Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, एप्रिल ३०, २०११

सेलिब्रिटीं'च्या साक्षीने 773 जोडपी विवाहबद्ध

Friday, April 29, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: marriage, celebrities, chandrapur, vidarbha

चंद्रपूर, : सामूहिक विवाहसोहळे सामाजिक जाणिवेतून घेतले जात असले, तरी ते "उरकून' टाकण्यावरच आयोजकांचा भर असतो. मात्र, कॉंग्रेसचे चिमूरचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी घेतलेला सर्वधर्म सामूहिक विवाहसोहळा प्रत्येकाला आपल्या घरचा मंगलसोहळा वाटावा असाच ठरला. लाखो वऱ्हाड्यांची उपस्थिती, उंट-घोड्यांवरून निघालेली वरात, श्रीमंत आयोजन, त्यावर सिने कलावंतांचे दर्शन आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उपस्थिती, या साऱ्यांमुळे हा विवाहसोहळा प्रत्येकाच्या मनात घर करून गेला.
आमदार विजय वडेट्टीवार बहुउद्देशीय मित्रमंडळातर्फे गुरुवारी (ता. 28) सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी आठपासून राममंदिर चौकातून नवरदेवांची मिरवणूक निघाली. नवरदेवांना विवाहस्थळी आणण्यासाठी उंट व घोडे यांची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच अनेक नवरदेव ट्रॅक्‍टरमधूनही आले.
सर्वधर्मीय सामूहिक विवाहसोहळ्याचे विधिवत उद्‌घाटन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे समाजकल्याणमंत्री शिवाजीराव मोघे, रोजगार हमी योजनामंत्री नितीन राऊत, पालकमंत्री संजय देवतळे, ऊर्जाराज्यमंत्री राजेंद्र मुळक, खासदार अविनाश पांडे, आमदार डॉ. नामदेव उसेंडी, आमदार आनंदराव मडावी, आमदार दीपक आत्राम, आमदार सुभाष धोटे, डॉ. रजनी हजारे, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष नंदा अल्लुरवार, चंदू पाटील मारकवार, रवींद्र दरेकर, ऍड. दिगंबर गुरपुडे यांची उपस्थिती होती. मेळाव्याचे खास वैशिष्ट्य म्हणून "नटरंग' चित्रपटातील "अप्सरा' सोनाली कुळकर्णी, अभिनेते असरानी, हास्यकलावंत सुनील पाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक आमदार विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी त्यांनी गोसेखुर्द प्रकल्प त्वरित नियोजन करून पूर्णत्वास न्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांनी शासनाच्या भरवशावर राहण्यापेक्षा सामूहिक विवाहात सहभागी व्हावे. लग्नासाठी कर्जबाजारी होऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी पालकमंत्री संजय देवतळे यांनीही वरवधूंना आशीर्वाद दिला. मान्यवरांच्या भाषणानंतर सुरवातीला बौद्ध धार्मिक पद्धतीने धम्मवंदना देण्यात आली. त्यानंतर हिंदू पद्धतीने मंगलाष्टके झाली. शेवटी मुस्लिम पद्धतीने विवाहसोहळा पार पडला. विवाहसोहळ्यानंतर वरवधूंसाठी लकी-ड्रॉ सोडत काढण्यात आली. यात प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बैलबंडी किंवा 25 हजार, तृतीय फ्रीज, चतुर्थ एलसीडी टीव्ही, पाचवे बक्षीस सोफासेट आदी भेट देण्यात आले. वधूवरांना घड्याळ, ब्रिफकेस, मंगळसूत्रे, वॉटर फिल्टर भेट स्वरूपात देण्यात आले. वधूंना राहण्यासाठी जनता ज्युनिअर कॉलेज, तर वरांची व्यवस्था जनता कन्या विद्यालयात करण्यात आली होती. या सोहळ्याकरिता अडीच लाख स्क्वेअर फुटांमध्ये भव्य शामियाना उभारण्यात आला होता. दीड लाख स्क्वेअर फूट जागेत वऱ्हाड्यांच्या भोजनाची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. बसस्थानक ते विवाहमंडपादरम्यान जागोजागी पाणपोईची व्यवस्थाही होती. या मेळाव्यात चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, गोंदिया आदी जिल्ह्यांतील जोडप्यांसह त्यांचे 35 हजार नातलग उपस्थित होते.

घरगुती लग्नामुळे अनाठायी खर्च होतो. तो टाळण्यासाठी सामूहिक विवाहसोहळे हा चांगला पर्याय आहे. शासन त्याला आर्थिक मदत करीत आहे. अशा सोहळ्यांमुळे विविध धर्माचे लोक एकत्र येऊन स्नेह वृद्धिंगत होते. पूर्व विदर्भाला निसर्गाची साथ लाभत नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यांच्या विकासासाठी शासन प्रयत्नशील आहे. झुडपी जंगलामुळे अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत. विदर्भातील 92 हजार 500 हेक्‍टर झुडपी जंगलाचा पर्यायी वनजमीन म्हणून विकास करण्यात येईल. तसेच सिंचन, नागरी सुविधा पुरविण्यात येतील.


- पृथ्वीराज चव्हाण




असरानी म्हणाले "अटेन्शन!'
"रामराम, नमस्कार' म्हणत प्रसिद्ध चित्रपट अभिनेते असरानी यांनी विवाहसोहळ्याला उपस्थित वऱ्हाड्यांची मने जिंकली. "आधे इधर जाओ, आधे उधर जाओ और बाकी के सब वडेट्टीवार के पिछे आओ..' म्हणताच गर्दीतून हास्यकल्लोळ उठला. यातच "अटेन्शन' म्हणताच सर्वत्र शांतता पसरली.



अप्सरा म्हणाली, "मला जाऊ द्या ना घरी..'
विवाहसोहळा आटोपल्यानंतर व्यासपीठावरून परत जाण्यासाठी निघालेली अप्सरा ऊर्फ सोनाली कुळकर्णी हिला तिच्या चाहत्यांनी घेरले. कशीबशी ती वाहनापर्यंत गेली. मात्र, अवतीभोवती चाहत्यांचा गराडा होता. "मला जाऊ द्या ना घरी' म्हणणाऱ्या अप्सरेला अखेर पोलिसांची मदत घ्यावी लागली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.