Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, फेब्रुवारी ०९, २०१४

राजुरा येथे महिला सन्मान संमेलन

चंद्रपूर- येत्या १५ व १६ फेब्रुवारीला राजुरा येथे मुक्तांगण संस्थेच्या महिला सन्मान संमेलन आयोजित करण्यात आले असून, संमेलनाध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध कवियित्री उषाकिरण आत्राम उपस्थित राहतील. या संमेलनात महिलांच्या विविध प्रश्नांवर तसेच सद्यपरिस्थितीवर चर्चा करण्यात येणार आहे. संमेलनाचे उद््घाटन सुपरिचित विचारवंत व लेखक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष वंदनाताई वामनराव चटप आहेत.

पहिल्या दिवशी सकाळी १0 वाजता रस्त्यांवरून महिला सन्मान दिंडी काढण्यात येणार आहे. दुपारी १२ वाजता या संमेलनाचे उद््घाटन साहित्यिक अमर हबीब यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, खा. हंसराज अहीर, आ. सुभाष धोटे, आ. मितेश भांगडिया, माजी राज्यमंत्री रमेश गजबे, माजी आ. प्रभाकरराव मामुलकर, माजी आ. अँड. वामनराव चटप, माजी आ. सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष आरती चिल्लावार, उपनगराध्यक्ष अरुण धोटे, डॉ. अशोकराव जिवतोडे, राजेंद्र वैद्य आदींची उपस्थिती राहील.

माजी आ. सरोज काशीकर, सामाजिक कार्यकर्त्या अँड. पारोमिता गोस्वामी यांना विशेष निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आले आहे. यावेळी समाजसेविका कौसल्याबाई लढी यांना विदर्भरत्न व नागपूर येथे मुस्लिम महिलांच्या उत्थानासाठी काम करणार्‍या रूबिनी पटेल व सामाजिक जाणिवेतून फोटोग्राफी करणार्‍या संगीता महाजन यांना क्रांतिज्योती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेतर्फे एक स्मरणिकाही प्रकाशित करण्यात येईल. उद््घाटन सोहळ्यानंतर स्त्री-काल, आज आणि उद्या या विषयावर परिसंवाद होणार आहे.

या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब हे राहणार असून, या परिसंवादात यशदाचे प्रशिक्षक निलीमा काळे, जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. दिलीप चौधरी, प्रा. विजया मारोटकर नागपूर हे विचारपुष्प गुंफणार आहेत. याच दिवशी सायंकाळी ७ वाजता अध्ययन भारती वर्धा यांची निर्मिती असलेले नाटक दाभोळकरच भूत सादर करण्यात येणार आहे. नाटकाचे लेखक शाम पेटकर व दिग्दर्शक हरीश इथापे आहेत.

दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता पहिल्या सत्राला सुरुवात होणार असून, यात कुटुंबसंस्था आणि बालसंस्कार या विषयावर महिलांना प्रशिक्षणपर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सत्राचे अध्यक्ष सुप्रसिद्ध विचारवंत दिलीप सोळंकी हे राहणार असून, यात अमरावती येथील निलीमा काळे व बुलडाण्याचे नरेंद्र लांजेवार हे मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी ११ वाजता डॉ. सुधा भालधुरे यांच्या अध्यक्षतेखाली महिला मुक्तीच्या मार्गातील अडसर र्शद्धा-अंधर्शद्धा या विषयावरील परिसंवाद होणार आहे. यात अमरावतीच्या ज्योती तोटेवार, नागपूरच्या मंजुषा सावरकर व चंद्रपूरच्या अर्चना चौधरी व राजुर्‍याच्या प्रा. डॉ. संजय गोरे हे मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी २ वाजता ज्वलंत विषयाला हात घालणारा किती 'आरुषी निर्भया 'या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. रजनी हजारे हे राहणार असून, यात अमरावतीच्या रजिया सुलताना, नागपूरच्या अरुणा सबाने, चंद्रपूरच्या प्रा. जयश्री कापसे-गावंडे हे विचारपुष्प गुंफणार आहेत. सायंकाळी ५ वाजता या संमेलनाच्या समारोप होईल.

यावेळी वेगवेगळ्या विषयावरील ठराव घेण्यात येणार आहेत. या संमेलनात मोठय़ा संख्येने उपस्थित राहून संमेलन यशस्वी करण्याचा हातभार लावावा, असे आवाहन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.