Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे ०८, २०१४

नक्षल्यांकडून आतापर्यंत 15 कोटींच्या वाहनांची जाळपोळ

- विकास कामांवरील ट्रक, ट्रॅक्टरसह 417 वाहने भस्मसात- आदिवासींना विकासापासून दूर ठेवण्याचे षडयंत्र


नागपूर, राज्याच्या टोकावर असलेल्या नक्षलग्रस्त व मागासलेल्या गडचिरोली जिल्ह्यात  हिंसेचे समर्थन करणा-या नक्षल्यांनी आतापर्यंत विकास कामांवरील 417 वाहनांची जाळपोळ केली आहे. वाहनांच्या नुकसानीचा हा आकडा तब्बल 15 कोटींच्या घरात आहे.



सामान्य माणसांचे प्रश्न हाती घेत आहोत, असे भोळ्याभाबळ्या आदिवासींना सांगून त्यांना मुलभूत सुविधा व विकासापासून वंचित ठेवण्याचे काम नक्षली सातत्याने करीत आहेत. नक्षलग्रस्त भागाचा विकास झाला, तर आदिवासी प्रगत होतील व आपला जनाधार जाईल, याची भीती नक्षल्यांना नेहमीच वाटत आली आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील विकासकामे व कंत्राटदारांना जिवे मारण्याची धमकी देऊन नक्षल्यांनी गत 25 वर्षांत 15 कोटी 38 लक्ष 10 हजार 649 रूपयांच्या वाहनांचे नुकसान केले आहे. यात 103 ट्रक, 151 ट्रॅक्टर, 26 रोड रोलर, 33 टिप्पर यासह 104 इतर वाहने अशा 417 वाहनांचा समावेश आहे. नक्षल्यांनी सर्वाधिक नुकसान अलिकडेच म्हणजे दिनांक 21 एप्रिल 2014 रोजी अहेरी तालुक्यातील सिंधा ते दोडगीर रस्त्यावरील विकासकामांचे केले आहे. यावेळी नक्षल्यांनी 3 ट्रेलर, बारा चाकी ट्रक आणि क्रेनची जाळपोळ करून तब्बल 1 कोटी 20 लक्ष रुपयांच्या वाहनांची जाळपोळ केली आहे.
    1980 च्या दशकात पूर्व विदर्भातील गडचिरोली भागात नक्षलवादी चळवळीने हातपाय पसरायला सुरूवात केली. या भागात असलेल्या जंगलावर अधिराज्य गाजवून त्यांनी तेंदुपाने कंत्राटदारांकडून खंडणी मागणे सुरू केले. हळूहळू त्यांनी आपला मोर्चा विकासकामे करणा-या कंत्राटदारांकडे वळविला. जिवे मारण्याची भीती दाखवत व शस्त्रांच्या बळावर नक्षल्यांनी या विकासकामांना उधळून लावत वाहनांच्या जाळपोळीचे सत्र सुरु केले. सुरुवातीला तेंदूपत्ता ठेकेदारांकडून खंडणी गोळा करणे, वनविभागाचे लाकडी बिटे, सागवानाची तोडलेली झाडे जाळणे अशा कारवाया करत 1990 च्या दशकात नक्षल्यांनी रस्त्याच्या कामावरील खाजगी ठेकेदारांचे काम बंद पाडून त्यांच्या साहित्याची जाळपोळ करणे यालाच प्राधान्य दिले.
1989 मध्ये नक्षल्यांनी 3 ट्रक, 2 ट्रॅक्टर व एक मेटॅडोर अशी सहा वाहनांची जाळपोळ करून 14 लक्ष 64 हजार 866 रुपयांचे नुकसान केले. 1990 मध्ये 19 लक्ष 65 हजार रुपयांची 9 वाहने, 1991 मध्ये 17 लक्ष 41 हजार रुपयांची 9 वाहने,  1992 मध्ये 25 लक्ष 2 हजार रुपयांची 9 वाहने,  1993 मध्ये 14 लक्ष 57 हजार रुपयांची 13 वाहने, 1994मध्ये 42 लक्ष 75हजार रुपयांची 19 वाहने, 1995 मध्ये 3 लक्ष रुपयांचा एक ट्रक, 1996 मध्ये 67 लक्ष 90 हजार 600 रुपयांची 18 वाहने, 1997 मध्ये 33 लक्ष 75 हजार रुपयांची 10 वाहने,  1998 मध्ये 34 लक्ष 10 हजार रुपयांची 17 वाहने,  1999 मध्ये 28 लक्ष 50 हजार रुपयांची 11 वाहने, 2000 मध्ये 12 लक्ष 90 हजार रुपयांची 4 वाहने, 2001 मध्ये 48 लक्ष 74 हजार रुपयांची 17 वाहने,  2002 मध्ये 54 लक्ष 30 हजार रुपयांची 14 वाहने,  2003 मध्ये 69 लक्ष 70 हजार रुपयांची 20 वाहने,  2004 मध्ये 48 लक्ष 29 हजार रुपयांची 12 वाहने,  2005 मध्ये 54 लक्ष 21 हजार रुपयांची 19 वाहने, 2006 मध्ये 86 लक्ष 12 हजार रुपयांची 26 वाहने, 2007 मध्ये 38 लक्ष 92 हजार रुपयांची 13 वाहने, 2008 मध्ये 1 कोटी 31 लक्ष 20 हजार 577 रुपयांची 28 वाहने, 2009 मध्ये 2 कोटी 28 लक्ष 67 हजार 509 रुपयांची 43 वाहने, 2010 मध्ये 54 लक्ष 28 हजार 267 रुपयांची 15 वाहने, 2011 मध्ये 90 लक्ष 9 हजार रुपयांची 30 वाहने, 2012 मध्ये 68 लक्ष 71 हजार रुपयांची 19 वाहने,  2013 मध्ये 1 कोटी 19 लक्ष 65 हजार 550 रुपयांची 28 वाहने आणि यावर्षी 30 एप्रिल 2014 पर्यंत 1 कोटी 31 लक्ष रुपयांची 7 वाहने भस्मसात केली.  यात 103 ट्रक, 151 ट्रॅक्टर, 26 रोड रोलर, 33 टिप्पर यासह जेसीबी मशीन, ट्रॉली, पोकलँड मशीन, टँकर, जीप, राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस अशा 104 वाहनांसह एकूण 417 वाहनांचा समावेश आहे. खाजगी कंत्राटदारासोबत नक्षल्यांनी जिल्ह्यात बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनलासुध्दा लक्ष्य केले. आतापर्यंत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे 15 ट्रक, 10 टिप्पर, जेसीबी मशीन आणि जीप अशी 27 वाहनांची जाळपोळ करून संघटनेचे 1 कोटी 47 लक्ष 45 हजार रुपयांचे नुकसान केले आहे.
विशेष म्हणजे नक्षल्यांच्या आव्हानाला झुगारुन गडचिरोली जिल्ह्यात नागरिकांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या संख्येने मतदान केले. याचाच अर्थ येथील नागरिकांना लोकशाही आणि विकासाचे महत्व पटले आहे. त्यातच निवडणुकीदरम्यान पोलिस बंदोबस्त आणि प्रशासनाची चोख व्यवस्था यामुळे नक्षल्यांना हिंसक कारवाया करता आल्या नाहीत. त्यामुळे नैराश्य आलेल्या नक्षल्यांनी स्वत:चे अस्तित्व दाखविण्यासाठी पुन्हा विकास कामांना लक्ष करणे सुरु केले आहे. गडचिरोलीतील आदिवासी कोणत्याही विकास प्रक्रियेत सामील होऊ नये, असे नक्षल्यांना नेहमीच वाटत आले आहे. त्यामुळेच शासनाच्या विविध विकासकामांना विरोध करून आदिवासी बांधवांना मुलभुत गरजांपासून दूर ठेवण्याचे काम नक्षलवादी सातत्याने करीत आहेत. म्हणूनच नक्षल्यांचा प्रतिकार करण्याची वेळ आली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.