शहरातील 585 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत
चंद्रपूर दि.03- चंद्रपूर जिल्हयात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराने वेढलेल्या भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे महत्वपूर्ण कार्य बचाव व मदत कार्य पथकाने व नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाने केले असून चंद्रपूर शहरातील 585 कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केले आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी बचाव व मदत कार्य पथकाचे 22 सदस्य अहोरात्र काम करीत आहेत.
बचाव कार्यासाठी नॅशनल डिजास्टर रिस्पांन्स फोर्सचे (NDRF) 40 सदस्यीय पथक चंद्रपूर येथे दाखल झाले असून त्यापैकी काही सदस्य राजूरा येथे तर काही सदस्य चंद्रपूर येथे बचाव कार्य करणार आहेत. या पथकाकडे चार बोटी, 4 वाहन, 30 लाईफ बोट, 55 लाईफ जॉकेट एवढे साहित्य असून पावसाळा संपेपर्यंत हे पथक चंद्रपूर येथेच राहणार आहे.
चंद्रपूर मधील रहेमत नगर, सिस्टर कॉलनी, ओंकार नगर, हवेली गार्डन, विठ्ठल मंदीर वार्ड, बिनबा गेटचा परिसर, भंगाराम वार्ड व राजनगर, बल्लारपूर मधील किल्ला वार्ड, गणपती वार्ड, सिध्दार्थ वार्ड व जुन्या वस्तीमध्ये पाणी सिरले आहे. या भागातील नागरीकांना प्रशासनाच्या तीन चमुने चार बोटीच्या सहायाने सुरक्षित स्थळी हलविले आहे. बचाव कार्यासाठी जिल्हयात 14 बोटी, 310 लाईफ जॉकेट, 105 लाईफ बॉय व 432 स्विमररींग उपलब्ध आहेत.
अशोक गर्गेलवार यांच्या नेतृत्वातील बचाव पथकाने जिवती, आरवट, राजनगर, सिस्टर कॉलनी, बाबुपेठ, राजूरा, हवेली गार्डन आदि ठिकाणच्या 900 च्या वर लोकांना सुरक्षित स्थळी हलविले. बाबुपेठ येथील एका शाळेच्या 180 मुलांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रशंनिय कार्य या पथकाने केले.
राज्याच्या भौगोलिक रचनेत चंद्रपूर जिल्हा पूर्वभागात आहे. चंद्रपूर जिल्हयाच्या पश्चिमेश यवतमाळ, उत्तरेश वर्धा, नागपूर व भंडारा, पूर्व दिशेला गडचिरोली तर दक्षिणेश आंध्र राज्यातील आदिलाबाद जिल्हा आहे. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा व इरई या चार प्रमुख मोठया नदया जिल्हयातून जातात. या नदीतील परतीच्या पाण्याने नदी काठावरील गावांना पुराचा धोका संभवतो. जिल्हयात झालेल्या पूरपरिस्थितीला हे कारण अधिक प्रमाणात आहे.
इरई, वर्धा, पैनगंगा, उमा व वैनगंगा या नदयांना आलेल्या पूराचा परिणाम चंद्रपूर शहरासह जिल्हयातील मूल, राजूरा, बल्लारपूर, गोंडपिपरी, पोंभूर्णा, भद्रावती या ठिकाणी होतांना जानवते. गोसीखूर्द प्रकल्पातून पाण्याचा अति विर्सग सोडल्यामुळे चंद्रपूर जिल्हयातून वाहणा-या नदयातील पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे चंद्रपूरातील आठ वस्त्यात पाणी शिरले.
चंद्रपूर शहरातील वस्त्यात पाणी घुसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या बचाव व राहात कार्य पथकाने 585 कुटुंबातील 2251 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. बचाव राहात कार्य सुरुच असून प्रशासनाच्या तीन चमुचे 22 सदस्य हे कार्य करत आहे. बचाव व राहत कार्यात स्वयंसेवी संस्था प्रशासनास मोलाचे सहकार्य करीत आहेत. जिल्हा नियंत्रण कक्षात नागरिकांनी फोन केल्यास बचाव पथक तात्काळ उपलब्ध करुन दिल्या जाते.
पूरात अडकलेल्या नागरिकांना शहरातील 22 ठिकाणी स्थलांतरीत केले असून जिल्हा प्रशासनातर्फे त्यांची व्यवस्था पाहली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, तहसिलदार गणेश शिंदे व आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे यांनी स्थलांतरीत नागरिकांच्या शिबीरांना भेटी देवून व्यवस्थेची पाहणी केली आहे.