जुन्नरी कट्टाचा सुवर्ण महोत्सव साजरा
जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर येथे कावेरी लाॅन्स, शिवनेरी फोर्ट व्हॅली रिसॉर्ट याठिकाणी १६ जानेवारी २०२१ रोजी सुरू झालेल्या जुन्नरी कट्टा उपक्रमाचा ५० वा भाग पूर्ण झाल्याबद्दल सुवर्ण महोत्सवी कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंदिर, लेणी, मुर्ती अभ्यासक व लेखक आशुतोष बापट, शिवाजी ट्रेल दुर्ग संवर्धन संस्थेचे संस्थापक मिलींद क्षीरसागर, उपाध्यक्ष प्रवीण परूळेकर,मुंबई विद्यापीठाचे पारशी-अरबी-उर्दू भाषेचे अभ्यासक प्रा. राजेंद्र जोशी, लेखक उत्तम सदाकाळ तसेच नगराध्यक्ष शाम पांडे, जुन्नरी कट्टाचे संस्थापक विनायक खोत, विजय कोल्हे, राजेंद्र जुंदरे, रमेश खरमाळे, मरहट्टे सह्याद्रीचे या समुहाचे अमोल ढोबळे,पुराण वस्तू संग्रहक बापूजी ताम्हाणे,ओंकार ढाके व आदी सहकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात आशुतोष बापट यांनी मार्गदर्शन करताना, जुन्नरमध्ये बौध्द धर्म, शाक्तपंथ उदयाला आला. याठिकाणी वैष्णव सांप्रदाय असण्याची शक्यता आहे. वारसा जपत असताना पुर्वी जात्यावरील ओव्या गायल्या जायच्या. त्याचा अभ्यास करून,त्याच्या नोंदी कराव्यात जेणेकरून त्या नामशेष होणार नाहीत असे सांगितले. तसेच जुन्नरी कट्टा उपक्रमासाठी "बघा जुन्नर.. जगा जुन्नर ! " अशी टॅगलाईन ची संकल्पना देखील त्यांनी मांडली. यानिमीत्ताने रविवार दि. ०२ जानेवारी रोजी बापट यांनी अंबा-अंबिका लेणी, भिमाशंकर लेणी,भूत लेणी येथे जुन्नरी कट्टा सदस्यांना लेणी वाचनाचे मार्गदर्शन केले.
शिवाजी ट्रेलचे मिलींद क्षीरसागर यांच्या संकल्पनेतील जुन्नरी कट्टा उपक्रमाचा माझ्या स्वप्नांतील ५० भाग पूर्ण केल्याचा प्रवास पहाण्यासाठी या कार्यक्रमास हजर होतो. तसेच समाजात चालणाऱ्या गोष्टी शिकायला या कट्ट्यावर मिळतात व विचार मुक्तपणे मांडता येतात कारण यावर कोणतीही बंधने नसतात. जगभरात जुन्नरची ओळख केवळ छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळे आहे.त्याचप्रमाणे नगरपरिषदेच्या माध्यमातून कट्टा उपक्रमाचे जागृतीपर कार्यक्रम होण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पर्यटन तालुका जुन्नर व आजुबाजुच्या परिसरातील अस्तित्वात असलेले दुर्ग, लेणी वाचन कसे करावे तसेच पौराणिक वास्तू, शिल्पे,प्राचीन मंदिरे आदींची ओळख याकरीता असलेला उपक्रम म्हणजे जुन्नरी कट्टा असून ऐतिहासिक, नैसर्गिक वारसा लाभलेल्या जुन्नर तालुक्याचा इतिहास समजण्याकरीता व त्याबाबत ज्ञान प्राप्त करून संवर्धन होण्यास कशी मदत होईल याबाबतची माहीती जुन्नरी कट्टाचे विजय कोल्हे यांनी प्रास्ताविकात दिली.
जुन्नरमध्ये ऐतिहासिक ग्रंथालय स्थापन करण्याचा मनोदय किरण कबाडी यांनी यावेळी व्यक्त केला. सूत्रसंचालन निशा लांडे यांनी तर आभार जुन्नरी कट्टाचे सदस्य मोहन रासणे यांनी मानले.