Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ०६, २०१३

पत्रकारीतेतून प्रतिष्ठा व सन्मान वाढेल याची काळजी घ्या ---- जिल्हाधिकारी विजय वाघमारे


        पत्रकार कार्यशाळेचे उदघाटन
    चंद्रपूर दि.06- आजचे वृत्तपत्र हे उदयाची रद्दी आहे असे म्हटले जात असले तरी वृत्तपत्रातील  विचार चिरंतन असून व्यवस्था परिवर्तनाची क्षमता वृत्तपत्रात आहे त्यामुळेच आपल्या लेखनीतून व बातमीतून आपली प्रतिष्ठा व सन्मान वाढेल याची काळजी पत्रकारांनी घ्यावी असे मत जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी व्यक्त केले. चंद्रपूर-गडचिरोली श्रमिक पत्रकार संघ व जिल्हा माहिती कार्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद हे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी दीप प्रज्वलन करुन  कार्यशाळेचे उदघाटन केले. यावेळी बोलतांना वाघमारे म्हणाले की,  शासन, प्रशासन व माध्यम यांनी समन्वयांने काम केल्यास विकासाला ख-या अर्थाने नवी दिशा मिळू शकेल. पत्रकारितेसमोर अनेक नवे आव्हाने उभी असून नव्या माध्यमांना सामोरे जातांना अद्ययावत राहण्यासाठी संशोधन वृत्ती व वाचन वाढविण्यावर भर दयावा असे ते म्हणाले. आपल्या अवतोभोवती चांगले काम करणारे असंख्य लोक असतात त्यांना प्रकाश ज्योतात आणण्याचे काम ग्रामीण पत्रकारांनी करावे अशी अपेक्षा वाघमारे यांनी व्यक्त केली.
    पत्रकारांनी आपला जनसंपर्क विविधांगी ठेवावा सोबतच वेगवेगळया विषयात काम करणा-या लोकांसोबत सातत्याने विचार विनिमय व चर्चा करावी म्हणजे आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतील त्याचा उपयोग सकस बातमीदारी साठी होईल असे ते म्हणाले. पत्रकारांनी माहितीचे दूत व्हावे तसेच आपल्या व्यवसायाप्रती प्रामाणिक व सजग राहून सामान्य माणसांचे प्रश्न व समस्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडाव्यात असे ते म्हणाले.
    इंटरनेट व इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या युगात प्रिंटमिडीयाचे महत्व अबाधीत असून आजही छापिल मजकूरावर विश्वास ठेवणा-यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या विश्वासाला तडा न जावू देता पत्रकारिता केल्यास पत्रकार व नागरीक यांच्यातील विश्वासार्हता टिकून राहिल असे मत जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते यांनी व्यक्त केले.  विकास पत्रकारितेवर अधिक भर दयावा असे सांगून ते म्हणाले की, चांगले काम करणा-या अधिकारी व नागरीकांना अर्वाजून प्रसिध्द दया त्यामुळे त्यांच्या कार्याची इतरांना प्रेरणा मिळेल.
    ग्रामीण भागात काम करतांना पत्रकारांना अनेक भुमिका निभवाव्या लागतात अशा कठिण प्रसंगी पत्रकारांनी सयमीत राहून पत्रकारीता करावी असे पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळ हुनगुंद यांनी अध्यक्षीय भाषणात सांगीतले.  सध्याची पत्रकारिता अतिशय गतीमान व तांत्रिकदृष्टया विकसीत असून पत्रकारितेच्या नव्या युगात टिकायचे असेल तर ज्ञान अद्ययावत ठेवणे गरजेचे आहे.  ही गरज ओळखूनच आजच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून पत्रकारांनी या कार्यशाळेच्या माध्यमातून  पत्रकारितेच्या नव्या युगाला समजून घ्यावे व त्याचा वाफर आपल्या लिखानात करावा असे ते म्हणाले.
    नवी माध्यमे झपाटयाने विकसित होत असून पत्रकारिता करीत असतांना  नव्या माध्यमांचा  अभ्यास व उपयोग यासाठी या  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे पत्रकार संघाचे सचिव संजय तुमराम यांनी प्रास्ताविकात सांगितले.  दोन दिवस चालणा-या या कार्यशाळेत पत्रकारितेच्या अनुशंगाने अनेक मान्यवर आपले विचार मांडणार असून त्यांचे अनुभव यानिमित्ताने ऐकायला मिळणार आहेत असे त्यांनी सांगितले.  सोबतच तणाव व्यवस्थापन या नव्या विषयाचा समावेश या कार्यशाळेत करण्यात आला आहे. त्याचा उपयोग ताणतणाव निवारणासाठी नक्कीच होईल असे तुमराम यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आशिष आंबाडे यांनी केले तर आभार मंगेश खाटीक यांनी मानले.
                                                  000   

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.