*पती ठार, पत्नी जखमी
घुग्घूस, ४ फेब्रुवारी
भरधाव ट्रकने मार्गावर उभे असलेल्या दाम्पत्याला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू, तर पत्नी गंभीररित्या जखमी झाली. त्यानंतर ट्रकच्या चालकाला मिरगीचा झटका आल्याने त्याचाही ट्रकच्या कॅबीनमध्ये मृत्यू झाला. ही घटना सोमवार, ४ फेब्रुवारीला सकाळी ७.४० वाजताच्या सुमारास घुग्घूस येथील सुभाष नगर परिसरात घडली.
वेकोलिच्या निलजई क्रमांक एकच्या खदाणीमध्ये स्टोर इंचार्ज म्हणून कार्यरत असलेले हरिदास कवलवार (४९) हे पत्नी बेबीसह एका अंत्यसंस्कारात सहभागी होण्याकरिता यवतमाळ येथे निघाले. दरम्यान, सुभाष नगर परिसरात राजीव रतन दवाखान्याजवळ रस्त्यावर उभे असताना वेकोलि-वणी क्षेत्राच्या कोळसा भरून घुग्घूसकडे जाणाèया ट्रकने त्यांना जबर धडक दिली. या अपघातात पती हरिदास कवलवार ट्रकच्या चाकाखाली चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी बेबी गंभीर जखमी झाल्या. यावेळी शास्त्रीनगर घुग्घूस येथील ट्रकचालक शंभुदास गोस्वामी याला मिरगीचा झटका आल्याने त्याचाही ट्रकच्या कॅबीनमध्ये मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काही नागरिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले. घटनेचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलिस उपअधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उईके करीत आहे.