मुंबई: उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूल यासाठी महावितरणचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वीजमीटरचे रीडिंग अचूकच झाले पाहिजे. मीटरच्या रीडिंगमधील अचूकतेसाठी महावितरणने अतिशय गंभीरपणे धडक उपाययोजना सुरु केल्या आहेत. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा नाहक मनस्ताप व बिल दुरुस्तीच्या त्रासासोबतच महावितरणच्या महसूलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटर रीडिंगमध्ये हयगय करणाऱ्या मीटर रीडिंग एजन्सीविरुद्ध तसेच महावितरणच्या जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी बुधवारी (दि. २९) मीटर रिडींग एजन्सीचे संचालक व प्रतिनिधींच्या बैठकीत दिला.
दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून अचूक रीडिंगसाठी सुधारणा न करणे, वीजमीटर योग्य स्थितीत असूनही हेतुपुरस्सरपणे नादुरुस्तीचा (फॉल्टी) शेरा देणे, सरासरी किंवा चुकीचे रीडिंग घेणे आदी प्रकार दिसून आल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील तीन व पुणे जिल्ह्यातील दोन अशा पाच मीटर रीडिंग एजन्सीजना या बैठकीतच तडकाफडकी बडतर्फ करण्यात आले. तसेच महावितरणच्या संबंधित तीन कार्यकारी अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत सर्व मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक व प्रतिनिधींची पुणे येथे बैठक झाली. यावेळी संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे, कार्यकारी संचालक (देयके व महसूल) श्री. योगेश गडकरी, प्रादेशिक संचालक (प्र.) श्री. अंकुश नाळे, मुख्य अभियंता सर्वश्री संजय पाटील (देयके व महसूल), सचिन तालेवार (पुणे), सुनील पावडे (बारामती), परेश भागवत (कोल्हापूर) उपस्थित होते. या बैठकीत एका सादरीकरणाद्वारे एजन्सीकडून होणाऱ्या फोटो मीटर रीडिंगमधील चुका, सदोष रीडिंग, मीटर नादुरुस्तीबाबत चुकीचे शेरे आदींची माहिती देऊन त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत एजन्सीजच्या संचालकांना उपाय सांगण्यात आले.
संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे म्हणाले की, मीटर रीडिंग हा बिलींगचा मुख्य आधार आहे. त्यात १०० टक्के अचूकता पाहिजेच. परंतु चुकीचे किंवा सदोष रीडिंग घेतल्यास महावितरणच्या महसूलाचे नुकसान आणि ग्राहकांना वीजबिल दुरुस्तीचा नाहक त्रास होतो ही बाब अजिबात खपवून घेतली जाणार नाही. मीटर रीडिंग एजन्सीजविरुद्ध केवळ कारवाई करणे हा मुख्य उद्देश नाही. परंतु रीडिंगसाठी जे अचूकतेचे, गुणवत्तेचे मापदंड आहेत त्यात कुचराई झाल्यास एजन्सीज व महावितरणच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. अचूक मीटर रीडिंगबाबत उपविभाग व विभाग कार्यालयांनी दैनंदिन आढावा घ्यावा. दैनंदिन पर्यवेक्षण करावे. बिलिंग किंवा रीडिंगमध्ये कोणतीही अनियमितता आढळल्यास ताबडतोब उपाय करावेत व ग्राहकांना अचूक बिल देण्यात येईल याची काळजी घ्यावी. सोबतच मीटर रीडर नियुक्त करताना त्यांची शैक्षणिक पात्रता, तांत्रिक प्रशिक्षण, संवाद कौशल्य, गुणवत्ता इत्यादी बाबी संबंधित अधिकाऱ्यांनी एजन्सीजकडून तपासून घ्याव्यात असे निर्देश यावेळी संचालक श्री. ताकसांडे यांनी दिले.
महावितरणकडून प्रामुख्याने उत्कृष्ट ग्राहकसेवा व महसूलवाढीसह सक्षमतेचा, प्रगतीचा वेग वाढविण्यासाठी आमुलाग्र सुधारणा सुरु आहेत. त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. ग्राहकांनी प्रत्यक्षात वापरलेल्या विजेचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. परंतु सदोष व चुकीच्या रीडिंगमुळे ग्राहकांचा रोष वाढतो. त्यामुळे अचूक बिलींगसाठी १०० टक्के अचूक रीडिंग हे महावितरणचे लक्ष्य आहे. त्यासाठी सुरु असलेल्या उपायांमुळे गेल्या दोन महिन्यांमध्ये बिलिंग व रीडिंगमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. मीटर रीडिंग हे अचूक व गुणवत्तेनुसार होईल यासाठी कायम काळजी घेण्यात येईल. तसेच वारंवार सूचना देऊनही एजन्सीजने रीडिंगमधील हेतुपुरस्सर चुका किंवा सततचे दोष टाळले नाहीत तर एजन्सीजविरुद्ध बडतर्फी व काळ्या यादीत टाकण्यासह प्रसंगी फौजदारी कारवाई केली जाईल असे संचालक (संचालन) श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले.