Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १४, २०११

नोटबुकांवर आता 'ताडोबाचा वाघ'

देवनाथ गंडाटे
चंद्रपूर - पूर्वी नोटबुकांच्या कव्हरपेजवर चित्रपटातील अभिनेते आणि क्रिकेट खेळाडूंचे राज्य होते. त्यांचे सौंदर्य विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक ज्ञानाला भुरळ घालायचे. त्यानंतर कंपन्यांनीदेखील विद्यार्थ्यांची मानसिकता बघून कॉर्टून आणि ऍनिमेशनला प्राधान्य दिले. आता दुर्मिळ होऊ पाहत असलेला वाघ नोटबुकांवर दिसू लागला आहे. तोसुद्धा आपल्याच ताडोबातील असून, अभयारण्यातील महत्त्वपूर्ण संदर्भ माहितीचा समावेश असल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानाचा खजिना उपलब्ध झाला आहे.
'साध्या कागदाच्या 30 पानांची वही नको. करकरीत पानांचे नोटबुक हवे' असा हट्ट करीत प्राथमिक शिक्षण घेणारे चिमुकले विद्यार्थीसुद्धा बदलत्या काळानुसार मागणीत बदल घडवीत असतात. शिवाय कंपन्यादेखील विद्यार्थ्यांची मानसिकता आणि आवड बघून कव्हरपेज तयार करीत आहेत. 10 वर्षांपूर्वी नोटबुकांवर विविध अभिनेत्री, अभिनेते असायचे. यात ऐश्‍वर्या रॉय, गोविंदा, अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमामालिनी यांचा समावेश होता. दरम्यानच्या काळात क्रिकेटचा मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर हा विद्यार्थ्यांचा चाहता झाला. त्यामुळे विविध कंपन्यांनी सचिनचे कव्हरपेज छापणे सुरू केले. काही वर्षांत शक्तिमान, स्पायडरमॅन, सुपरमॅन यांच्या कव्हरपेजची मागणी होती. नंतर ऍनिमेशनच्या प्रगतीतून साधलेला बालगणेश, बालहनुमान, श्रीकृष्ण यांनी भुरळ घातली. कव्हरपेजवर एखादे आवडीचे छायाचित्र असले की, ते खरेदी करण्यासाठी विद्यार्थीदेखील पालकांकडे हट्ट करतात. त्यामुळे कंपन्यांनीदेखील विद्यार्थ्यांची पसंत लक्षात घेऊन कव्हरपेज तयार करणे सुरू केले आहे. नागपुरातून निर्मिती होणाऱ्या नोटबुकांच्या एका कंपनीने यंदा "ताडोबाच्या वाघाला' कव्हरपेजवर प्राधान्य दिले. शिवाय ताडोबातील हरिण, रानगवे आणि पशुपक्ष्यांची चित्रे छापली आहेत. शेवटच्या पानावर संबंधित छायाचित्रांची माहिती देण्यात आली. शेवटून दुसऱ्या पानावर ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाची संपूर्ण माहिती आहे. या माहितीमुळे विद्यार्थ्यांत पर्यावरणासंदर्भात जनजागृती होत आहे.



निखिलच्या छायाचित्रांची दखल
येथील हौशी छायाचित्रकार निखिल तांबेकर यांनी कॅमेराबद्ध केलेली छायाचित्रे नोटबुकांच्या पहिल्या पानावर आहेत. त्यावर मॅजेस्टिक टायगर, नेचर गिफ्ट सेव्ह नेचर, सेव्ह वाइल्ड लाइफ, ऑलव्हेज बिलिव्ह इन ऍबिलिटी ऍण्ड इन्फर्ट आदी घोषवाक्‍ये लिहिलेली आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.