Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑगस्ट ०४, २०१३

निम्मी तुझी निम्मी माझी

Inline image 1
एकांकिका संग्रह
.डॉ. मुरलीधर जावडेकर.    


डॉ. मुरलीधर जावडेकरांच्या एकांकिकांचा हा संग्रह आपल्याला देताना आम्हाला खूप आनंद होत आहे. यातली प्रत्येक एकांकिका नाविन्यातून आणि विचारमंथनातून जन्माला आली आहे. यात कर्ण आणि कृष्णाचा हृदयाचा ठाव घेणारा संवाद आहे. यात “निम्मी” सारखी खुसखूशीत मजेदार एकांकिका आहे. “विमानात लोकशाही” सारखी एकांकिका गंमत करता करता डोळ्यांत अंजन टाकते. वेड्यांच्या इस्पितळाच्या माध्यमातून त्यांची एकांकिका अजच्या राजकीय वास्तबावर टिप्पणी करते. “अपघात” मधून ते उच्च दर्जाच्या नाट्याची अनुभूती देतात. त्यांची राजकीय मतं जरी सर्वांना मान्य झाली नाहीत तरी त्यामागची तळमळ प्रत्येकाला जाणवेल. या सर्वच एकांकिका प्रयोगासाठी उपयुक्त असून दोन ते बारा जणांचे ग्रुप या नाटुकल्या बसवू शकतात. (मात्र यासाठी लेखकाची लेखी परवानगी आवश्यक आहे). एकूणच या एकांकिकासंग्रहातून डॉ. जावडेकरांच्या प्रतिभेचा साक्षात्कार झाल्यावाचून रहात नाही.

Inline image 2

एके काळी मुंबई-पुणेसारख्या शहरांत एकवटलेला मराठी वाचकवर्ग आता जगाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आहे. ई साहित्य प्रतिष्ठानच्या वाचकवर्गात जसा ओमान, नॉर्वे, कझाखस्थानचा मराठी तरूण वाचक आहे तसा महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांतलाही युवा वाचक आहे. मराठी पुस्तकांचं वितरण सर्वत्र शक्य होत नाही. पण स्मार्ट मोबाईल मात्र आता घरोघर पोचले आहेत. आणि त्यावर ई साहित्य प्रतिष्ठानची ई पुस्तकं वाचता येतात. वॉट्स ऍप आणि ब्ल्यु टूथ द्वारे ही पुस्तकं एकमेकांना फ़ुकट आणि सहज देता येतात. त्यामुळे अशा वाचकांची फ़ार मोठी सोय होत आहे. ई साहित्य प्रतिष्ठानची ईज्ञानेश्वरी आणि मोरया सारखी पुस्तकं दशलक्षावधी वाचकांपर्यंत पोहोचली. याचं कारण या माध्यमाची सहजता. ई माध्यमातून दर्जेदार सकस वाचनीय साहित्य नव्या पिढीला उपलब्ध करून देण्याचा एक महायज्ञच आम्ही उभारला आहे. आणि त्याला आपली साथ मिळाली तर यातून काही भव्य उभे राहील.
ई साहित्य प्रतिष्ठानतर्फ़े नव्या तरूण वाचकांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न आहे हे खरेच. पण त्याला ज्येष्ठ लेखकांची जोड मिळाली तर त्यातून या चळवळीचा फ़ायदाच आहे. डॉ. मुरलीधर जावडेकरांनी आपली सर्व २५ पुस्तकं ई वितरणासाठी मराठी वाचकांना विनामूल्य उपल्ब्ध करून दिली आहेत. डॉ. मुरलीधर जावडेकरांचे उदाहरण घेऊन जर इतर साहित्यिकांनी आपली ग्रंथसंपदा ई प्रसारणासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली तर त्यातून मराठी साहित्याचा फ़ायदाच होईल. सर्व प्रथितयश लेखक-कवींना आम्ही हे आवाहन करतो की त्यांनी या नवीन माध्यमाच्या विस्ताराचा विचार करावा. मुख्य म्हणजे ई पुस्तक हे “नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहती पावकः” असे अविनाशी असल्यामुळे आपल्यानंतरच्या पन्नास पिढ्यांपर्यंत ते सुखरूप असणार याचाही विचार करावा. याच्या निर्मितीचा अत्यल्प खर्च आणि पर्यावरणाची हानी न होता त्याचा प्रसार हा व्यापक विचारही मनात धरावा. आणि या चळवळीला पाठिंबा म्हणून आपली पुस्तकं वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावीत. अर्थात विनामूल्य. ई साहित्य प्रतिष्ठान ना पैसे घेत ना देत.
हे व्यासपीठ तरूण नवलेखकांसाठी तर स्वतःचेच मुक्तद्वार आहेच आहे. आपल्या लिखाणात कितपत दम आहे याचा लेखाजोखा घेण्यासाठी याहून अधिक चांगले माध्यम नाही. कारण वाचकांच्या स्पष्ट प्रतिक्रिया इंटरनेटवर जशा मिळतात तशा आणि त्या संख्येने समोरासमोर मिळण्याची शक्यता कमीच. नवीन लेखकांनी स्वतःच्या करियरची सुरुवात ई पुस्तकांतूनच करावी.
वाचकांनीही आपली जबाबदारीचा वाटा उचलावा. आपल्या ओळखीच्या आठ वाचकांचे ई मेल पत्ते आम्हाला कळवावे. त्यायोगे हा वृक्ष बहरत जाईल. आज पावणेदोन लाखांच्या घरात असलेला ई साहित्य प्रतिष्ठानचा वाचकवर्ग लवकरच दहा ते बारा लाखांपर्यंत पोहोचावा हे उद्दिष्ट आहे. बारा लाख म्हणजे फ़ार नाही. बारा कोटी मराठी माणसाचा फ़क्त एक टक्का. तेवढा तरी आपण कव्हर करू या. तेवढे तरी वाचक आपण जमा करू या. त्यांना नवीन आणि जुन्या चांगल्या लेखकांचे भारी भारी साहित्य देऊ या. वाचन संस्कृतीला मोबाईलच्या स्मार्ट युगात नेऊया.
ई साहित्य प्रतिष्ठानचं तिनशेवं ई पुस्तक लवकरच येत आहे. चार साडेचार वर्षांत तिनशे पुस्तकं. पावणेदोन लाख वाचक. साताठ लाख वेबसाईट व्हिजिट्स. बारा लाखांचं उद्दिष्ट.
कोण म्हणतो मराठी भाषेचं काही खरं नाही?
esahity@gmail.com

हे पुस्तक कसे वाटले ते नक्की कळवा.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.