Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, फेब्रुवारी ०५, २०१३

शस्त्रास्त्र फेकून एकमेकांचा हात घेतला हातात...

गडचिरोली - गडचिरोलीतल्या संतोष कोला आणि शांता कुडियामी यांचा लग्नसोहळा थोडा खास होता... कारण या लग्नसोहळ्याला पार्श्वभूमी आहे त्यांच्या आधीच्या जीवनाची... शस्त्रास्त्र... वरिष्ठांचा दबाव... पोलिसांचा ससेमिरा आणि सातत्यानं मरण्याची भीती... अशा नक्षली वातावरणाशी दोघांचा काही दिवसांपूर्वी संबंध होता. 
मात्र, प्रेमाला कशाचंही बंधन नसतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. या दहशतीच्या वातावरणात दोघांच्या जीवनात प्रेमांकुर फुलला... सातत्यानं मरणाच्या भितीच्या वातावरणात जगण्यापेक्षा सुखी संसाराची स्वप्न दोघंही पाहू लागले. याच स्वप्नातून एके दिवशी दोघांनीही नक्षली चळवळीला रामराम ठोकत सात जन्माच्या रेशीमगाठीत अडकण्याचा निर्णय घेतला. दोघांनीही आत्मसमर्पण करुन धाडस दाखवलं. पोलिसांनीही त्यांच्या प्रेमाची दखल घेत दोघांचं शुभमंगल लावून दिलं. यावेळी आनंद व्यक्त करत संतोषनं नक्षली चळवळीतल्या नसबंदीसारख्या गैरप्रकारांचा पाढाच वाचला.
नक्षलवाद्यांचे पुनर्वसन ही सरकारची जबाबदारी आहे. या जबाबदारीच्या जाणीवेतूनच दोघांचं लग्न लावून दिल्याचं पोलिसांनी सांगितलंय. गडचिरोली पोलीस, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी या अनोख्या विवाह सोहळ्यात सहभागी झाले होते. चळवळीत विवाहाची मुभा नसल्याने या प्रेमी जोडप्याने चळवळ सोडून मुख्य प्रवाहात येणं पसंत केलं. अन् घडून आला लग्नयोग... 
नक्षली चळवळीत प्रेम, नाती अशा गोष्टींना कोणतंही स्थान नसतं... त्यामुळं आयुष्यभर दहशतीच्या वातावरणात जगण्याऐवजी सुखी संसार करत मानानं जगणं शहाणपणाचं असल्यानं संतोष आणि शांतानं आत्मसमर्पण केलं. त्यांच्या या निर्णयाला लग्नसोहळा लावून देत पोलीस आणि प्रशासनानं दिलेली साथ निश्चितच कौतुकास्पद म्हणावी लागेल.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.