110 शेततळयाचे काम पूर्ण
650 हेक्टर ढाळीचे बांध बांधले
चंद्रपूर दि.18- विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमाअंतर्गत महालगांव परिसरात निर्माण करण्यात आलेले शेततळे शेतक-यांसाठी आदर्श ठरणार असून शेततळयामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होवून सोयाबीन, कापूस व हरभरा पिकास नवसंजीवनी मिळेल असे मत पालकमंत्री संजय देवतळे यांनी व्यक्त केले.
कृषी विभागाच्या वतीने महालगांव येथे तयार करण्यात आलेल्या बांधबंधीस्त, ढाळीचे बांध व शेततळयाची पाहणी आज पालकमंत्री संजय देवतळे यांनी केली. त्यावेळी त्यांचेसोबत जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील, उपविभागीय अधिकारी भुगावकर, कृषी विभागाचे उपविभागीय अधिकारी शिवचरण राजवाडे व इतर अधिकारी उपस्थित होते. गोसावी विटू ठेंगणे, अशोक घोडमारे व विनोद देवराव राऊत यांच्या शेतात जावून पालकमंत्र्यांनी शेततळे, चर व बांधबंधिस्ताच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.
कोरडवाहू क्षेत्रातील शेतक-यांसाठी विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रम असून उत्पादकता वाढविण्याच्या दृष्टीने हा विशेष कार्यक्रम केवळ विदर्भात राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत वरोरा तालुक्यातील महालगांव शिवारात कृषी विभागाच्या वतीने बांध बंधिस्त व शेततळयाचा विशेष कार्यक्रम राबविला आहे. या अंतर्गत 110 शेततळी, 650 हेक्टर ढाळीचे बांध बांधण्यात आले. शेतक-यांना 135 रिजर, 7 डिझल पंप, 50 ओपनवेल सबमर्सिबल पंप व 35 तुषार संच वाटप करण्यात आले. या कामाची पाहणी केल्यानंतर बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, कोरडवाहू भागात केवळ एक पिक घेणा-या शेतक-यासाठी शेततळे आर्थिक उन्नतीचे साधन ठरत आहे.
महालगांवातील शेतक-यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून शेततळयाच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यासाठीचे अभिनंदनीय पाऊल उचलले आहे. या शेततळयामुळे पाण्याची पातळी वाढण्यास निश्चितच मदत होईल व याचे परिणाम दोन वर्षात भरघोष पिकाच्या रुपाने दिसायला लागतील.
या पाहणी दौ-यानंतर कृषी विभागाने आयोजित केलेल्या शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, केवळ शेततळे उभारुन किंवा बांध बंधिस्त करुन उत्पादन वाढणार नाही तर त्यासाठी शेतक-यांनी नवनवीन प्रयोग करणे आवश्यक आहे. ज्या शेतक-यांनी नवीन प्रयोग करुन भरघोष उत्पादन घेतले अशा शेतक-यांच्या शेतांना भेटी देवून त्यांनी राबविलेल्या नव्या प्रयोगाचे अनुकरण करायला हवे. पारंपारिक शेती पध्दतीत बदल करणे काळाची गरज असून शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेत प्रयोगशील शेती करावी असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात शत्रुघ्न पुसनाके यांना डिझल इंजिन, वामनराव माकोडे यांना रिजर व प्रमोद आवारी यांना तुषार संचासाठी धनादेश पालकमंत्री संजय देवतळे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, या परिसरातील शेतक-यांची प्रयोगशीलता जिल्हयातील शेतक-यांसाठी अनुकरणीय आहे. उत्पादन वाढवायचे असल्यास मानसिकता बदलणे गरजेचे आहे व हा बदल महालगांवच्या शेतक-यांनी घडवून आणला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवचरण राजवाडे यांनी केले.