Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑक्टोबर ०६, २०१०

40 दिवसांच्या बालिकेच्या नलिकेत अंगठी!

चंद्रपूर - घरात बाळ जन्मल्याचा आनंदसोहळा सर्वत्र साजरा होत असताना नामकरण कार्यक्रमात बाळाच्या बोटातील अंगठी तोंडावाटे नलिकेत गेली आणि सर्व आप्तांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहू लागल्या. अवघ्या 40 दिवसांच्या चिमुकल्या बालिकेच्या अन्न आणि श्‍वासनलिकेच्या मधोमध अडकलेली सोन्याची अंगठी डॉ. मंगेश गुलवाडे आणि त्यांच्या वैद्यकीय चमूने यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे बाहेर काढली. सायमा जमीर शेख असे या नुकत्याच नामकरण झालेल्या बालिकेचे नाव आहे.


मूळचे अहेरी येथील रहिवासी जमीर शेख यांच्या पत्नी श्रीमती कैसर शेख यांनी एका गोंडस बालिकेला जन्म दिला. तिच्या नामकरणाचा सोहळा 40 दिवसांनी 21 सप्टेंबर रोजी सिरोंचा येथील नातलग शेख रसूल यांच्या घरी आयोजिला होता. नामकरणानंतर तिच्या आजी-आजोबांनी सायमाला ही सोन्याची अंगठी भेट दिली होती. बोटात घातलेली अंगठी खेळत असताना अचानक तिच्या तोंडात गेली. त्यानंतर ती अन्न आणि श्‍वासनलिकेच्या मधोमध अडकून पडली. दरम्यान सायमाच्या बोटात अंगठी नसल्याचे पाहून आई कैसर शेख घाबरली. सर्वत्र शोधाशोध करीत असतानाच चिमुकल्या सायमाला ठसके येऊ लागले. यावरून अंगठी तिच्या गळ्यात असावी, असा प्राथमिक अंदाज बांधून आलापल्ली येथील रुग्णालयात तिला हलविण्यात आले. डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार एक्‍स-रे काढल्यानंतर नलिकेत अंगठी असल्याचे स्पष्टपणे दिसले. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 11ला चंद्रपूरला हलविण्यात आले. सर्वप्रथम बालरोगतज्ज्ञ डॉ. शिवजी यांच्याकडे तपासणण्यात आले. मध्यरात्रीदरम्यान नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. मंगेश गुलवाडे यांच्याकडे तपासणी करण्यात आली. डॉक्‍टरांनी आपल्या सहकाऱ्यांना घेऊन कोणताही वेळ वाया जाऊ न देता एंडोस्कोपी सर्जरीच्या (दुर्बीण) साह्याने अवघ्या दीड तासाच्या शस्त्रक्रियेतून ही अंगठी बाहेर काढली. ही अंगठी वेळीच बाहेर निघाली नसती तर बालिकेच्या जीवाला धोका झाला असता, असे डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले. या शस्त्रक्रियेसाठी डॉ. कल्पना गुलवाडे, डॉ. मोनिका पिसे, सलिम तुकडी, रितिशा दुधे, सारिका गेडाम यांनी सहकार्य केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.