चंद्रपूर,बल्लारपूर व सिंदेवाही अती जोखिम गट
750 प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत
चंद्रपूर,दि. 24 :- चंद्रपूर जिल्हयात एचआयव्ही बाधित रुग्णांची संख्या गेल्या चार वर्षात झपाटयाने घटली असून गरोदर माता रुग्ण निम्म्याने कमी झाले आहेत. नियमित चाचणी व समुपदेशन यामुळे एड्स सारख्या भयंकर आजारावर ताबा मिळविता आला आहे.
एका अहवालानुसार चंद्रपूर जिल्हयात सन 2009-10 मध्ये 80 हजार लोकांची एचआयव्ही तपासणी करण्यात आली यात 1123 व्यक्ती एचआयव्ही बाधित निघाले तर 23 हजार गरोदर मातांची तपासणी करण्यात आली यात 79 रुग्ण पॉझिटीव्ह आढळले. 2010-11 मध्ये 1 लाख 20 जणांची तपासणी केली त्यात 1244 पौझिटीव्ह निघाले. 35 हजार गरोदर माता तपासणीत 68माता पॉझिटीव्ह सापडल्या. 2011-12 मध्ये 1 लाख 30 हजार तपासणीत 921 पॉझिटीव्ह तर 38 हजार 500 गरोदर माता तपासणीत 63 माता पॉझिटीव्ह आढळल्या. 2012 च्या डिसेंबर पर्यंतच्या तपासणीत 470 व्यक्ती व 35 गरोदर माता पॉझिटीव्ह आढळल्या या आकडेवारीवर नजर टाकल्यास पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या सतत कमी झालेली आढळेल.
पॉझिटीव्ह आढळलेल्या रुग्णांचे सतत समुपदेशन करण्यात येते. मात्र हे रुग्ण ब-याच वेळा स्थलांतरीत असल्याने त्यात सातत्य ठेवणे कठीण असले तरी यासाठी अनेक स्वयंसेवीसंस्थांची मदत घेतली जाते. विशेषत: देहविक्रय करणा-या महिलांच्या बाबतीत ही अडचण मोठया प्रमाणात येते. ज्यांना क्षयरोग आहे अशा रुग्णात एचआयव्हीचे जीवाणू असण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे ज्यांना क्षयरोग आहे. त्यांची एचआयव्ही तपासणी व ज्यांना एचआयव्ही आहे त्यांची क्षयरोग तपासणी सुध्दा आरोग्य विभागाकडून करण्यात येते.
चंद्रपूर जिल्हयात चंद्रपूर, बल्लारपूर व सिंदेवाही तालुके अति जोखिम गट म्हणून पुढे आले असून चंद्रपूर तालुक्यात 356, बल्लारपूर तालुक्यात 71 तर सिंदेवाही तालुक्यात 43 एचआयव्ही पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. तर गरोदर मातामध्ये चंद्रपूर 27, बल्लारपूर 5 व सिंदेवाही 2 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले. चंद्रपूर शहराचा परिसर हा औद्योगिक वसाहतीचा परिसर असून या ठिकाणी स्थलांतरीत कामगारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
त्याच प्रमाणे देहविक्रय करणा-या स्त्रीयांच्या तपासणीत 5 स्त्रीया व ट्रक चालकांच्या तपासणीत 3 ट्रक चालक पॉझिटीव्ह आढळले. एड्सच्या दृष्टीने हा हाय रिस्क ग्रुप असून एचआयव्ही वहनासाठी हा ग्रुप मदत करतो. पॉझिटीव्ह आढळलेल्या सर्वच रुग्णांवर उपचार केले जातात. एचआयव्ही बाधितांचे समुपदेशन करण्यासाठी 750 प्रशिक्षित समुपदेशक कार्यरत आहेत.मात्र ब-याच वेळा रुग्ण स्थलांतरीत झाल्याने उपचार अर्धवटच राहतात असेही निदर्शनास आले आहे. आरोग्य विभागाने एड्सबाबत शुन्य गाठायचे आहे असा निर्धार केलेला आहेच.