Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, नोव्हेंबर २२, २०१०

"तो' बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर

सकाळ वृत्तसेवा
Monday, November 22, 2010 AT 12:45 AM (IST)
Tags: municipal employee, builder, leave, chandrapur, vidarbha
चंद्रपूर - पालिकेत शिपाई पदावर कार्यरत कर्मचारी बिल्डर व्यवसाय करीत असल्याचे वृत्त "सकाळ'ने प्रकाशित करताच पालिका प्रशासनात खळबळ माजली आहे. दरम्यान, कारवाईच्या भीतीपोटी सदर बिल्डर 15 दिवसांच्या रजेवर असून, दक्षिणेतील कर्नाटक राज्यात फिरायला गेल्याची माहिती आहे.
चार लाख लोकसंख्या असलेल्या चंद्रपूर नगरपालिकेत जवळपास 200 हून जास्त शिपायांची नियुक्ती आहे. प्रत्यक्षात मात्र, बहुतांश कर्मचारी काम न करताही वेतन घेत असल्याची धक्कादायक माहिती "सकाळ'ने प्रकाशित केली होती. शासनाने नेमून दिलेले काम न करता कर्मचाऱ्यांनी स्वत:चे उद्योग सुरू केले आहेत. केवळ पालिकेच्या हजेरीबुकावर स्वाक्षरी करून करून महिन्याचे मासिकवेतन उचलत असल्याची माहिती आहे. यातील काही लिपिक बिल्डर, बार व्यावसायिक किंवा अन्य उद्योगाचे मालक म्हणून काम करीत आहेत. यातीलच एक स्वच्छता झोनमध्ये शिपाई म्हणून कार्यरत कर्मचाऱ्याची काही वर्षांपूर्वी काम करीत नसल्याच्या तक्रारीवरून नगराध्यक्षांच्या कक्षात बदली करण्यात आली. तिथेही या शिपायाने पदाधिकाऱ्यांना लालूस देऊन वैयक्तिक उद्योग सुरू केलेत. सदर कर्मचारी सकाळी दहाला वेळेवर पालिकेत येतो. हजेरीबुकावर स्वाक्षरी केल्यानंतर त्याचा पत्ताच नसतो. दिवसभरात बांधकाम बिल्डर आणि आपले व्यवसाय सांभाळत आहे. ही बाब अनेकांना ठाऊक आहे. मात्र, ठरलेली रक्कम वेळीच आणि नियमित मिळत असल्याने अनेकांनी चुप्पी धारण केली आहे. याच व्यवसायातून बंगला आणि आलिशान कारने त्याचा घर ते पालिका असा प्रवास सुरू आहे. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर पालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली. दरम्यान, पालिकेचे मुख्याधिकारी नवीन असल्याने कारवाईच्या भीतीपोटी सदर कर्मचाऱ्याने 15 दिवसांची रजा घेतली आहे. आपण तो नव्हेच, असे दाखवून देण्यासाठी कर्मचारी खटाटोप करीत आहे. दरम्यान, विश्‍वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बिल्डर शिपायाने हजेरी बुकावर दुसऱ्याच्या हाताने हजेरी लावली आहे. याचाच अर्थ हा कर्मचारी पालिकेत येतच नाही, असे स्पष्ट होते. याशिवाय पालिकेतील अनेक कर्मचारी एलआयसी, विविध खासगी विमा कंपन्या, नेटवर्क मार्केटिंग, प्लॉटविक्री, बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करतात. पालिकेत काम नसल्यामुळेच त्यांचे हे फावल्या वेळेतील उद्योग सुरू असल्याचे बोलले जाते. 15 वर्षांपूर्वी नगराध्यक्ष म्हणून कार्यरत एका पदाधिकाऱ्याला पालिकेने एक शिपाई नियुक्त केला होता. तो आजही तत्कालीन नगराध्यक्षांच्या घरी काम करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.