Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, मे ०५, २०१०

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वाघिणीची शिकार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, May 05, 2010 AT 12:28 AM (IST)
चंद्रपूर - वाघांचे संवर्धन आणि रक्षणाची जबाबदारी असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात वर्षभरापूर्वी एका वाघिणीची शिकार झाल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले आहे. वाघिणीच्या शिकार प्रकरणात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी वाघाची नखे विकताना चिमूर येथे दोघांना वनाधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर या शिकार प्रकरणाचे बिंग फुटले आणि ताडोबा व्यवस्थापन हादरले. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील कोळसा येथील पाच आणि जामणी या गावातील एकाचा या शिकार प्रकरणात सहभाग आहे.

या व्याघ्रप्रकल्पात 40 वाघ असल्याची नोंद वनविभागाकडे आहे. या प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. विशेषत: मे आणि एप्रिल महिन्यात पर्यटकांची वर्दळ जास्त असते. यावेळी वन्यजीवांच्या सुरक्षिततेसाठी गस्तही वाढविली जाते. मात्र, गतवर्षी मे महिन्यातच वाघिणीची शिकार झाली. कोळसा येथील दलपत गुरू गेडाम, भाऊजी खतूजी मडावी, खुशाल सुकरू तोडासे, साईनाथ तुकाराम शेडमाके, गुलाब चिटपुरा तोडासे व जामणी येथील मंगलदास गोमाजी मडावी यांनी शिकारीचा बेत आखला. त्यासाठी त्यांनी कोळसा येथील विश्रामगृहापासून तीन किलोमीटर अंतरावरील हिरडी नाल्याजवळची जागा जाळे लावण्यासाठी निवडली. त्यांचा हेतू हरणाच्या शिकारीचा होता. मात्र, यात वाघीण अडकली. दोन दिवसांनंतर जाळ्यात अडकलेली शिकार नेण्यासाठी आलेल्या या सहाही जणांना धक्काच बसला. जाळ्यात अडकलेली वाघीण मृत झाली होती. त्यांनी तिथून पळ काढला. याची कुठेही वाच्यता केली नाही. पंधरा दिवसांनंतर पुन्हा त्या ठिकाणी आले. वाघिणीचे मांस गळालेले होते. त्यांनी मृत वाघिणीची नखे काढली आणि गावात परतले.

दरम्यान, या शिकार प्रकरणाचा या सहा जणांशिवाय कुणाला थांगपत्ता लागला नाही. तब्बल एका वर्षानंतर दोन दिवसांपूर्वी यातील मंगलदास मडावी आणि दलपत गेडाम हे चिमूर येथे नखे विकण्यासाठी आले. आधीच याची माहिती मिळालेल्या वनखात्याने सापळा रचला. यात ते अलगद अडकले. त्यांच्याकडून वाघिणीची तीन नखे गोळा करण्यात आली. तोवर वनकर्मचाऱ्यांना वाघिणीच्या शिकारीची माहिती नव्हती. चौकशी केल्यानंतर मात्र वनकर्मचाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. काल सोमवारी दुपारी या दोन्ही आरोपींनी शिकारीची कबुली दिली. त्यानंतर ब्रह्मपुरी वनविभागाचे सहायक वनसंरक्षक ए. एन. धोटे, चिमूरचे वनाधिकारी व्ही. एस. पडवे यांनी कोळसा गावातील भाऊजी खतूजी मडावी, खुशाल सुकरू तोडासे, साईनाथ तुकाराम शेडमाके, गुलाब चिटपुरा तोडासे या चार आरोपींना ताब्यात घेतले. नंतर या सर्वांना घटनास्थळी नेण्यात आले. तिथे वाघिणीची हाडे सापडली. ही सर्व हाडे जप्त करण्यात आली आहे. या सहाही आरोपींना आज चिमूरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. ही घटना घडली त्यावेळी वन्यजीव विभागाचे मुख्य वनसंरक्षक डॉ. नंदकिशोर होते. ताडोबाचे क्षेत्र संचालक डॉ. शेषराव पाटील, तर कोळशाचे वनाधिकारी म्हणून दीपक चोंढीकर कार्यरत होते. इन्फो बॉक्‍स काही अनुत्तरित प्रश्‍न मे महिन्यात पर्यटकांची वर्दळ असते. याच काळात गस्त वाढविली जाते. कोळसा येथील विश्रामगृहापासून वाघिणीच्या शिकारीचे घटनास्थळ फक्त तीन किलोमीटर आहे. विश्रामगृहावर पर्यटक आणि वनाधिकाऱ्यांची नेहमीच ये-जा असते. असे असतानाही तब्बल पंधरा दिवस वाघिणीचे शरीर कुजत असताना हा प्रकार कुणाच्याच लक्षात कसा आला नाही? वाघांची नोंद ठेवण्यासाठी ट्रॅपिंग कॅमेरे लावण्यात आले आहेत. यातून मिळणाऱ्या छायाचित्रातून प्रत्येक वाघाची ओळख पटविली जाते. एक वाघीण वर्षभर गायब असताना ही बाब तत्कालीन ताडोबा क्षेत्र संचालकांच्या लक्षात कशी आली नाही?

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.