Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, नोव्हेंबर १७, २०१०

झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये मोहन जोशी, कुलदीप पवार

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 15, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: drama, entertainment, chandrapur

चंद्रपूर - दिवाळीपासून एप्रिल महिन्यापर्यंत झाडीपट्टीत चालणाऱ्या नाट्यप्रयोगांना सुरवात झाली असून, बुकिंगसाठी नाट्यकंपन्या आणि आयोजक नाट्यमंडळांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. यंदा झाडीपट्टीच्या नाटकात चित्रपट अभिनेते मोहन जोशी आणि कुलदीप पवार दाखल झाले आहेत.
झाडीपट्टीतील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात हिवाळ्याच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात नाटकांचे आयोजन केले जाते. भंडारा-गोंदियात मंडई किंवा यात्रेनिमित्त, तर चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शंकरपटांनिमित्त नाटके होतात. गावातील स्थानिक नाट्यमंडळे या नाटकांचे आयोजन करीत असतात. तारीख आणि योग्य नाटक मिळविण्याठी आयोजक मंडळे नाट्यकंपन्यांशी संपर्क साधत आहेत. जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, सिंदेवाही, नवरगाव, वडसा-देसाईगंज आणि पाथरी येथे नाट्यकंपन्या कार्यरत आहेत. आजघडीला सर्वच कंपन्यांच्या तारखा बुकिंग झाल्या आहेत. वडसा येथील राजसा नाट्य कंपनीच्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या तारखा हाऊसफुल्ल असून, जानेवारी आणि फेब्रुवारीची बुकिंग सुरू असल्याचे नाट्यकलावंत हिरालाल पेंटर यांनी सांगितले. यंदा खरीप पिकात भरघोस उत्पन्न मिळाले असल्याने नाट्यव्यवसाय जोरात आहे. त्यामुळे नाट्यप्रयोगाच्या तारखा बिझी असल्याचे लोकजागृती रंगभूमीचे प्रमुख कलावंत अनिरुद्ध वनकर म्हणाले. मागील वर्षी गाजलेल्या काही नाटकांची यंदाही मागणी असून, काही नवीन नाटकांची भर पडली आहे. मागीलवर्षी नवरगाव येथील व्यंकटेश नाट्यमंडळाचे "आत्महत्या' हे नाटक गाजले होते. प्रसिद्ध नाट्यकलावंत सदानंद बोरकर यांच्या दिग्दर्शनातून यंदा "नवरे झाले बावरे' हा नाट्यप्रयोग सुरू आहे. यशकुमार निकोडे लिखित भानामती, अहंकार, भोवरा या नाटकांनाही चांगली मागणी आहे. त्यांची नाटके चंद्रकमल थिटअर्सद्वारे प्रदर्शित केली जातात. चंद्रकमलने विनाश, काही क्षणाचे सौभाग्य आणि स्पर्श या नाटकांचे यशस्वी प्रयोग केले आहेत. शिवराज नाट्यमंडळाचे गरिबी, संघर्ष तर लोकजागृती रंगभूमीतर्फे घायाळ पाखरा, राजसातर्फे राया गेली वाया, लिलाव, सून सांभाळा पाटलीन बाई आणि अनिल नाकतोडे यांच्या मंडळात झुंज एका वादळाची आदी नाटकांचा समावेश आहे. ही सर्व नाटके स्थानिक नाट्यलेखकांचीच असून, कलावंतही याच मातीतील आहे. महिला कलावंत म्हणून पुणे, मुंबई आणि नागपूर येथील कलावंतांचा समावेश आहे. यंदाही नाटकांची बुकिंग मोठ्या प्रमाणात असून, त्यांच्या प्रचारासाठी पत्रके, बॅनरची छपाई सुरू असल्याचे मुद्रणालयाचे संचालक केशव कावळे यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.