प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत...
कवी अजिम नवाज राही
चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 च्या कवी संमेलनात मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती
चंद्रपूर, दि.23 - अक्षरांच्या सागर बोटांचा खेळ नसून दुःखांचा खडकाळ प्रवास करणारी कविता आहे. सर्वसामान्यांचे दुःख एकवटून भविष्याचे प्रतिनिधीत्व करण्याचे सामर्थ्य कवितेत आहे. कविता आतून येते तेव्हा तीचा संबंध हृदयाच्या पाझराशी असतो अशी कविता माणसाला जगण्याच बळ देऊन जाते असे प्रतिपादन सुप्रसिध्द कवी अजिम नवाज राही यांनी आज येथे केले.
चंद्रपूर ग्रंथोत्सव 2013 निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात आयोजित केलेल्या कवि संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी कवी प्रा. श्रीपाद प्रभाकर जोशी होते. याप्रसंगी माजी आमदार एकनाथराव साळवे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. वाघमारे जिल्हा ग्रंथालय अधिकारी आर.जी. कोरे, विदर्भ साहित्य संघ गोंडवण, शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. शरद सालफळे, चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल बोरगमवार, वृत्त निवेदिका संध्या दानव आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्ह्यात वाङमयीन चळवळ वाढण्यास सुरूवात झाली असल्याचे सांगत श्री. राही म्हणाले की, लेखकांना निर्माण केलेल्या कथा, कादंब-या, कविता काळजापर्यंत पोहचल्या तरच वास्तविकचे दर्शन घडते. तेव्हाच लेखकाला आत्मविश्वाची झळाली प्राप्त होते. कादंब-या कथांचा परिचय सजग झाल्यावर होतो, मात्र कवितेचा परिचय अगदी बालपणापासून होत असतो. त्यामुळेच यंत्र युगातही कवितेचे महत्वह कमी झालेले नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
अनेक कवी मुक्त छंदाच्या नावावर भाषेची उधळपट्टी करून जीवनानुभवाचा बोध न ठेवता कवितेची गळचेपी करीत असतात. कविता लिखान करताना रचनात्मक दृष्ट्या परिश्रम घेणा-यांचे साहित्य काळजापर्यंत पोहचत असते. तुकोबारायांचे अभंग इंद्रायणी नदीत टाकल्यावर पाण्यावर तरंगताना दिसून आले असे म्हणतात. पण ते तसे नसून हे अभंग लोकांच्या काळजापर्यंत पोहचल्यामुळे पुस्तकी रूपात उदयास आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. साहित्याची निष्ठावंत भक्ती असेल, तरच कवितेचे दान पदरी मिळते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात श्री. जोशी म्हणाले, कवि कोणत्याही एका समाजाचा नसून सुख-दुःख सामर्थ्याने समाजापुढे ठेवणारा दुत आहे. कवी ही एक संस्था असून मानवी जिवनातील अनुभव कवितेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी प्रशांत मडपुवार, प्रा. विद्याधर बनसोड, प्रा. रविकांत वरारकर, पद्मरेखा धनकर-वानखेडे, वर्षा चौबे, संगीता पिज्दुरकर, रंगनाथ रायपुरे, ना. गो. थुटे, तनुजा बोढाले, संगीता धोटे, मिलींद बोरकर, इरफान शेख, शिवशंकर घोगुल, भानुदास पोपटे, सीमा भसारकर, मोरेश्वर पेंदाम यांनी आपल्या कविता सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. संचालन इरफान शेख यांनी केले. तर आभार आर.जी. कोरे यांनी मानले. संमेलनात मोठ्या संख्येने रसिक उपस्थित होते.