लोकसभेची निवडणूक होण्याआधीच पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी भाजपशी युती तोडण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांना लोकसभेसाठी निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख केल्यामुळे नितीशकुमार भाजपवर नाराज झाले आहेत.
मोदींना राजकीय स्पर्धक मानणा-या नितीशकुमार यांनी मोदींच्या हाती महत्त्वाची जबाबदारी येताच भाजपशी असलेली युती तोडण्याचे संकेत दिले आहेत. आजपासून (बुधवार) संयुक्त जनता दल (जेडीयु) पक्षाचे दोन दिवसांचे अधिवेशन कटिहार येथे सुरू झाले आहे. या अधिवेशनादरम्यान जेडीयु-भाजप युतीचे भवितव्य निश्चित होईल, असे नितीश समर्थक सांगत आहेत. मात्र संयुक्त जनता दल (जेडीयु) पक्षाचे अध्यक्ष शरद यादव यांनी अद्याप युती तोडण्याबाबतचा निर्णय घेतलेला नाही. पक्षातील सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे शरद यादव यांनी सांगितले. नितीशकुमार समर्थक मात्र नरेंद्र मोदी यांच्याशी नेत्याशी जुळवून घेणे अवघड असल्याचे बोलत आहेत.
दरम्यान, नितीशकुमार यांच्या हालचाली भाजपमध्येही नाराजी पसरली आहे. भाजपशी असलेली युती तोडायचीच असेल तर नितीशकुमार यांनी आधी बिहारच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा; अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सी. पी. ठाकूर यांनी केली आहे.