Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २८, २०१३

बळिराजाचे अश्रू न पुसताच मुख्यमंत्री परतले

नुकसानग्रस्त शेतीची पाहणीही केली नाही 

देवनाथ गंडाटे
Sunday, July 28, 2013
चंद्रपूर : अतिवृष्टी आणि पुरामुळे चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला असतानाही त्यांच्या अश्रूंकडे दुर्लक्ष करून शनिवारी (ता. 27) चंद्रपूर शहराच्या भेटीची केवळ औपचारिकता पूर्ण करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माघारी फिरले. यामुळे तब्बल 40 हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जातील की काय, अशी साशंकता व्यक्त होत आहे. 
एक लाख 26 हजार हेक्‍टर शेतीला फटका बसल्यामुळे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री चव्हाण शनिवारी दुपारी जिल्ह्यात आले; मात्र शेतकऱ्यांच्या बांधावर भेट टाळत हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा न देताच ते परत गेले, त्यामुळे दौरा केवळ अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या भेटीपुरताच ठरला. 
अतिवृष्टीमुळे बेजार झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी स्थानिक आमदारांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. त्यानुसार प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत व पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम विमानाने येथे आले होते. 
दौरा कार्यक्रमानुसार मुख्यमंत्री नुकसानग्रस्त शेतीला भेट देणार होते; मात्र विमान मोरवा विमानतळावर उतरल्यानंतर ते सरळ शहरात गेले. इंदिरानगर आणि रहेमतनगर या दोन पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर त्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात गेला. तिथे अधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्र्यांना दिली. त्यानंतर मंत्रिमहोदयांनी पत्रकारांशी संवाद साधला. मात्र, शहरातील पूरग्रस्त भागाव्यतिरिक्त शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याविषयी कोणतीही घोषणा केली नाही. जिल्ह्यातील 546 गावे पुरामुळे बाधित झाली असून, सुमारे एक लाख 26 हजार हेक्‍टर शेतीचे नुकसान झाले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी पुरात बुडालेल्या शेतीची पाहणी करण्याचे टाळले.

कृषी सभापती, आमदार ताटकळत 
शेतीच्या हानीची पाहणी करण्यासाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी गेलेल्या कृषी सभापती अरुण निमजे आणि आमदार नाना श्‍यामकुळे यांना ताटकळत राहावे लागले. दोन्ही पदाधिकाऱ्यांनी आपला परिचय दिल्यानंतरही पोलिसांनी जाऊ दिले नाही. कृषी सभापती अरुण निमजे हे जिल्हाधिकारी कार्यालयात, तर आमदार श्‍यामकुळे हे विमानतळावर पुष्पगुच्छ घेऊन ताटकळत होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.