ब्रह्मपुरी- वन विभागांतर्गत येणाऱ्या सायगाटाच्या जंगलात तेंदूपाने तोडण्यासाठी गेलेल्या रेखा सोनटक्के (३५) हिचा पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सात वाजता घडली. गेल्या दोन महिन्यातील वाघ व बिबटय़ाच्या हल्ल्यातील हा बारावा बळी आहे. मूळची नागभीड तालुक्यातील पानोळी येथील रहिवासी असलेली रेखा सोनटक्के ही उन्हाळय़ात ब्रह्मपुरी तालुक्यातील मौशी येथे माहेरी आली होती. सध्या तेंदूपानांचा हंगाम सुरू असल्याने गावातील काही महिलांसोबत ती पाने तोडण्यासाठी जंगलात जात होती. आज पहाटे ५.३० वाजता ती गावातील महिलांसोबत तेंदूपाने तोडण्यासाठी सायगाटाच्या जंगलात गेली होती. तेंदूपाने तोडत असतानाच कक्ष क्रमांक ११८ मध्ये पट्टेदार वाघाने अचानक हल्ला करून रेखाच्या नरडीचा घोट घेतला. वाघाने तिचा गळा जबडय़ात पकडताच जोरदार किंचाळी मारली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून सोबतच्या सर्व महिलांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. यावेळी वाघाने तिला जबडय़ात पकडले होते. समोर महिला व पुरुषांना बघून वाघ रेखाला जखमी अवस्थेत तिथेच सोडून जंगलात पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत रेखाला प्रथम ब्रम्हपुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती ब्रह्मपुरीचे उपवनसंरक्षक संजय ठवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच सहायक वन परिक्षेत्राधिकाऱ्यांना देण्यात आली. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी रेखाची प्रकृती गंभीर असल्याचे लक्षात घेऊन प्राथमिक उपचारानंतर नागपूर मेडिकल कॉलेजला हलविण्यात आले. दुपारी बारा वाजताच्या सुमारास नागपूर मेडिकल कॉलेजला पोहोचल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद देण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. वाघाचा हल्ला होण्याच्या काही मिनिट पहिले सायगाटाच्या चौकीदाराने रेखा व तिच्या इतर महिला सहकाऱ्यांना त्या परिसरात जाऊ नका, तेथे वाघ आहे, असे बजावले होते. मात्र चौकीदाराच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष केल्यानेच रेखाचा मृत्यू झाला, अशी माहिती उपवनसंरक्षक संजय ठवरे यांनी 'लोकसत्ता'शी बोलताना दिली. मृत रेखाच्या कुटुंबीयांना वन खात्याने दहा हजारांची तातडीची मदत दिली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीप्रमाणे हल्लाखोर वाघ हा पूर्णवाढ झालेला होता. दरम्यान, गेल्या दोन महिन्यात वाघ व बिबटय़ाने घेतलेला हा १२ वा बळी आहे. कडक उन्हामुळे वाघ जंगलाच्या बाहेर पडत आहेत आणि याच वेळी तेंदूपानांचा हंगामही सुरू आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी तेंदू गोळा करण्यासाठी समूहाने जावे, असे आवाहन वन खात्याने केले आहे.
हल्ल्यातील बळी
२४ मार्च - अनुसया शेंडे, पालेबारसा ता. सावली.
६ एप्रिल - ध्रुपदा मडावी, सादागड ता. सावली.
१० एप्रिल - तुकाराम धारणे व मालन मुनघाटे, आगरझरी ता. चंद्रपूर.
११ एप्रिल - ललिता पेंदाम, पाथरी ता. सावली.
१२ एप्रिल - नीलिमा कोटरंगे, चोरगाव ता. भद्रावती.
१७ एप्रिल - कीर्ती काटकर, पायली ता. चंद्रपूर.
१८ एप्रिल - गोपिका काळसर्पे, किटाळी ता. चंद्रपूर.
७ मे - अज्ञात मनोरुग्ण महिला
१० मे - राजू अलकंटीवार, चंद्रपूर
१० मे - अनोळखी महिला, ब्रम्हपुरी
१६ मे - चरणदास लकडे, बाबानगर, चंद्रपूर
२३ मे - रेखा सोनटक्के, ब्रम्हपुरी
२४ मार्च - अनुसया शेंडे, पालेबारसा ता. सावली.
६ एप्रिल - ध्रुपदा मडावी, सादागड ता. सावली.
१० एप्रिल - तुकाराम धारणे व मालन मुनघाटे, आगरझरी ता. चंद्रपूर.
११ एप्रिल - ललिता पेंदाम, पाथरी ता. सावली.
१२ एप्रिल - नीलिमा कोटरंगे, चोरगाव ता. भद्रावती.
१७ एप्रिल - कीर्ती काटकर, पायली ता. चंद्रपूर.
१८ एप्रिल - गोपिका काळसर्पे, किटाळी ता. चंद्रपूर.
७ मे - अज्ञात मनोरुग्ण महिला
१० मे - राजू अलकंटीवार, चंद्रपूर
१० मे - अनोळखी महिला, ब्रम्हपुरी
१६ मे - चरणदास लकडे, बाबानगर, चंद्रपूर
२३ मे - रेखा सोनटक्के, ब्रम्हपुरी