पार्वती दत्तांच्या नृत्याची चंद्रपूरकरांना मोहिनी
चंद्रपूर, दि. 24 - वेळ संध्याकाळची......चांदा क्लब मैदानावर रसिकांची चिक्कार गर्दी.....उभारलेल्या भव्य मंचावर सप्तरंगांचा पडलेला प्रकाश...... अशा या भारवलेल्या वातावरणात सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी मंचावर आगमन करून पदन्यास, अंग-प्रत्यंग व भावमुद्रेच्या सहाय्याने सुर, ताल व लय यांचा सुरेख मेळ घालून रसिकांना आपल्या शास्त्रीय नृत्याने भुरळ घातली. शास्त्रीय नृत्यातील सप्त प्रकारांनी संगीताच्या तालावर पदन्यास करून रसिकांना भारत दर्शन घडविले. निमित्त होते सांस्कृतिक व ग्रंथोत्सव महोत्सवाचे....
सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी भारतीय शास्त्रीय नृत्य परंपरेवर आधारीत विविध प्रकारचे नृत्य आविष्कार सादर करून चंद्रपूरकरांना मोहित केले. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिकांनीही टाळ्यांचा जोरदार गजर करून या नृत्य आविष्काराला मनमुराद दाद दिली.
सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने चांदा क्लब मैदानावर आयोजित केलेल्या तीन दिवसीय सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सवात सुप्रसिध्द शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी आपल्या नृत्याचा आविष्कार सादर केला. याप्रसंगी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी पार्वती दत्ता यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उपविभागीय अधिकारी आशितोष सलील, अहेरीचे उपविभागीय अधिकारी उदयसिंग चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी. बडकेलवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
मंचावर येताच पार्वती दत्ता यांनी नृत्य ही एक साधना असल्याचे सांगून शास्त्रीय नृत्याविषयीचे महत्व रसिकांना पटवून दिले. त्यानंतर त्यांनी मंगलाचरणाने नृत्याचा आरंभ केला. जगन्नाथ अष्टकम, मोहिनी अट्टम या प्रकारातील शास्त्रीय नृत्य सादर करून अभिवादन केले. त्यानंतर सन्निधी या सात पवित्र नंद्यांवर आधारीत शास्त्रीय नृत्याचे सादरीकरण करून रसिकांना भारत दर्शनाच्या भावविश्वात नेले. सरस्वती नदीवर आधारीत कथ्थक, नर्मदा नदीवर आधारीत मोहनी अट्टम, कावेरी नदीवर आधारीत भरतनाट्यम, सिंधु नदीवर आधारीत कथ्थकअली, गोदावरी नदीवर आधारीत कुचिपुडी, यमुना नदीवर आधारीत मणिपुरी, गंगा नदीवर आधारीत ओडीसी या शास्त्रीय नृत्यातील सात नृत्य प्रकारांचा अविष्कार सादर केला. पार्वती दत्ता यांच्या शिष्या श्रीलक्ष्मी यांनी आंध्रप्रदेशातील कुचिपुडी
नृत्य पदन्यासाने रसिकांचे भारत दर्शन या प्रकारातील भामा कलापंप, संजीब भट्टाचार्य यांनी श्रीकृष्ण नृत्य वर्णनावर आधारीत रास लीला हे मणिपुरी नृत्य सादर केले. गण्णमी गोसावी यांनी उत्तर भारताच्या कला प्रकारावर आधारीत होरीहे कथ्थक नृत्य सादर केले. आनंद सच्चिदानंदन यांनी दक्षिण भारतातील कलांवर आधारीत तिल्लानाहे भरतनाट्यम नृत्य सादर करून रसिकांनी नृत्याची मोहीनी घातली. यावेळी रसिकांनीही विविध नृत्य प्रकाराला टाळ्यांचा गजर करून भरभरून दाद दिली.
चंद्रपूरातील स्थानिक कलाकार सौ. भाग्यलक्ष्मी देशकर व त्यांच्या वरिष्ठ विद्यार्थीनी कु. सुविधा कुळकर्णी, कु. त्रिशिला निमगडे व कु पौर्णिमा जोशी यांनी कथ्थक नृत्यातील नृत्य पक्ष सादर केला. मृणालिनी खाडीकर व समुहाने पाश्चिमात्य संगीतावर आधारीत घिरघिर बदरा नटराज स्तुती हे शास्त्रीय नृत्य सादर करून रसिकांची दाद मिळविली. सागर अंदनकर यांच्या चिमुकल्या नृत्य समुहाने गायत्री मंत्र हे भरतनाट्यम नृत्य सादर केले. कथ्थक साधना केंद्राचे भाग्यलक्ष्मी देशकर व समुहाने उत्तर भारतातीत नृत्य सादर केले. सागर अंदनकर व समुहाने रामायणावर आधारीत भरतनाट्यम नृत्य सादर करून रसिकांना मोहित केले. कार्यक्रमाचे निवेदन प्रशांत आर्वे व प्रा. सौ. जयश्री कापसे गावंडे यांनी केले. ध्वनी संदीप बारस्कर यांचे, तर प्रकाश योजना श्री. संदीप, नागपूर यांची होती. तांत्रिक सहाय्य हेमंत गुहे, श्री. टिंकु यांनी केले. या कार्यक्रमात चंद्रपूरकर रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
******
पार्वती दत्ता यांची प्रतिक्रिया
चंद्रपूर सांस्कृतिक महोत्सवाच्या निमित्ताने सुजान रसिकांना भेटण्याचा आनंद अवर्णनिय असल्याची प्रतिक्रिया शास्त्रीय नृत्यांगणा पार्वती दत्ता यांनी व्यक्त केली. विदर्भातील आपला पहिलाच कार्यक्रम असून चंद्रपूर रसिकांच्या उत्सफुर्त प्रतिसादामुळे भारावून गेल्याचे त्यांनी सांगितले.