सकाळ वृत्तसेवा Tuesday, January 11, 2011
Tags: student, school trip, chandrapur, maharashtra darshan
Tags: student, school trip, chandrapur, maharashtra darshan
चंद्रपूर - शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने बालवयात दुसऱ्या राज्यात जाण्याची संधी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना यावर्षी मात्र यापासून वंचित राहावे लागत आहे. देशातील अनेक राज्यांतील परिस्थिती संवेदनशील असल्याच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावर्षी आता विद्यार्थ्यांना "महाराष्ट्रदर्शन'च करावे लागणार आहे.
दरवर्षी जाणाऱ्या शैक्षणिक सहलींमध्ये अल्पदरात दुसऱ्या राज्यात जाण्याची, नवे काही शिकण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थीही यासाठी उत्सुक असतात. महाराष्ट्रातील प्रेक्षणीय स्थळांपेक्षा दुसऱ्या राज्यात सहल नेण्यावर शिक्षण संस्थांचा कल असतो.
आजवर दुसऱ्या राज्यात शैक्षणिक सहली नेण्यासाठी शिक्षण विभाग परवानगी देत होते. मात्र, अलीकडे देशातील अनेक राज्यांतील परिस्थिती संवेदनशील झाली आहे. तिथे हिंसक घटना घडत असतात. विशेषत: छत्तीसगडमध्ये नक्षलवादाच्या पार्श्वभूमीवर तिथे नेहमीच "रेड ऍलर्ट' असते. आणखी काही राज्यांची परिस्थिती याच कारणावरून बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाच्या सहायक संचालकांनी शैक्षणिक सहलींना बाहेर राज्यात परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या कारणावरून त्यांनी हा निर्णय घेतला असून, शिक्षणाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे बाहेर राज्यात सहल घेऊन जाण्यासाठी शिक्षण विभागाकडे दाखल केलेल्या प्रस्तावांना नकार देण्यात आला आहे.