खापरखेडा राख विल्हेवाटीसंदर्भात अनेक निर्देश जारी
नागपूर : खापरखेडा औष्णिक केंद्रामुळे होणाऱ्या प्रदूषणाची दखल घेत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी थेट प्रदूषणस्थळी भेट दिल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला जाग आली आहे. केंद्रातून निर्माण होणाऱ्या राखेची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यासंदर्भातील विविध चार मुद्यांवर २० लाख रुपयांची बँक हमी जमा करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दिलेल्या निर्देशांचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
नांदगाव तलावात साचलेली राख पूर्णपणे काढून २५८ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या नांदगाव राख तलावाचे पुनरुज्जीवन करावे. हे पुनरुज्जीवन करताना येत्या १५ दिवसात जमिनीचा मूळ पोत यायला हवा. या राखेचा पर्यावरणपूरक वापर करावा. वाहतुकीदरम्यान त्याचे उत्सर्जन टाळण्यासाठी राखेवर आच्छादन असावे. तलावाचे पुनरुज्जीवन तसेच त्याच्या पर्यावरणपूरक वापराबाबत प्रत्येक आठवडय़ाला त्याचा अहवाल मंडळाकडे पाठवावा. या मुद्याचे पालन सुनिश्चित करण्यासाठी पाच लाख रुपयाची बँक हमी जमा करावी. नांदगाव राख तलावात फ्लाय अॅश टाकण्यासाठी टाकलेल्या पाईपलाईनसह विद्यमान पायाभूत सुविधा १५ दिवसांच्या आत कायमच्या काढून टाकाव्या. त्यासाठी पाच लाख रुपयांची बँक हमी जमा करावी. खापरखेडा औष्णिक विद्युत केंद्रातून वारेगाव राख तलावात निर्माण होणाऱ्या कोरडय़ा राखेची विल्हेवाट ताबडतोब थांबवावी. ही राख पर्यावरणपूरक वापरासाठी दैनंदिन अधिसूचनेनुसार वापरली जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत तलावात या राखेची विल्हेवाट लावली जाणार नाही. या निर्देशाचे पालन सुनिश्चित करण्यासाठी देखील पाच लाख रुपयांची बँक हमी जमा करावी. तसेच वारेगाव राख तलावात जमा झालेल्या राखेच्या वापरासाठी १५ दिवसांच्या आत कालबद्ध कृती आराखडा सादर करावा. वारेगाव राख तलावातील राखेच्या वापराबाबत साप्ताहिक कार्यवाही अहवाल सादर करावा. या चौथ्या मुद्यांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी देखील पाच लाख रुपये बँक हमी मंडळाकडे जमा करण्याचे निर्देश केंद्राला देण्यात आले आहेत. या चारही निर्देशांचे पालन न झाल्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मंडळाचे विभागीय अधिकारी ए.एम. कारे यांनी खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या मुख्य अभियंत्याला मंगळवार, १५ फेब्रुवारीला पाठवलेल्या पत्रात दिला आहे.
Awaken the Pollution Control Board after the visit of the Environment Minister