नवी दिल्ली, 15 ऑगस्ट 2022
स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त देशवासियांना खूप खूप शुभेच्छा. खूप-खूप शुभेच्छा.केवळ हिंदुस्तानच्या कानाकोपऱ्यातल्या नव्हे तर जगभरातल्या ठिकठिकाणी आज कोणत्या ना कोणत्या स्वरुपात भारतीयांद्वारा किंवा भारताप्रती अपार प्रेम असणाऱ्या जगातल्या कानाकोपऱ्यात आपला तिरंगा आन-बान-शान दर्शवत डौलाने फडकत आहे. जगभरातल्या भारतप्रेमी,भारतीयांना स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो.आजचा हा दिवस ऐतिहासिक दिवस आहे.एक पुण्य टप्पा , एक नवा मार्ग,एक नवा संकल्प,आणि नव्या सामर्थ्याने पुढे वाटचाल करण्याची ही शुभ संधी आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात, गुलामीचा संपूर्ण कालखंड,संघर्षात गेला आहे. हिंदुस्तानचा कोणता भाग असा नव्हता, कोणता काळ असा नव्हता,जेव्हा देशवासीयांनी शेकडो वर्षापर्यंत गुलामी विरोधात लढा दिला नाही, आयुष्य वेचले नाही, यातना झेलल्या नाहीत, आहुती दिली नाही. आज आपणा सर्व देशवासीयांसाठी अशा प्रत्येक महान व्यक्तींना, हुतात्म्यांना नमन करण्याची ही वेळ आहे.त्यांचे ऋण मानण्याची ही वेळ आहे. आणि त्यांचे स्मरण करत त्यांची स्वप्ने लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प करण्याचीही वेळ आहे.पूज्य बापू,नेताजी सुभाषचंद्र बोस,बाबासाहेब आंबेडकर,वीर सावरकर,यांच्याप्रती आपण सर्व देशवासीय कृतज्ञ आहोत,ज्यांनी,कर्तव्य पथावर वाटचाल करत आपले आयुष्य वेचले, कर्तव्य पथ हाच त्यांचा जीवन पथ राहिला. हा देश कृतज्ञ आहे,मंगल पांडे,तात्या टोपे,भगतसिंह, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद,अश्फाक उल्ला खान, राम प्रसाद बिस्मिल, अशा आपल्या अगणित क्रांतीवीरांनी,इंग्रजांच्या साम्राज्याचा पाया डळमळीत केला. हे राष्ट्र कृतज्ञ आहे, त्या वीरांगनाप्रती,राणी लक्ष्मीबाई असू दे, झलकारीबाई, दुर्गाभाबी,राणी गाइदिन्ल्यू, राणी चेनम्मा, बेगम हजरत महल, वेलु नाच्चियार. भारताची नारीशक्ती काय असते , भारताच्या नारी शक्तीचा संकल्प काय असतो, भारताची स्त्री त्याग आणि बलिदान यांची काय पराकाष्ठा करू शकते, अशा अगणित वीरांगनांचे स्मरण करताना प्रत्येक हिंदुस्थानी व्यक्तीचा ऊर अभिमानाने भरून येतो.स्वातंत्र्याचा लढा देणारे,स्वातंत्र्यानंतर देशाची जडणघडण करणारे डॉ राजेंद्रप्रसाद जी असोत, नेहरू जी असोत, सरदार वल्लभभाई पटेल, श्यामा प्रसाद मुखर्जी, लाल बहादूर शास्त्री,दीनदयाल उपाध्याय,जय प्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य विनोबा भावे, नानाजी देशमुख, सुब्रमण्यम भारती, अशा अगणित महापुरुषांना आज नमन करण्याची ही वेळ आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याविषयी आपण जेव्हा बोलतो, तेव्हा आपण जंगलात जीवन कंठणाऱ्या,आपल्या आदिवासी समाजाचाही गौरव करण्याचे विसरू शकत नाही.त्यांचे योगदान विसरू शकत नाही. भगवान बिरसा मुंडा, सिद्धो कानो, अलुरी सीताराम राजू,गोविंद गुरु,अगणित नावे आहेत.ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीचा आवाज बनून दुर्गम जंगलातही माझ्या आदिवासी बंधू-भगिनींमध्ये, मातांमध्ये, युवकांमध्ये,मातृभूमीसाठी आपले जीवन अर्पण करण्याची प्रेरणा जागृत केली.या देशाचे हे भाग्य राहिले आहे, की स्वातंत्र्य लढ्याची अनेक रूपे राहिली आहेत,त्यामध्ये एक रूप हे ही होते,ज्यामध्ये नारायण गुरु होते, स्वामी विवेकानंद होते, महर्षी अरविंदो होते, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर होते,असे अनेक महापुरुष,हिंदुस्तानच्या प्रत्येक भागात, प्रत्येक काळात भारताची चेतना जागृत करत राहिले.भारताला चैतन्यमय करत राहिले.अमृत महोत्सवाच्या काळात देशाने, संपूर्ण एक वर्ष आपण पाहत आहोत, 2021 मध्ये दांडीयात्रेपासून सुरु होत, हिंदुस्तानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, प्रत्येक जिल्ह्यात,देशवासियांनी स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त लक्षावधी कार्यक्रम केले.कदाचित इतिहासात इतका विशाल, व्यापक , दीर्घ, एक उद्दिष्ट ठेवत उत्सव साजरा करण्यात आला अशी पहिली घटना असावी आणि हिंदुस्तानच्या प्रत्येक भागात या सर्व महापुरुषांचे स्मरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला,ज्यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने ज्यांना इतिहासात स्थान मिळाले नाही, किंवा ज्यांना विस्मरणात ठेवण्यात आले, आज देशाने शोधून-शोधून प्रत्येक कानाकोपऱ्यात अशा वीरांना, महापुरुषांना, त्याग करणाऱ्यांना, हुतात्म्यांना , सत्याग्रहीचे स्मरण केले,त्यांना नमन केले.अमृत महोत्सवादरम्यान या सर्व थोर पुरुषांना नमन करण्याची वेळ आहे.काल 14 ऑगस्टला भारताने फाळणी वेदना स्मृती दिवस, जड अंतःकरणाने, हृदयात खोलवर झालेल्या जखमांचे स्मरण करत पाळला. कोट्यवधी जनतेने खूप काही सहन केले होते. तिरंगा ध्वजाची शान राखण्यासाठी सहन केले होते. मातृभूमीच्या मातीवरच्या प्रेमासाठी सहन केले होते. पण धैर्य गमावले नव्हते.भारताप्रती प्रेमाने नव्या जीवनाची सुरवात करण्याचा संकल्प नमन करण्याजोगा आहे, प्रेरणा घेण्याजोगा आहे.आज जेव्हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे,तेव्हा मागच्या 75 वर्षात देशासाठी आपले आयुष्य वेचणारे, देशाचे संरक्षण करणारे,देशाच्या संकल्पांची पूर्तता करणारे,सैन्यदलाचे जवान असोत,पोलीस कर्मचारी असोत, नोकरशहा असोत, लोकप्रतिनिधी असोत, स्थानिक स्वराज संस्थांचे शासक-प्रशासक असोत, राज्यांचे शासक-प्रशासक असोत, केंद्रातले शासक-प्रशासक असोत, 75 वर्षात या सर्वांचे योगदानही स्मरण करण्याची ही वेळ आहे आणि देशाच्या कोटी-कोटी नागरिकांनाही, ज्यांनी 75 वर्षे अनेक प्रकारच्या आव्हानांमधूनही देशाला प्रगती पथावर नेण्यासाठी आपल्याकडून जे शक्य ते सर्व करण्याचा प्रयत्न केला.
माझ्या प्रिय देशबांधवानो,
75 वर्षांच्या आपल्या या प्रवासात अनेक चढ-उतार आले. सुख आणि दुःखाचे अनेक प्रसंग राहिले आणि यामधूनही आपल्या देशवासीयांनी मोठी कामगिरी केली.हार मानली नाही.संकल्प डळमळू दिले नाहीत,म्हणूनच हेही सत्यच आहे की शेकडो वर्षांच्या गुलामीच्या कालखंडाने भारताच्या मनावर भारताच्या मानवी भावनांवर खोलवर घाव केले आहेत, खोल जखमा केल्या आहेत.मात्र त्या मध्ये एक जिद्दही होती , एक जिजीविषा होती,एक निर्धार होता,एक जोम होता त्यामुळे अभाव असूनही , उपहास असूनही स्वातंत्र्याचा लढा अंतिम टप्प्यात होता तेव्हा देशाला भीती दाखवण्यासाठी, निराश , हताश करण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यात आले . स्वातंत्र्य मिळाले, इंग्रज निघून गेले तर देश डूबेल, विखुरला जाईल,लोकं आपसात लढाई करून मृत्यूमुखी पडतील, काहीच उरणार नाही, भारत अंधकार युगात जाईल अशा कितीतरी आशंका व्यक्त करण्यात आल्या मात्र त्यांना माहित नव्हते ही हिंदुस्तानची माती आहे, या मातीमध्ये ते सामर्थ्य आहे,जे शासकांपेक्षाही वर वेगळ्या सामर्थ्याचा एक अंतरप्रभाव घेऊन जगत आहे, शतकांपासून जीवन जगत आहे.
त्याचाच परिणाम आहे, आपण काय झेलले नाही ,कधी अन्न संकट झेलले,कधी युद्ध झेलावे लागले,दहशतवादाने जागोजागी आव्हाने निर्माण केली. निर्दोष नागरिकांना मृत्युमुखी पडावे लागले,छुपे युध्द सुरु राहिले, नैसर्गिक संकटे येत राहिली,यश-अपयश, आशा- निराशा असे कितीतरी चढ-उतार आले.मात्र यातूनही भारत आगेकूच करत राहिला.भारताची विविधता, जी दुसऱ्यांना भारताचे ओझे आहे असे वाटत होती ती भारताची विविधताच भारताची अनमोल शक्ती आहे. शक्तीचा एक निरंतर प्रवाह आहे .
विश्वाला ठाऊक नव्हते की भारताकडे एक अंतर्निहित सामर्थ्य आहे. एक संस्कार सरीता आहे. एक मनोभूमिकेचे, एक विचारांचे बंधन आहे. आणि ते आहे, भारत लोकशाहीची जननी आहे. लोकशाहीची जन्मदात्री आहे. ज्यांच्या मनात लोकशाही असते, ते जेंव्हा संकल्प मनाशी धरुन पुढे जाऊ लागतात, ते सामर्थ्य जगातील मोठमोठ्या राजवटींसाठीही आव्हान घेऊन उभे ठाकतात. ही आहे लोकशाहीची जन्मदात्री, ही आहे लोकशाहीची जननी. आपल्या भारताने हे सिद्ध करुन दाखवले की आमच्याकडे एक अनमोल सामर्थ्य आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
75 वर्षाच्या प्रवासात, आशा, अपेक्षा, चढउतार या सगळ्यांमधे प्रत्येकाच्या प्रयत्नांमुळे जिथवर पोहचू शकलो होतो, पोहचलो होतो. आणि 2014 मधे देशवासीयांनी मला जबाबदारी दिली. स्वातंत्र्यानंतर जन्म झालेला मी पहिला व्यक्ती होतो, ज्याला लाल किल्ल्यावरुन देशवासीयांचे गौरवगान करण्याची संधी मिळाली होती. परंतु माझ्या मनात, जे काही आपल्याकडून शिकू शकलो, जितके आपल्याकडून समजून घेऊ शकलो आहे. माझ्या प्रिय देशवासीयांनो, तुमच्या सुखदुःखाला जाणून घेऊ शकलो आहे. देशाच्या आशा, अपेक्षांमधे तो कोणता आत्मा वास करतोय, त्याला जितका मी समजू शकलो आहे, त्यावरुन मी माझा संपूर्ण कालखंड देशातील त्या लोकांना सक्षम करण्यासाठी व्यतीत केला. माझे दलित असोत, शोषीत असोत, पिडीत असो, वंचित असो, आदिवासी असो, महिला असो, तरुण असो, दिव्यांग असो, शेतकरी असो, पूर्व असो , पश्चिम असो, उत्तर असो, दक्षिण असो, समुद्रतट असो, हिमालयातील पर्वतरांगा असो प्रत्येक कानाकोपऱ्यात महात्मा गांधींजीचे जे स्वप्न होते, प्रत्येक माणसाची काळजी घेण्याचे, महात्मा गांधी यांची जी आकांक्षा होती. शेवटच्या घटकातील व्यक्तीला समर्थ बनवण्याची, मी स्वतःला त्यासाठी समर्पित केले. आणि त्या आठ वर्षांची फलश्रुती, आणि स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांचा अनुभव, आज 75 व्या वर्षात, जेव्हा आपण अमृतकाळात पाऊल ठेवत आहोत, अमृतकाळाची ही पहिली सकाळ आहे तेव्हा मी एका अशा सामर्थ्याला पाहतोय आणि मी ज्यामुळे गौरवाने भारुन जात आहे.
देशवासीयांनो,
मी आज देशाचे सर्वात मोठे सौभाग्य पाहतोय की भारताचे जनमन आकांक्षित जनमन आहे. अभिव्यक्त होणारा समाज कोणत्याही देशाचा सर्वात मोठा ठेवा असतो. आणि आम्हाला अभिमान आहे की आज हिंदुस्थानच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात, समाजाच्या प्रत्येक वर्गात, प्रत्येक घटकात आकांक्षा उधाणावर आहेत. देशाचा प्रत्येक नागरिक परिस्थिती बदलताना पाहू इच्छीतोय, बदलू पाहतोय. त्याला आता वाट बघायची नाही. हे सारे आपल्या डोळ्यासमोर बदलताना त्याला पाहायचे आहे. तो कर्तव्यात सहभागी होऊन हे करु इच्छितो आहे. त्याला गती हवी आहे. त्याला प्रगती हवी आहे. 75 वर्षात उराशी बाळगलेली स्वप्ने आपल्याच डोळ्यांसमोर साकार होताना पाहण्यासाठी तो आतूर आहे, उत्साहित आहे. अधीर देखील आहे. काही लोकांना यामुळे अडचणही होऊ शकते. कारण जेव्हा अभिव्यक्त समाज असतो तेव्हा सरकारांनाही तलवारीच्या धारेवर चालावं लागते. सरकारांनाही काळासोबत धावावे लागते. आणि मला विश्वास आहे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, स्थानिक स्वराज्य संस्था असोत, कोणत्याही प्रकारची शासन व्यवस्था का असेना, या प्रत्येक व्यवस्थेला, आपल्या अभिव्यक्त समाजाला उत्तर द्यावे लागेल. त्यांच्या आकांक्षासाठी आपण अधिक प्रतिक्षा करु शकत नाही. आपल्या या अभिव्यक्त समाजाने बराच काळ वाट पाहिली आहे. पण आता ती आपल्या येणाऱ्या पिढीला वाट बघायला लावू देण्यासाठी तयार नाही. आणि यासाठी या अमृतकाळाची ही पहिली पहाट, आपण या अभिव्यक्त समाजाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी ही खूप मोठी सुवर्णसंधी बनून आली आहे.
माझ्या प्रिय देशवासीयांनो,
आपण गेल्या काही दिवसात पाहिले आहे. एका प्रचंड सामर्थ्याचा अनुभव घेतला आहे. आणि ते आहे, भारतात एका सामूहिक चेतनेचे पुनर्जागरण झाले आहे. एका सामूहिक चेतनेचे पुनर्जागरण. स्वातंत्र्याच्या इतक्या संघर्षाचे जे अमृत होते, आता ते एकत्रित केले जात आहे, संकलित केले जात आहे, संकल्पात परिवर्तीत होत आहे. पुरुषार्थाच्या पराकाष्ठेची साथ लाभत आहे आणि सिद्धीचा मार्ग दिसू लागला आहे. ही चेतना.. मला वाटते की ही चेतनेची जागृती, हे पुनर्जागरण हा आपला सर्वात मोठा ठेवा आहे. हे पुनर्जागरण बघा, 10 ऑगस्ट पर्यंत कदाचित लोकांना ठाऊकही नसेल की देशाच्या गाभ्यात कोणती ताकद आहे. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ज्याप्रकारे तिरंग्यासंदर्भात, तिरंग्याची ही यात्रा घेऊन देश ज्याप्रकारे मार्गस्थ झाला आहे, मोठमोठे समाज अभ्यासक, सामाजिक विषयातले तज्ञ, ते ही कदाचित कल्पना करुन शकत नसतील की माझ्या देशात किती प्रचंड सामर्थ्य आहे. हे एका तिरंगा ध्वजाने दाखवून दिले आहे. हा पुर्नचेतना, पुनर्जागरणाचा क्षण आहे. काही लोक समजू शकले नाही
जेव्हा जनता कर्फ्यू म्हटले जाते, हिंदुस्थानातील प्रत्येक कानाकोपऱ्यात त्याचे पालन होते. ही त्या चेतनेची अनुभूती आहे. देश जेव्हा टाळी, थाळी वाजवून कोरोना योद्ध्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहतो तेव्हा चेतनेची अनुभूती होते. जेव्हा दिवे उजळून देश कोरोना योद्ध्यांना शुभकामना देण्यासाठी उभा ठाकतो तेव्हा त्या चेतनेची अनुभूती होते. कोरोनाच्या काळात सारे जग, लस घ्यायची की नाही, लस उपयोगी आहे की नाही या संभ्रमात होती त्यावेळी माझ्या गावातील गरीबही 200 कोटी लस मात्रा घेत जगाला थक्क करुन टाकणारे काम करुन दाखवतात. ही चेतना आहे. हेच सामर्थ्य आहे. या सामर्थ्याने आज देशाला नवी ताकद दिली आहे.
माझ्या देशवासीयांनो, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो,
एक महत्वपूर्ण सामर्थ्य मी पाहतोय. जसा आकांक्षित समाज, जसे पुनर्जागरण, तसेच स्वातंत्र्याच्या इतक्या दशकांनंतर, संपूर्ण विश्वाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जग भारताकडे गौरवाने पाहत आहे. अपेक्षेने पाहत आहे. भारताच्या या मातीत समस्यांचे समाधान जग शोधत आहे मित्रांनो. जगाचा बदल, जगाच्या दृष्टीकोनातील हे परिवर्तन, 75 वर्षांच्या आपल्या अनुभव प्रवासाचा परिणाम आहे.
आपण ज्याप्रकारे संकल्प घेऊन मार्गस्थ झालो आहोत, जग हे बघत आहे, आणि जगही याबाबत आशा बाळगून जगत आहे. आशा पूर्ण करण्याचे सामर्थ्य कुठे एकवटले आहे हे त्याला दिसू लागले आहे. मी यास त्रिशक्तीच्या रुपात बघतो. तीन सामर्थ्याच्या रुपात बघतो. आणि ही त्रीशक्ती आहे, अभिव्यक्तीची, पुनर्जागरणाची, आणि जगाच्या आशेची. आणि हे पूर्ण करण्यासाठी.., आम्हाला माहित आहे.
मित्रांनो,
माझ्या देशवासीयांची खूप मोठी भूमिका आहे. 130 कोटी देशवासीयांनी, अनेक दशकांच्या अनुभवानंतर स्थिर सरकारचे महत्व काय असते, राजकीय स्थिरतेचे महत्व काय असते, राजकीय स्थिरता जगात कशाप्रकारची ताकद दाखवू शकते, धोरणांमधे कसे सामर्थ्य असते, त्या धोरणांवर जग कसे विश्वासते हे भारताने दाखवले आहे. आणि जगही हे जाणते आहे. आणि जेव्हा राजकीय स्थिरता असेल, धोरणांमधे वेग असेल, निर्णयांमधे गतिशीलता असेल, सर्वव्यापकता असेल, सर्वसमावेशकता असेल तर विकासासाठी प्रत्येकजण भागीदार होतो. आम्ही सबका साथ सबका विकासाचा मंत्र घेऊन निघालो होतो. पण बघता बघता देशवासीयांनी त्यात सबका विश्वास आणि सबका प्रयास यासह त्यात आणखी रंग भरले आहेत. आणि यासाठी, आम्ही बघितले आहे, आमच्या सामुहिक शक्तीला, आमच्या सामुहिक सामर्थ्याला आम्ही पाहिले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ज्याप्रकारे साजरा केला गेला. ज्या प्रकारे प्रत्येक जिल्ह्यात 75 अमृत सरोवर बनवण्याचा संकल्प केला गेला. गावागावातील लोक यात सहभागी होत आहेत. अभियान चालवले जात आहे. प्रत्येकजण सेवा करत आहे. आपल्या गावात आपल्या प्रयत्नातून जलसंवर्धनासाठी मोठे अभियान चालवत आहेत. आणि यामुळे प्रिय बंधू भगिनींनो, मग ते स्वच्छतेचे अभियान असो, मग ते गरीब कल्याणाचे काम असो. देश आज पूर्ण शक्तीने पुढे जात आहे. परंतु, बंधू आणि भगिनींनो, आज आपल्या अमृतकाळात, स्वातंत्र्याच्या 75 वर्षात त्याचे गौरवगानच करत राहाणार? आपलीच पाठ थोपटून घेणार? तर आपली स्वप्ने कुठे तरी दूर निघून जातील. आणि यासाठी 75 वर्षांचा कालखंड कितीही शानदार राहिला असो, कितीही संकटाचा राहिला असो, कितीही आव्हानांचा राहिला असो, कितीही स्वप्ने अपूर्ण दिसत असतील, तरीही आपण आज जेव्हा अमृतकाळात प्रवेश करत आहोत, येणारी 25 वर्ष आमच्या देशासाठी अत्यंत महत्वपूर्ण आहेत. आणि यासाठी जेव्हा मी आज, माझ्या समोर जेव्हा लाल किल्ल्यावरुन 130 कोटी देशवासीयांच्या सामर्थ्याचे स्मरण करतो. त्यांची स्वप्ने बघतो, त्यांच्या संकल्पांची अनुभूती करतो. आणि
मित्रांनो,
मला वाटते येणाऱ्या 25 वर्षांसाठी आपण त्या पाच, त्या पंचप्राणांवर आपल्या शक्ती केंद्रित करायला हव्यात. आपल्या संकल्पांना केंद्रित करायला हवे. आपल्या सामर्थ्याला केंद्रित करावे लागेल. आणि आपल्याला त्या पंचप्राणांना घेऊन, 2047.. जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील. स्वातंत्र्याच्या देशप्रेमींची स्वप्ने साकारण्याची जबाबदारी घेऊन पुढे जायला हवे. आणि जेव्हा मी पंचप्राणांबद्दल बोलतो, तेव्हा
पहिला पंचप्राण
आता देश मोठे संकल्प घेऊनच पुढे जाणार, मोठे संकल्प घेऊन पुढे जावे लागणार आहे. आणि तो मोठा संकल्प आहे, विकसित भारत. आता त्यापेक्षा काहीच कमी नाही. मोठा संकल्प. आता दुसरा प्राण,
दुसरा पंचप्राण
आहे, कोणत्याही मनाच्या कोपऱ्यात, आपल्या आत, आपल्या सवयीत गुलामीचा एकही अंश अजूनही असेल तर त्यास कोणत्याही अवस्थेत राहू द्यायचे नाही.
गुलामीने आपल्याला शत प्रतिशत जखडून टाकलं होतं. आपल्या मानसिकतेला बांधून टाकलं होतं. आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत विकृती निर्माण केल्या होत्या. आपल्याला गुलामीशी जोडलेल्या छोट्या छोट्या गोष्टी जर कुठे दिसल्या, आपल्या अंतरात असल्याचं दिसलं, आपल्या आसपास दिसल्या…. तर आपल्याला त्यापासून आता मुक्त व्हावंच लागेल, पंचप्राणांपैकी हाच आपला दुसरा पंचप्राण आहे.
तिसरा पंचप्राण
आपल्याला आपल्या वैभवशाली वारशाचा अभिमान असला पाहीजे. कारण हाच वारसा आहे, ज्यामुळे भारताने कधी काळी सुवर्णकाळ अनुभवला होता. आणि हाच वारसा आहे ज्यात काळानुरुप बदलण्याची सवय जडलेली आहे. आणि हाच वारसा आहे, ज्यानं कालबाह्य झालेल्या गोष्टींचा त्याग केला आहे, नाविन्यतेचा स्वीकार केला आहे. आणि त्यामुळेच या वारशाचा आपल्याला गर्व असायला हवा.
आणि चौथा पंचप्राण...
तोही तितकाच महत्वपूर्ण आहे.तो आहे, एकता आणि एकजुटता. 130 कोटी देशवासीयांमधली एकता, देशात कोणी परका नसला पाहिजे. ही एकतेची ताकद एक भारत श्रेष्ठ भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी आपला चौथा पंचप्राण आहे.
पाचवा पंचप्राण आहे तो म्हणजे नागरिकांचे कर्तव्य.
नागरिकांचे कर्तव्य…. ज्यातून पंतप्रधानांनाही सवलत नाही, मुख्यमंत्र्यांनाही सवलत नाही.. ते ही नागरिक आहेत. नागरीकांचे कर्तव्य… ही बाब आपल्या आगामी 25 वर्षांमधली स्वप्न पूर्ण करण्याच्यादृष्टीने एक खूप मोठी प्राणशक्ती आहे.
माझ्या प्रिय देशबांधवांनो
जेव्हा स्वप्न मोठी असतात, जेव्हा संकल्प मोठे असतात.. तेव्हा पुरुषार्थही खूप मोठा असतो.. ताकदही मोठ्या प्रमाणात एकत्र येत असते.आता कोणी कल्पना करू शकतो का? की देश?1940-42 च्या दशकातला कालखंड आठवून पाहा.. देश जागृत झाला होता. कोणी हातात झाडू घेतला होता, कोणी हातात चरखा घेतला होता.कोणी सत्याग्रहाचा मार्ग निवडला होता, कोणी संघर्षाचा मार्ग निवडला होता… कोणी क्रांतीचा.. वीरतेचा मार्ग स्वीकारला होता..मात्र संकल्प मोठा होता… स्वातंत्र्य आणि त्याची ताकद पाहा. मोठा संकल्प होता म्हणून आपण स्वातंत्र्य मिळवलंच.आपण स्वतंत्र झालो.जर संकल्प छोटा असता… मर्यादित असता, तर कदाचित आजही संघर्ष करत राहण्याचे दिवस कायम राहीले असते.पण संकल्प मोठा होता.. आणि आपण तो तडीसही नेला.
माझ्या प्रिय देशबांधवांनो,
आता, जेव्हा आज ही अमृतकाळाची पहिली पाहाट आहे, तेव्हा आपल्याला आगामी 25 वर्षात विकसीत भारत घडवायचाच आहे….. तो ही आपल्या नजरेसमोर. 20-22-25 वर्षांचे माझ्या देशाचे जे युवक माझ्या समोर आहेत..
माझ्या देशाच्या युवकांनो, जेव्हा देश स्वातंत्र्याची 100 वर्ष साजरा करत असेल, तेव्हा तुम्ही 50-55 वर्षांचे झालेले असाल. म्हणजे आपल्या आयुष्याचा हा सुवर्णकाळ, तुमच्या वयोमानातली ही 25-30 वर्षे भारताची स्वप्न पूर्ण करण्याचा कालावधी आहे. आता संकल्प घेऊन, माझ्या सोबत वाटचाल सुरु करा माझ्या सहकाऱ्यांनो.. तिरंग्यांची शपथ घेऊन वाटचाल सुरु करा.आपण सगळे पूर्ण ताकदीनं वाटचाल सुरु करू.मोठा संकल्प, माझा देश विकसीत देश होईल, विकसित (Developed Country) होईल. विकासाच्या प्रत्येक मानकाने पाहा. आपण मानवकेंद्री व्यवस्था विकसित करूया, आपल्या केंद्रस्थानी मानव असेल, आपल्या केंद्रस्थानी मानवाच्या आशा आकांक्षा असतील. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे, भारत जेव्हा मोठे संकल्प हाती घेतो, तेव्हा तो ते संकल्प पूर्णत्वास नेतो.
जेव्हा मी इथूनच स्वच्छतेबद्दल बोललो होतो.. माझ्या पहिल्या भाषणात. देशानं त्या दिशेनं वाटचाल सुरु केली, ज्याला जिथून शक्य झालं त्यानं तिथून स्वच्छतेच्या दिशेनं वाटचाल सुरु केली, आणि अस्वच्छतेविषयीचा तिटकारा हे आपलं स्वभाव वैशिष्ट्यच झालं.हाच तर देश आहे. या देशानं करून दाखवलं आणि करून दाखवतही आहे.हाच तो देश आहे.. ज्यानं लसीकरण.. ज्याबाबतीत जग द्विधा मनस्थितीत असताना, 200 कोटी लसमात्रांचा टप्पाही ओलांडून दाखवला… निश्चित कालमर्यादेत हा टप्पा ओलांडला…आधीचे सर्व विक्रम मोडून काढत हा टप्पा ओलांडला.. हा देश करू शकतो..आम्ही ठाम संकल्प केला होता.देश आखाती देशातील खनिजतेलावर अवलंबून आहे.. अशावेळी त्याला वनस्पतींच्या अवशेषांपासून निघणाऱ्या तेलाच्या वापराच्या दिशेनं कसं वळवावं? 10% इथेनॉल ब्लेंडींगचं स्वप्न… मोठं वाटत होतं. आपला पूर्वइतिहास लक्षात घेता, असं दिसत होतं की शक्यच नाही आहे.. मात्र नियोजित कालमर्यादेआधीच 10% इथेनॉल ब्लेंडींग करून, देशानं हे स्वप्नही पूर्ण करून दाखवलं.
बंधु आणि भगिणींनो,
अडीच कोटी लोकांपर्यंत इतक्या कमी कालावधीत वीजेची जोडणी पोहचवणं हे छोटं काम नव्हतं. देशानं करून दाखवलं. लाखो कुटुंबियांच्या घरात नळाद्वारे पीण्याचं पाणी पोहोचवण्याचं काम आज देश वेगानं करतो आहे. उघड्यावर शौचाला जाण्याच्या परिस्थितीतून सुटका करून घेणं, आज आपल्या भारतात शक्य झाली आहे.