चंद्रपूर : वंदनीय राष्टसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियानच्या वतीने जटपुरा गेट गांधी पुतळयासमोर घेण्यात आलेल्या सत्याग्रह शपथ कार्यक्रमात येत्या २६ जानेवारी रोजी जेलभरो आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
जिल्ह्यातील दारुबंदी एक महिन्याच्या आत करण्याचे आश्वासन मुख्यमत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंदोलनकत्र्या महिलांना देण्यात आले होते. मात्र, अद्यापपर्यंत कोणतेही ठोस पाऊल घेण्यात आलेले नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांना दारूबंदीचे दिलेले आश्वासन सरकारने पाळावे, यासाठी आता महिलांच्यावतीने जेलभरो करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाची सुरवात १२ डिसेंबर २०१२ पासून करण्यात आली. अभियानादरम्यान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एक लाख पोष्टकार्ड पाठवून, त्यांनी दिलेल्या वचनाचे स्मरण करून आले. दोन वर्षांंंंंपासून चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी, यासाठी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती अभियान सुरू करण्यात आले. या अभियानाच्या वतीने, दारूबंदीसाठी शासनस्तरावर आणि जिल्ह्यात वेगवेगळी आंदोलने केली. या पाश्र्वभूमीवर सरकारच्यावतीने आंदोलक महिलांना दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. यासाठी शासनाने पालकमंत्री संजय देवतळे समिती नेमली. या समितीने आपला अहवाल शासनाकडे सुपूर्द केला. या अहवालावर हिवाळी अधिवेशन संपताच निर्णय घेण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले होते. मात्र अधिवेशन होवूनही सरकार गप्प राहिल्याने, मुख्यमंत्री चव्हाण यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी जेलभरो करण्यात येणार आहे.