Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जानेवारी २७, २०१३

जिल्हयाच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द


पालकमंत्री ना.संजय देवतळे
    
   चंद्रपूर दि.26- गेल्या 62 वर्षात देशाने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करुन जगभर नाव लौकिक मिळविला आहे.  याच काळात महाराष्ट्र राज्याने जनकल्याणाच्या विविध योजना आखून व त्याची योग्य अंमलबजावणी करुन सामान्य मानसाला विकासाच्या प्रवाहात आणले आहे.  आपल्या जिल्हयातही विकासाचे अनेक कामे प्रगती पथावर असून जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबध्द असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री ना.संजय देवतळे यांनी केले. या विकास कार्यात  जिल्हा वासियांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी या प्रसंगी केले.
    यावेळी  जिल्हा परिषद अध्यक्ष संतोष कुमरे, महापौर संगीता अमृतकर, आमदार सुधीर मुनगंटीवार, शोभाताई फडणवीस, नाना शामकुळे, माजी खासदार शांताराम पोटदुखे, जिल्हाधिकारी विजय वाघमारे, जिल्हा पोलीस अधिक्षक राजीव जैन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे, मनपा आयुक्त प्रकाश बोखड, अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, उपविभागीय अधिकारी आशितोष सलील व विविध विभागाचे अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.
     प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य समारोहात ते जिल्हा वासियांना संबोधित करीत होते.  सर्व प्रथम पालकमंत्री देवतळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  त्यानंतर आपल्या शुभसंदेशात देवतळे म्हणाले की, शासकीय योजनांचा लाभ  घेण्यासाठी आधार नोंदणी अतिशय महत्वाची झाली असून चंद्रपूर जिल्हयात पहिल्या टप्प्यात 5 लाख 70 हजार 702 तर  दुस-या टप्प्यात 2 लाख 47 हजार 263 असे एकूण 8 लाख 17 हजार 965 नागरीकांची आधार नोंदणी झाली आहे.  जिल्हयात हे काम जलगतीने होत असून त्यासाठी 148 मशिन कार्यरत आहेत.  नागरीकांनी आपल्या जवळच्या केंद्रावर जावून नोंदणी करावी असे आवाहन त्यांनी केले. 
     चंद्रपूर येथे शासनाने वैद्यकिय महाविद्यालय मंजूर केल्याचे सांगून ही जिल्हयासाठी मोठी उपलब्धी असल्याचे देवतळे म्हणाले. ब्रम्हपूरी , राजूरा, वरोरा येथे 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय तर पोंभूर्णा व जिवती येथे 30 खाटांचे रुणालय मंजूर करुन शासनाने नागरीकांच्या उत्तम आरोग्याची सोय केले असल्याचे त्यांनी सांगितले.
     जिल्हयातील ऐतिहासिक व पुरातत्विय महत्व असलेल्या स्मारकाचे जतन व दुरुस्तीचे कामे जिल्हयात मोठया प्रमाणात सुरु असल्याचे सांगून माणिकगड किल्ल्याच्या देखभाल व दुरुस्तीवर 4 कोटी खर्च होणार असल्याचे देवतळे म्हणाले. जिल्हयातील प्रदुषणाचे गुणांकन कमी करण्याच्या दृष्टीने कृती आराखडा तयार केला असून त्याची अंमलबजावणी सुरु झाल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
     राज्याच्या नव्या औद्योगिक धोरणाचा उल्लेख करुन पालकमंत्री म्हणाले की, या धोरणाचा लाभ लहान उद्योगांना होणार आहे.  जिल्हयात नव्याने येवू पाहणा-या उद्योगातून जिल्हयात 11 हजार 161 कोटीची गुंतवणूक अपेक्षित असून यातून 6 हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.
     चंद्रपूर शहर पंचशताब्दी अंतर्गत शहराच्या विकासासाठी 25 कोटी रुपयाचा निधी प्राप्त झाला असून या निधीतून पायाभूत सुविधा, नव्याने विकसित भागात पाणी वितरण व्यवस्था व शहरातील मुख्य मार्गावरील भुमिगत विद्युत वाहिणीचे काम करण्यात येणार आहे.  यामुळे चंद्रपूर शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
     महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक विभाग मुंबई विभागा पुरताच केंद्रीत होता. त्याचे विकेंद्रीकरण करुन विभागीय स्तरावर सांस्कृतिक विभागाचे कार्यालय सुरु करण्यात आले.  यात नागपूर, औरंगाबाद व पुणे या शहराचा समावेश आहे.  प्रत्येक जिल्हयामध्ये सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यासाठी शासनाने प्रत्येकी 5 लाख रुपयाचा निधी जिल्‍हयांना मंजूर केला असून सांस्कृतिक कार्य विभागातर्फे देण्यात     येणा-या सांस्कृतिक पुरस्काराच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ केली असल्याचे देवतळे म्हणाले.
     जिल्हयाचा विकास आराखडा तयार करणा-या जिल्हा वार्षिक योजनेतून 112 गावाच्या पेयजल योजनेसाठी 8 कोटी रुपये खर्च केला असून  ग्रामीण व शहरी भागातील नागरीकांना सामाजिक न्याय विभागाने 8 हजार 500 घरकुलाचे वाटप केल्याचे त्यांनी सांगितले. सामाजिक न्याय विभागामार्फत अनुसूचित जाती व नौबध्द घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर देण्याची योजना सुरु केली असून याचा लाभ बचत गटांनी घेण्याचे आवाहन देवतळे यांनी केले.
     यासोबत कृषी, शिक्षण, महात्मा गांधी तटामुक्त गाव, शिक्षण हक्क कायदा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आदिवासी बांधवांचा विकास, आरोग्य, सामुहिक प्रोत्साहन योजना  आदिचा त्यांनी आपल्या भाषणातून  सविस्तर आढावा घेतला. जिल्हयातील नागरीकांनी या विकास कार्यात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.
     आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पोलीस विभाग, होमगार्ड विभाग, शाळा व स्काऊड गाईड आदिनी उत्कृष्ट परेड संचलन करुन मान्यवरांना सलामी दिली.  त्यानंतर जिल्हा उद्योग केंद्राचे, जिल्हा परिषदेची वक्तृत्व स्पर्धा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, हरित सेना पुरस्कार व वैयक्तिक स्वरुपाच्या पुरस्काराचे वितरण पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
     यानंतर जिल्हा पोलीस विभाग चंद्रपूर तर्फे कराटयाचे प्रात्यक्षिक व जिल्हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर व्दारे खेळाचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. सामुदायिक कवायतीमध्ये मासपीटी, डंबेल्स व लेझिमचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले. या सोहळयास शहरातील असंख्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
     मुख्य समारोहा पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर प्रशासकीय इमारत येथे अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.