Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०१, २०१४

प्रत्यारोपणासाठीच्या कार्य प्रणालीमध्ये सुलभता आणा

 एकनाथराव खडसे यांची मागणी

मुंबई, दि.1 : ‍ राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपणासाठी सध्या अस्तित्वात असलेली पध्दत अत्यंत क्लिष्ट व वेळखाऊ असल्यामुळे मुत्रपिंड व यकृताचा आजार असलेल्या रुग्णांना मुत्रपिंड व यकृत प्रत्यारोपण करण्यासाठी परवानगी घेतांना खुप त्रास सहन करावा लागतो, म्हणुन मानवी अवयव प्रत्यारोपणासाठीच्या कार्यप्रणालीमध्ये सुलभता आणावी अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे. श्री.खडसे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेऊन ही मागणी केली.

मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार व आपण मुख्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य मंत्री यांना केलेल्या विनंतीच्या अनुषंगाने मानवी अवयव प्रत्यारोपणासाठीच्या कार्यप्रणालीत सुलभता आणण्याबाबतची कार्यवाही सार्वजनिक आरोग्य विभागात सुरु आहे. परंतु, आपण या विषयात व्यक्तीश: लक्ष घातल्यास हा विषय तातडीने मार्गी लागुन अशा रुग्णांना दिलासा मिळेल असे श्री.खडसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले. त्यावर आपण या विषयात व्यक्तीश: लक्ष घालुन मानवी अवयव प्रत्यारोपणासाठीच्या कार्यप्रणालीत सुलभता आणली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

**-**


राज्यात पोलीसांच्या अकार्यक्षमतेमुळे गुन्हेगारीत वाढ

– एकनाथराव खडसे


मुंबई, दि.1 : ‍ राज्यात पोलीसांची वाढती अकार्यक्षमता व बेजबाबदारपणामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांची हत्या, खुन, दरोडे, चोऱ्या, हाणामारी, अल्पवयीन मुलींवरील बलात्कार, महिलांवरील अत्याचार, वयोवृध्द नागरीकांच्या होत असलेल्या हत्या, बांधकाम व्यवसायीकांच्या हत्या, माहिती अधिकार कार्यकर्त्यांच्या हत्या, मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ तसेच बनावट नोटा जप्त करण्यात आल्याच्या घटना या सारखे अनेक गंभीर गुन्हे वारंवार घडत असूनही गुन्हेगारांवर जरब बसविण्यात राज्यातील पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. कायद्याच्या राज्या ऐवजी महाराष्ट्रात गुन्हेगारांचे राज्य सुरु असल्याची जनतेची भावना झाली आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी व योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांची व शासनातील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेण्यात यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते व भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्या संदर्भात श्री.खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यावेळी गृहमंत्री आर.आर.पाटील हेही उपस्थित होते.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे रोहन गुच्छेत या 12 वर्षाच्या निष्पाप मुलाचे खंडणीसाठी अपहरण करुन निर्घुण हत्या करण्यात आली. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खरडा येथे नितीन आगे या 17 वर्षीय दलित तरुणाची हत्या करुन त्याचा मृतदेह झाडाला लटकवल्याची घटना घडली आहे. कालच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगांव कारागृहातुन 4 आरोपी पोलीसांच्या तावडीतुन फरार झाले. चाकण येथे माहिती अधिकार कार्यकर्ते बारवकर यांची हत्या करण्यात आली. राज्यात अल्पवयीन मुलांचे अपहरण करुन त्यांच्या हत्या करण्याच्या घटना वाढीस लागल्या असून दलित व आदिवासी यांच्यावरील अत्याचाराचे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत हे गुन्हे 545 ने वाढले आहेत. पोलीसांची अनेक लाचखोरीची प्रकरणे उघडकीस येत असून आरोपींना मोकाट सोडण्यात पोलीसांकडूनच मदत केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या या गंभीर परिस्थिती विषयी श्री.खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे चिंता व्यक्त केली व सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे सांगितले.

त्यावर आपण राज्य सुरक्षा आयोगाची तातडीने बैठक घेऊन राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यात येईल असे आश्वासन गृहमंत्री आर आर पाटील यांनी यावेळी दिले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.