नाना पाटेकरसह अन्य कलावंत शुक्रवारी हेमलकसात
चंद्रपूर, ता. २१ : आदिवासींच्या आरोग्यासाठी गेल्या अनेक दशकपासून झटणा-या डॉ. प्रकाश आमटे यांचा जीवनपट डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर येत असून, येत्या २५ नोव्हेंबरपासून हेमलकसा येथे चित्रिकरणाला प्रारंभ होत आहे. या चित्रपटात डॉ. आमटेंच्या भूमिकेत नाना पाटेकर, तर डॉ. मंदा आमटेंची भूमिका सोनाली कुळकर्णी साकारणार आहे.
ममला आई व्हायचंय या मराठी चित्रपटाद्वारे पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळविणा-या पहिल्या महिला चित्रपट दिग्दर्शिका डॉ. समृध्दी पोरे यांनी या चित्रपटनिर्मितीसाठी पुढाकार घेतलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसासारख्या अतिशय दुर्गम जंगलात गत ४० वर्षांपासून डॉ. प्रकाश आमटे आणि पत्नी डॉ. मंदा आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासींच्या उत्थानाचे अविरत कार्य करीत आहेत. ज्यावेळी त्यांनी या कामाला सुरुवात केली होती तेव्हा आदिवासी जमातींपर्यंत वीज, शिक्षण, दवाखाना हया सारख्या मुलभूत सुविधाही पोहचल्या नव्हत्या. शिवाय त्यांची भाषाही आपल्यासारखी नव्हती. एवढी सारी आव्हाने असतानाही डॉ.प्रकाश आणि मंदा यांनी तिथे शून्यातून एक नवं विश्व निर्माण केले. केवळ आदिवासींसोबतच नाही तर तेथील पर्यावरण आणि पाण्यांशीही त्यांनी नवे नाते जोडले. आज तेथील स्थानिक आदिवासींसोबत तेथील बिबटे, qसह, साप या सारखे अनेक qहस्त्र पशु पक्षीही त्यांच्या परिवाराचेच सदस्य बनले आहेत. त्याचा हा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना कळावा, यासाठी डॉ. पोरे यांनी पुढाकार घेतलेला आहे.
चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेत नाना पाटेकर, सोनाली कुळकर्णी, डॉ. मोहन आगासे, विक्रमगायकवाड या चित्रपट कलावंतांसह झाडीपट्टीतील कलांवत अनिरुद्ध वनकर दिसणार आहे.
चित्रिकरणासाठी तंत्रज्ञांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण चमू हेमलकसा येथे पोचली आहे. २० ते २४ पर्यंत चित्रिकरणाचे सेट तयार केले जाणार आहे. चित्रपटात आदिवासी, रुग्ण आणि सहकारी म्हणून झाडीपट्टीतील सुमारे १०० कलावंतांना संधी मिळाली आहे. चित्रिकरणस्थळी डॉ. आमटेंचे रुग्णालय, आदिवासींच्या झोपड्या साकारण्यात आल्या आहेत.