प्रसिध्द कवी अजीम नवाज राही यांची उपस्थिती
चंद्रपूर दि.२३ :
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथोलय यांच्या वतीने सुरु असलेल्या तीन दिवशीय सांस्कृतिक तथा ग्रंथोत्सवात रविवार २४ मार्च २०१३ रोजी सकाळी १०.३० वाजता डॉ शामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित केले आहे. या कवी संमेलनात प्रसिध्द कवी व निवेदनकार अजीम नवाज राही यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून श्रीपाद प्रभाकर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होणार आहे.
रंगनाथ रायपूरे, नीता कांतमवार, मिलींद बोरकर, शिवशंकर घुगुल, भानुदास पोपटे, ना.गो.थुटे, रविकांत वरडाकर, तनुजा बोडाले, संगीता पिज्दुरकर, संगीता धोटे, प्रशांत मडपूवार, डॉ.विद्याधर बनसोड, डॉ.पद्मरेखा धनकर-वानखेडे हे कवी संमेलनात सहभागी होणार आहेत. या कवि संमेलनाचे संचालन ईरफान शेख करणार आहेत. निमंत्रितांच्या कवी संमेलनास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव समिती च्या वतीने करण्यात आले आहे.
वाचनाची आवड व सवय संस्कृती संवर्धनासाठी उपयुक्त : डॉ. शरद सालफळे
चंद्रपूर ग्रंथोत्सव २०१३ च्या परिसंवादात मोठ्या संख्येने नागरीकांची उपस्थिती
चंद्रपूर दि.२३ : सध्याच्या तांत्रिक युगात टिव्ही व संगणाचा प्रसार मोठ्या प्रमाणावर वाढत चालला आहे, तरीसुध्दा वाचनाचे महत्व कुठेही कमी झालेले दिसून येत नाही. त्यामुळे आजही वाचन संस्कृती जिवंत आहे. वाचनाची आवड आणि सवय संस्कृती संवर्धनासाठी उपयुक्त आहे, असे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघ गोंडवण, शाखा चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. शरद सालफळे यांनी आज येथे केले.
चंद्रपूर ग्रंथोत्सव २०१३ निमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, जिल्हा माहिती कार्यालय व जिल्हा ग्रंथालय विभागातर्फे डॉ. शामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात वाचन संस्कृती आणि आपण या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादाचे उदघाटन उपविभागीय अधिकारी आशुतोष सलील (भाप्रसे) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
व्यासपीठावर प्राध्यापिका सविता भट, चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाह अनिल बोरगमवार, जिल्हा माहिती अधिकारी रवी गीते, ग्रंथपाल आर.जी. कोरे, लेखा परिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक औदारे, श्री. यादव, मुरली मनोहर व्यास प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. सातफळे म्हणाले, टिव्ही संस्कृतीचे विषारी मुळे वाचन संस्कृती संपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. सध्याच्या युगात विविध तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असला तरी वाचनावर कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. उलट वाचनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे अनेक जुन्या काळात लिहलेली पुस्तके आजही खरेदी केली जात आहेत. वाचनालय व ग्रंथालय हे विद्येचे मंदिर आहे. नवीन पिढीमध्ये वाचनाची आवड आणि सवय निर्माण झाल्यास वाचन संस्कृतीच्या संवर्धनासाठी अधिक उपयुक्त ठरेल, असे मत त्यांनी यावेळी मांडले.
सविता भट म्हणाल्या, माणसाच्या बुध्दीचा विकास वाचन, लेखन व विचारामुळे होत असतो. सध्याच्या युगात यंत्रांनी संपुर्ण जागा व्यापली आहे. मात्र वाचन कुठेही बदललेले नाही. केवळ वाचनाचा प्रकार बदलत जाईल. भविष्यात ऑडीयो, व्हीडीओ किंवा संगणाकाद्वारे वाचन केल्या जाणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
वाचनामुळे माणसाचा सांस्कृतिक व गुणात्मक विकास होतो. बरेचदा मोठ्या प्रमाणावर वाचन केले जाते, मात्र वाचन किती करतो, त्यापेक्षा वाचन काय करतो, याकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचनामुळे आकलन व कल्पना शक्ती वाढीला लागते. कल्पना शक्तीच्या आधारे लेखन विकसीत होतो. वाचनातून लेखनाला गती देण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री. बोरगमवार म्हणाले, वाचनाच्या छंदामुळे आयुष्याला नवी दिशा मिळते. वाचनाची चळवळ वाढविण्याची गरज आहे. केवळ सरकारी पातळीवर नव्हे, तर लोकांच्या पातळीवरही या चळवळीला गती देण्याची गरज आहे. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक खेड्यात वाचनालय निर्माण करण्याची गरज आहे. संचालन व आभार प्रदर्शन संध्या दानव यांनी केले. परिसंवादात मोठ्या प्रमाणावर नागरीक व विद्यार्थी उपस्थित होते.