बहारदार गाण्यांच्या सप्तसुरात रसिक चिंब भिजले
गाण्यांना वन्स मोर ची हाक..... रसिकांनी दिली भरभरून दाद....
गाण्यांना वन्स मोर ची हाक..... रसिकांनी दिली भरभरून दाद....
चंद्रपूर दि.२३ : पधारो म्हारे देश.....नगमे है शिकवे है किस्से है बाते है....चंदा रे चंदा रे कभी तो जमी पे आ......पत्ता पत्ता बुटा बुटा..., मेरे पास है तु..., चप्पा चप्पा चरखा चले...अशा एकाहून एक विविध बहारदार गाण्यांचा नजराना सुप्रसिध्द पाश्र्वगायक हरिहर यांनी सादर करून चंद्रपूरकरांना मंत्रमुग्ध केले. हरिहरन यांच्या गायनाच्या सप्तसुरात रसिक चिंब भिजले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनी गाण्यांचा आस्वाद घेऊन टाळ्यांचा जोरदार गजर केला. वन्स मोर ची हाक देऊन विविध गीतांना भरभरून दाद दिली. चंद्रपूरकरांना या संगीत मैफीलीता योग आला तो सांस्कृतिक तथा ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित केलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवाचे उदघाटन माजी केंद्रीय राज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय वाघमारे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, पोलिस अधिक्षक राजीव जैन, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एच. डहाळकर, गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील, अहेरीचे उपविभागीय अधिकारी दयासिंग चौधरी, गडचिरोली येथील परिविक्षाधीन भारतीय प्रशासन सेवेचे अधिकारी आस्तिककुमार पांडे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
उदघाटनानंतर लगेच हरिहरन यांच्या गायनाला सुरूवात झाली. मंचावर येताच हरिहरन यांनी पधारो म्हारे देश...... हे गीत सादर करून चंद्रपूरकरांचे मन जिंकले. रसिकांनीही टाळ्यांचा जोरदार गजर करून गीताला उत्तम प्रतिसाद दिला. हरिहरन यांनी कस काय चंद्रपूर असा मराठी भाषेत संवाद साधून चंद्रपूरकर रसिकांचे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याबद्दल कौतुक केले. यानंतर हरिहरन यांनी नगमे है शिकवे है किस्से है बाते हे.....हे गीत सादर करून सप्तसुरांच्या मैफिलीला संगीतमय रंग दिला. त्यानंतर दम दारा दम दारा दम दम....हे गीत सादर केले. चंदा रे चंदा रे कभी तो जमी पे आ.... या गीताला सुरूवात करून संगीत मैफीलीचा साक्षीदार असलेल्या चंदाला तु पण जमीनीवर येऊन रसिकांचे प्रेम घे, असे आवाहन केले. त्यानंतर बाहो के दरमिया दो प्यार मिल रहे है...., दमा दम मस्त कलंदर, मोहे अपने रंग मे रंग...., पत्ता पत्ता बुटा बुटा...., मेरे पास है तु..., छय छप छय छप्पाक छय.. हे गीत नृत्याच्या तालावर सादर केले. डोल डोलतोय वा-यावर बाई माझे...., लागी रे लागी लगन......, हम तुमसे ना कुछ कह पाये...., झोका हवा का आजभी...चप्पा चप्पा चरखा चले... अशी एकाहून एक बहारदार गीते विविध सप्तसुरात सादर केली. विविध गीतांच्या अप्रतिम लयात रसिकांना डोलायला भाग पाडले. रसिकांनी विविध गीतांना वन्स मोर ची हाक देऊन टाळ्यांचा गजर करून उत्तम दाद दिली. हरिहरन यांची गझल व मराठी गीतांनी रसिकांनी संगीताची भुरळ घातली.
हरिहरन यांनी काश ऐसा कोई मंजर होता....मेरे कांधे पे तेरा सर होता....जमा करता हु मै आये हुये संग...सर छुपाने के लिए तेरा सर होता... इस बुलंदी पे बहुत तनहा हू...काश मै सबके बराबर होता.....ही गझल सादर करून रसिकांना काही काळ भावनिक विश्वात नेले.
जगात शांतीचा संदेश देणारे गीत हे बुध्दा की वाणी......सादर करून जगाला शांतीचा संदेश दिला. तुही रे तुही रे....या गीताने संगीत मैफीलीची समाप्ती झाली. हरिहरन यांनी कार्यक्रमाच्या पहिल्या गीता पासून ते शेवटच्या गीता पर्यंत रसिकांना त्यांच्या आसनावर बसवून ठेवले. मैदानावर हजारोंच्या संख्येने रसिकांनी हजेरी लावून हरिहरन यांच्या विविध गीतांचा आस्वाद घेतला.
हरिहरन यांचा मुलगा अक्षय हरिहरन, सोबतच्या गायिका लावण्या, चांद राही व इतर गायकांनी हरिहरन यांना उत्तम साथ दिली. बासरी वादन व तबला वादनाच्या जुगलबंदीमुळे चंद्रपूरकरांच्या मनात संगीताची भुरळ निर्माण झाली. कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण बडकेलवार, तहसिलदार गणेश शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मैदानावर मोठ्या संख्येने रसिकांनी हजेरी लावली होती.