Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर ११, २०१०

दारूबंदीची ऐतिहासिक पदयात्रा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी समाजाला दारूबंदीचे विचार दिले आहे. महाराजांचे ग्रामस्वच्छतेचे विचार राज्य शासनाने स्वीकारून राज्यात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता अभियान सुरू केले. महाराजांचे दारूबंदीचे विचार राज्य शासनाने स्वीकारून महाराजांच्या कर्मभूमीत दारूबंदी जाहीर करावी, यासाठी श्रमिक एलगारने क्रांतिभूमी चिमूर ते विधानसभा नागपूर अशी पदयात्रा काढली. परोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात पुकारलेल्या "वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियाना' ला चार हजार 805 कार्यकर्त्यांनी सहभाग दर्शविला. जिल्ह्यातील सर्व दारूचे परवाने रद्द करून दारूबंदी करावी, या मागणीवर विचार करण्यासाठी विशेष समिती नेमली जाईल, अशी घोषणा उत्पादनशुल्क राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी विधानसभेत केली. हे श्रमिक च्या एलगार चे ५० टक्के यश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात स्वातंत्र्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने नागपूरला पदयात्रा निघाली नाही. मात्र, श्रमिक एल्गारच्या पुढाकाराने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चंद्रपूर जिल्हा दारूबंदी अभियानाअंतर्गत निघालेली पदयात्रा ही ऐतिहासिक आहे. या मागणीसाठी जिल्ह्यातील तब्बल पाच हजार कष्टकरी महिलांचा मोर्चा अनेक दिवसांची पायपीट करीत गुरुवारी विधानभवनावर गेला होता. अनेक महिला तर अनवाणी पायाने चालल्या. पायाला फोडे आली. प्रकृती बिघडल्या. वेदना विसरून चालत राहायचे. दिवसभर, रात्री गावात प्रबोधनाचे कार्यक्रम घेत जनजागृती करायची. उघड्यावरच मुक्काम ठोकायचा. पाच दिवसांचा या प्रवासाने अनुभवांची शिदोरी मिळाल्यासारखी वाटली, हे बोल आहेत चिमूर ते नागपूर 130 किलोमीटरचे अंतर पदयात्रेतून पार करणाऱ्या महिलांचे. पदयात्रेला काही प्रमाणात यश मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यांवर आहे. प्रवीण चिचघरे, यमराज बोधनकर, नीलाबाई ठाकरे, कपिला भसारकर, माधुरी तोरे, संगीता गेडाम या पदयात्रेत सहभागी झाल्या होत्या. त्यांनी आपले अनुभव कथन केले.

श्रमिक एल्गारच्या पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वात राष्ट्रसंतांची कर्मभूमी चिमूर येथून पाच डिसेंबरला पदयात्रेला सुरवात झाली. भद्रावतीपासून तर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणांहून एकत्र आलेल्यांनी दारूबंदीचे नारे देत पदयात्रा केली. भिसी मार्गावरून चिंचाळा या गावात पहिला मुक्काम झाला. महिला आपली पाच दिवसांची रोजीरोटी सोडून या पदयात्रेत सहभागी झाल्या. 10 वर्षांच्या चिमुकल्यापासून 70 वर्षांच्या पार्वताबाई सिडाम, मीराबाई गावतुरे, शांताबाई कोसरकर, पार्वताबाई व्याहाडकर, रुकमाबाई लोनबले व वल्लुबाई सीमोनकर, मोहुर्ले, धृपता नैताम आंच्यासह अनेक वृद्ध महिला धडाडीने या पदयात्रेत सहभागी झाल्या. 130 किलोमीटर अंतर पार करीत नागपुरात पोचल्यानंतर नागपुरातील अनेक नागरिक मदतीसाठी पुढे आले. दु:ख, वेदना, थंडी व अचानक आलेला पाऊस यातही हे पाच दिवस कसे गेले हे समजलेच नाही, असे महिलांनी सांगितले. या पदयात्रेमुळे शासनाला समिती गठित करावी लागली, याचा आनंद महिलांना आहे.

आनंद तरीही...
बल्लारपूर तालुक्‍यातील मानोरा येथील श्रमिक एल्गारचा कार्यकर्ता सूर्यकांत हा चार डिसेंबरला पदयात्रेत सहभागी होण्याकरिता चिमूरला होता. याच दिवशी त्याच्या पत्नीला मुलगा झाल्याची बातमी त्याला कळविण्यात आली. आनंद झाला. मात्र, तो माघारी गेला नाही. याच पदयात्रेत मुलगा झाल्याचा आनंद पेढे वाटून साजरा केला. संपूर्ण पदयात्रेची सांगता झाल्यानंतरच तो गावाकडे परतला.
चंद्रपूर जिल्ह्यात संपूर्ण दारूबंदी लागू करण्याच्या होत असलेल्या मागणीवर आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अशासकीय विधेयकाच्या निमित्ताने दारूबंदीवर झडलेली चर्चा अतिशय भावनिक पातळीवर गेली. महसुलाचा अट्टहास सोडून शासनाने सर्वत्र दारूबंदीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अनेक आमदारांनी चर्चेच्या निमित्ताने केले.
५ दिसेम्बार ला सकाळी साडेपाचला बालाजी मंदिर येथून पदयात्रेला सुरवात झाली.  अध्यक्षस्थानी प्रा. जयश्री कापसे-गावंडे होत्या. याप्रसंगी श्रमिक एल्गारच्या संस्थापक अध्यक्षा ऍड. पारोमिता गोस्वामी, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजूकर, जिल्हापरिषद सदस्य प्रा. दादा दहीकर, सुमनबाई टेकाम, कुमरे, विमल कोडापे, सुरेखा कुसराम यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
मासिक सभेत चंद्रपूर जिल्हा दारूबंदीचा ठराव मांडून संमत करण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन जिल्हापरिषदेचे अध्यक्ष डॉ. सतीश वारजूरकर यांनी दिले, ही देखिल जमेची बाजु आहे.
भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दारूबंदीविषयी अशासकीय विधेयक सभागृहात मांडले. विधेयकावरील चर्चेच्या निमित्ताने मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात होत असलेल्या दारूबंदीच्या मागणीकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.