षकाने शाळेत चांगलाच धूमाकूळ घातला होता. चक्क मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर बसून, माझे कुणी वाकडे करू शकत नाही, असा आव आणून इतर शिक्षकांना तंबी देत होता. या शिक्षकाची बदली झाली की, त्याच्या अनुपस्थितीला अधिकाऱ्यांचे पाठबळ आहे, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मेहा येथील शाळेत सातवीपर्यंत वर्ग असून, एकूण जवळपास 125 विद्यार्थी पटसंख्येवर आहेत. त्यांना शिकविण्यासाठी एकुण सहा शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, मुख्याध्यापक निरगुडे आणि मेश्राम या शिक्षकाच्या नियमित गैरहजेरीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.