चंद्रपूर- ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पात शनिवारी बुद्ध पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रात वन्यप्राणी प्रगणना केली जाणार आहे . यासाठी वनविभागाचे सुमारे २५० अधिकारी - कर्मचारी या कामासाठी गुंतले असून १५२ अशासकीय स्वयंसेवकांची मदत घेतली जाणार आहे . यंदा प्राणी गणनेत चंद्रपूर शहरातील हिंदी इंग्रजी आणि मराठी पत्रकार आणि टीव्ही माध्यमांचे प्रातिनिधी सहभागी झाले आहेत
वन्यप्राणी प्रगणना शनिवारी सकाळी १० वाजतापासून ताडोबा , मोहर्ली व कोळसा वनपरिक्षेत्रात होणार असून ती रविवारी सकाळी १० वाजतापर्यंत चालणार आहे . पाणवठ्यांजवळील मचाणींवर बसून ही प्रगणना होणार आहे . प्रत्यक्षात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांची गणना केली जाणार आहे . प्रगणना सुरू असताना पर्यटकांना प्रकल्पात प्रवेशबंदी नसून त्यांचे पर्यटन सुरू राहणार आहे . मोहर्ली सभागृहातील ८० मार्गदर्शक ( गाईड ) यांना ताडोबाचे क्षेत्र संचालक वीरेंद्र तिवारी यांच्या हस्ते शुक्रवारी संपूर्ण गणवेश वाटप करण्यात आले .