Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, सप्टेंबर १३, २०१३

बिबट वैजापुरात घुसला .......सात जण गंभीर

 तळोधी (बा.)- ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणार्‍या नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) नजीकच्या वैजापूर, येनुली, कोसंबी, धामणगाव (चक) व अन्य गावात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. आज गुरुवारला चवताळलेला बिबट वैजापुरात घुसला आणि त्याने सात जणांना गंभीर जखमी केले. या घटनेने परिसरातील गावातील नागरिकांत दहशतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी रेटून धरली आहे. 
ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या वैजापूर, येनुली, कोसंबी, धामणगाव (चक) या गावालगत मोठय़ा प्रमाणात झुडपी जंगल आहे. मागील पंधरा दिवसांपासून या परिसरातील शेतशिवारात काम करणार्‍या नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत होते. तर कधी शेतात ठसे उमटलेले दिसायचे. याबाबतची माहिती गावकर्‍यांनी वनविभागाला दिली. या परिसरात पिंजरे लावून तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा अनूचित प्रकार घडण्यास वेळ लागणार नाही, अशी शक्यताही गावकर्‍यांनी वनाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र वनाधिकार्‍यांनी गावकर्‍यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. आठवडाभर गावतलावापर्यंत येणारा बिबट आज थेट गावात शिरला. बिबटने गावातील रमेश नेवारे यांच्या गोठय़ातील शेळय़ा फस्त केल्या. बिबट्याला हाकलून लावणार्‍या दिलीप कुंभारे, महादेव पर्वते, सुरेश थेरकर, पितांबर कापगते, देवराव सिडाम, फारूख शेख यांना गंभीर जखमी केले. घटनेची माहिती गावकर्‍यांनी वनाधिकार्‍यांना दिल्यानंतर वनाधिकार्‍यांची चमू गावात दाखल झाली. बिबट्याला पकडण्यासाठी तीन पिंजरे लावले. मात्र उशिरापर्यंत गावालगतच्या झुडपी जंगलात बिबट्याने ठाणच मांडले होते. वनाधिकार्‍यांना बिबट्याला जेरबंद करण्यात अपयश आले. बिबट्याच्या धुमाकूळामुळे नागरिकांत आता दहशतच पसरली आहे. शेतशिवारात काम करताना नागरिकांना आता तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून जखमींना आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.