Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल १२, २०१०

समाजाची शिकार बनलेलं जगणं!

पारध्यांना अद्यापही किती भयानक परिस्थितीत जीवन जगावे लागते, याचं आणखी एक वास्तव चित्रण 'दर कोस दर मुक्काम' या कादंबरीच्या रूपाने अशोक पवार यांनी वाचकांपुढे सादर केले आहे. त्यांच्या 'बिराड' या आत्मकथन पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीसमवेत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. 'बिराड'चा पुढचाच भाग म्हणजे 'दर कोस दर मुक्काम' आहे. 'बिराड' हे पवार यांचे आत्मचरित्र आहे, त्यात बेलदार जमातीचे चित्रण केलेलं आहे. चरितार्थासाठी दगड फोडण्याचे काम करणारे लोक या बेलदार जमातीचे आहेत. तीही भटकीच जमात आहे.

बेलदार जमातीप्रमाणेच पारध्यांनाही धड माणसांप्रमाणे नाही आणि जनावराप्रमाणेही नाही, अशा अत्यंत भयानक प्रतिकूल परिस्थितीत जीवन जगावे लागते. दोन दिवस आश्रयाची सावली मिळेल या अपेक्षेने त्यांना एका गावांहून दुसऱ्या गावात आपला बिराडांचा मुक्काम हलवावा लागतो. परंतु, आश्रयाची सावली टप्प्यात येत नाही, तोच त्यांच्यावर अनेक आरोप करून त्यांना हुसकावून लावण्यात येते. माणसाने माणसाला केवळ माणूस म्हणून नव्हे तर जनावराप्रमाणे तरी आश्रय मिळावा, इतकीही अपेक्षा या पारधी समाजाला करता येत नाही. या समाजाने जगावे म्हटले तरी गावकरी, पोलीस, लोकप्रतिनिधी आणि मीडिया जगू देत नाहीत. शिक्षण व सुधारणा तर बाजूलाच राहिल्या.

लेखकाने पारध्यांवर होणाऱ्या अनेक अत्याचारांचे वर्णन कादंबरीच्या रूपाने चव्हाट्यावर आणले असून, ते वाचून वाचकांचे मन सुन्न होते. पारधी समाजातील चालीरीती, बायापुरुषांच्या मनातील स्पंदने त्यांच्याच भाषेत अचूक व्यक्त करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

तळेगावच्या गोदरीत असलेल्या पारध्यांच्या सातआठ बिराडांतील वडील माणूस, लकसीमन बुढा, हिवाळा आला म्हणून बिराडे हलविण्यास निघाला. तेव्हा बिराडातील नाम्यानं नव्या मुक्कामाच्या गावाबाबत शंका काढली, 'शाहर गाव हाय, तितं पोलिसाईचा तरास भारी असतुया. खेड्यापाड्यात चला, तितं पोलिसाईचा तरास नसतुया.'

त्यावर लकसीमन बुढा, आपल्या अनुभवाचे बोल त्यांना सुनावतो, 'आता कितीभी नादर म्हणाल, तरी पोलीस तिवढ्यापुरता तरास दिनारच. पोलिसाची जात अन कुतऱ्याची जात सारखीच असतीया. कुतरं कवा भुकंल याचा नेम नसत, आन् पोलीस कवा आपली धरपकड करील, याचा नेम नसतं, हे ठाव न्हाई काय आपल्याला?'

पोलिसांबाबत आलेल्या अनुभवातून लकसीमन बुढा सर्वांना ऐकवतो व संपूर्ण कादंबरीत वाचकांनाही या सत्याचा प्रत्यय वारंवार येत जातो. एका खोट्या प्रकरणात पारध्यांना अडकवून पोलीस ठाण्यात नेत असताना लकसीमन बुढास पोलीस जीपमध्येच इतके मारहाण करतात, की तो बिचारा प्रवासात जीपमध्येच मरून जातो. मरण पावल्यावर पोलीस त्याचे प्रेत जंगलात फेकून देतात, आणि जीपमध्ये सांडलेले बुढाचे रक्त इतर कैद्यांना धुवून काढायला लावतात. इतकंच नाही तर कुठेही 'ब्र' न काढण्याचा त्यांच्याकडून शब्द घेतात.

दर कोस मुक्काम बदलत बिराडे फिरत असतात. मुक्कामच्या ठिकाणी उपजीविकेसाठी शिकार केली तर पोलीस व वनरक्षक पकडतात. अटक करण्याचा धाक दाखवून त्यांच्याकडील छोटीमोठी शिकार लुटतात. भिक्षेसाठी दारोदार फिरणाऱ्या बायकांना कोणी दारापुढे उभे करीत नाहीत. इतरांप्रमाणे दारू बनवून विकली तर स्थानिक गावगुंड व लोकप्रतिनिधी फुकट दारू पितात. पैसे मागितले तर मारझोड करून उलट पोलिसांत तक्रार करतात, असे प्रसंगही कादंबरीत आहेत. हा अर्थातच पारध्यांचा नेहेमीचा अनुभव.

अशा या अत्याचारांत पिचून निघालेल्या पारध्यांना कांबळे नावाचा एकमेव पोलीस इन्स्पेक्टर देव म्हणून भेटतो. तो या पारध्यांवर होणाऱ्या अन्यायातून त्यांची सुटका करतो, पारध्यांच्या मुलांना आश्रम शाळेत प्रवेश मिळवून देतो. परंतु, गावगुंड व लोकप्रतिनिधी या इन्स्पेक्टवर पारध्यांकडून पैसे खाऊन त्यांना संरक्षण देत असल्याचा आरोप करून त्या इन्स्पेक्टरची गडचिरोलीला बदली करण्यास गृहखात्यास भाग पाडतात. त्यात स्थानिक आमदाराचा भाऊ आघाडीवर असतो. त्याने एका सहकारी बँकेचे लाखो रुपये बुडविलेले असतात, परंतु, कांबळे यांच्या जागी आलेले नवे इन्स्पेक्टर त्याला अभय देतात आणि पारध्यांवर तुटून पडण्याचा आदेश पोलिसांना देतात.

चोरीच्या खोट्या तक्रारीवरून पारध्यांना पकडणारे, रात्री त्यांच्या बिराडांवर छापे टाकून त्यांचे पाल उद्ध्वस्त करून, महिलांवर लैंगिक अत्याचार करणारे, पारध्यांना पिटाळून लावणारे पोलीस हे सर्व परिणामकारक चितारले आहे.

अशा प्रतिकूल परिस्थितीतही आश्रमशाळेत दहावीपर्यंत शिकून सुखाने जगण्याचं स्वप्न बघणाऱ्या गुलब्या या मुलाचे स्वप्नही पोलिस उद्ध्वस्त करतात.

स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटून गेली आहेत आणि पुरोमागित्वाचा टेंभा मिरवणारे आपले राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. तरीही पददलित, भटक्या जमातीस किती उपक्षेने जगावं लागत आहे, याचे वास्तव दर्शन घडवण्यात लेखक यशस्वी ठरला आहे.

...जॉन कोलासो
.................................................................

बिराड : (चौथी आवृत्ती)

पाने : १८८ किंमत : १८०

दर कोस दर मुक्काम

पाने : १९६ किंमत : १९० रुपये

दोन्ही पुस्तकांचे लेखक : अशोक पवार

मनोविकास प्रकाशन, पुणे आणि मुंबई

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.